Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 124

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
    इस्राएल, मला उत्तर दे.
लोकांनी आपल्यावर हल्ला केला
    तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
    तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
    नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
    आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
    आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

जाळ्यात सापडलेल्या आणि
    नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
    जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
परमेश्वराकडून आपली मदत आली.
    परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

नीतिसूत्रे 8:4-21

ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे.
    मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका.
    मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका.
लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत.
    मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
माझे शब्द खरे आहेत.
    मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो.
मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत.
    माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात.
    ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो.
10 माझ्या शिस्तीचा स्वीकार करा.
    ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे.
    ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे.
11 ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे.
    ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.

ज्ञानरुपी स्त्री काय करते

12 “मी ज्ञान आहे.
    मी चांगल्या न्यायाने जगते.
    तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
13 जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल.
    मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वतःला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते.
    मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
14 परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते.
    मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
15 राजे राज्य करताना माझा उपयोग करतात.
    राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.
16 प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या
    लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
17 मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते.
    आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
18 माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत.
    मी खरी संपत्ती आणि यश देते.
19 मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात.
    आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
20 मी लोकांना योग्य मार्गावर आणते.
    मी त्यांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते.
21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते.
    होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.

इफिसकरांस 5:15-20

15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत. 17 म्हणून मूर्खासारखे वागु नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. 18 द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा, 19 स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा. 20 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center