Revised Common Lectionary (Semicontinuous)
ओळंब्याचा दृष्टांन्त
7 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.) 8 परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?”
मग माझा प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्या दृष्टपणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. मी वाईट डाग काढून टाकीन. 9 इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
अमस्या आमोसला थांबविण्याचा प्रयत्न करतो
10 बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही. 11 आमोस म्हणाला असे आहे, यराबाम तलवारीच्या वाराने मरेल, आणि इस्राएलच्या लोकांना त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
12 अमास्या आमोसला असेही म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात जा आणि तेथे जेव! तेथेच दे तुझे प्रवचन. 13 पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ करू नकोस. ही यराबामची पवित्र जागा आहे, हे इस्राएलचे मंदिर आहे.”
14 मग आमोस अमास्याला म्हणाला, “मी धंदेवाईक संदेष्टा नाही. मी संदेष्ट्यांच्या घराण्यातीलही नाही. मी गुरे राखत होतो. आणि उंबरांच्या झाडांची निगा राखत होतो. 15 मी मेंढपाळ होतो मेंढ्यांच्या मागे जात असतानाच परमेश्वराने माझा स्वीकार केला. परमेश्वर मला म्हणाला, ‘जा माझ्या लोकांना, इस्राएलला, संदेश सांग.’ 16 म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस. 17 पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”
आसाफाचे स्तोत्र
82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
5 “काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
1 देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधु तीमथी याजकडून,
2 ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना:
देव, आमचा पिता याजकडून तुम्हास कृपा व शांति असो.
3 आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे, आभार मानतो. 4 कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे. 5 कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. 6 जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे. 7 तुम्ही ते, आमचा सहसेवक एपफ्रास, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, त्याच्याकडून शिकून घेतले आहे. 8 त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले.
9 या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की:
तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.
12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.
चांगला शोमरोनी
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [a] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [b]
28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31 “तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
33 “नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली. 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। [c] (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’”
36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, “त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
2006 by World Bible Translation Center