Revised Common Lectionary (Semicontinuous)
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
एलीयाला घेऊन जाण्याची परमेश्वराची योजना
2 एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला.
2 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले.
3 तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?”
अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”
4 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.
5 तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?”
अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”
6 एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.”
अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले.
7 संदेष्ट्यांपैकी पन्नास जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलीया आणि अलीशा यार्देन नदीजवळ थांबले. ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले. 8 एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.
9 नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.”
अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
10 एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.”
परमेश्वर एलीयाला स्वर्गात नेतो
11 एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.
12 अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”
अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले. 13 एलीयाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलीशाने उचलला. अलीशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले, “एलीयाचा परमेश्वर देव कुठे आहे?” 14 अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.
संदेष्ट्यांकडून एलीयाची चौकशी
15 यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलीशाला पाहिल्यावर ते म्हणाले, “एलीयाच्या आत्म्याचा आता अलीशात प्रवेश झाला आहे.” ते सर्वजण अलीशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
जखऱ्या आणि अलीशिबा
5 यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते. 6 दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते. 7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.
8 जेव्हा जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता, 9 याजकांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10 जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,
11 तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. 12 जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली. 13 देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. 14 तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील. 15 देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
16 “आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 17 योहान स्वतः देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंतःकरणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”
2006 by World Bible Translation Center