Revised Common Lectionary (Semicontinuous)
पौल व सीला तुरुंगात
16 एकदा आम्ही प्रार्थनेला जात असताना. एक दासीकाम करणारी मुलगी आम्हांना भेटली, तिच्या अंगात येत असे [a] ती दैवप्रश्ना सांगून आपल्या घरधन्यास पुष्कळ मिळकत करुन देत असे. 17 ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, “हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!” 18 तिने हे असे बरेच दिवस केले. त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, “येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने, मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ!” ताबडतोब तो आत्मा बाहेर आला.
19 ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की, आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करु शकणार नाहीत. म्हणून त्यांनी पौल व सीला यांना धरुन शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते. 20 त्या लोकांनी पौल व सीला यांना पुढाऱ्यांपुढे आणले, व ते म्हणाले, “हे लोक यहूदी आहेत. आपल्या शहरात ते त्रास देत आहेत. 21 आमच्यासाठी च्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यासाठी ते लोकांना सांगत आहेत. आम्ही रोमी नागरिक आहोत व या गोष्टी आम्ही करणार नाही.”
22 लोक पौल व सीला यांच्याविरुद्ध होते. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सीलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की, त्यांना काठीने मारा. 23 लोकांनी पौलाला व सीला यांना पुष्कळ मारले. मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुंरुंगात टाकले, पुढाऱ्यांनी तुंरुंगाधिकाऱ्याला सांगितले, “फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा!” 24 अधिकाऱ्याने तो खास आदेश मिळाल्यावर पौल व सीला यांना तुरुंगात आत दूरवर ठेवले. त्याने त्यांचे पाय लाकडाच्या ओंडक्यांमध्ये बांधले.
25 मध्यरात्रीच्या वेळी पौल व सीला, देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. 26 अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुगाचे पाये डळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली. 27 तुरुंगाधिकारी जागा झाला. त्याने पाहिले की, तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील म्हणून अधिकाऱ्याने आपली तरवार काढली, तो स्वतःला मारणार होता 28 इतक्यात पौल ओरडला, “स्वतःला इजा करुन घेऊ नकोस आम्ही सर्व येथेच आहोत!”
29 अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले. मग तो आतमध्ये पळाला. तो थरथर कापत होता. तो पौल व सीला यांच्यापुढे पडला. 30 मग त्यांने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?”
31 ते त्याला म्हणाले, “प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल-तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल.” 32 पौलाने व सीलाने तुरुंगाधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्यालासुद्धा प्रभूचा संदेश सांगितला. 33 त्या वेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्यांने पौल व सीला यांच्या जखमा धुतल्या. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला. 34 नंतर त्याने पौल व सीला यांना घरी नेले व अन्न खावयास दिले. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते. कारण ते आता देवावर विश्वास ठेवीत होते.
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
12 “पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन. 13 मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील.
16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”
आमेन, ये प्रभु येशू, ये!
21 प्रभु येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.
20 “आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंति करतो. 21 यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. 22 आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे. 23 मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.
24 “हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे. 25 नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही, तरी मी तुला ओळखतो, आणि त्यांना माहीत आहे की, तू मला पाठविलेले आहेस. 26 मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे, व तुझी ओळख करून देतच राहीन, यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये असावे.”
2006 by World Bible Translation Center