Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
संदेष्ट्यांकडून एलीयाची चौकशी
15 यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलीशाला पाहिल्यावर ते म्हणाले, “एलीयाच्या आत्म्याचा आता अलीशात प्रवेश झाला आहे.” ते सर्वजण अलीशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले. 16 मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.”
पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”
17 पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.”
मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. 18 शेवटी ती माणसे यरीहो येथे अलीशा राहात होता तेथे आली. एलीयाचा शोध लागत नाही असे त्यांनी अलीशाला सांगितले. तेव्हा आपण या गोष्टीला नको म्हणत होतो असे अलीशाने त्यांना सांगितले.
अलीशाकडून पाण्याचे शुध्दीकरण
19 एकदा त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “हे नगर फार चांगल्या ठिकाणी वसले आहे हे तुम्ही पाहताच आहात पण इथले पाणी खराब आहे. त्यामुळे या जमिनीत पिके निघू शकत नाहीत.”
20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यात मीठ घाला.”
तेव्हा लोकांनी एक पात्र त्याला दिले. 21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला. तिथे त्याने मीठ टाकले. मग तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘आता हे पाणी मी शुध्द करत आहे. आता या पाण्याने मृत्यू ओढवणार नाही की पिकाची वाढ खुंटणार नाही.’”
22 अशाप्रकारे पाणी शुध्द झाले ते पाणी अजूनही चांगले आहे. अलीशा म्हणाला होता तसेच झाले.
इतर लोकांवर प्रेम करा अशी देवाने आज्ञा दिली
7 प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. 8 ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.
9 जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.
2006 by World Bible Translation Center