Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 140

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतीगीत

140 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव
    दुष्टांपासून माझे रक्षण कर.
ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत.
    ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत.
    जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.

परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव.
    वाईट लोकांपासून माझे रक्षण कर.
ते लोक माझा पाठलाग करतात,
    आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला.
    त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले.
    त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.

परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
    परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस.
    तू माझा रक्षणकर्ता आहेस.
    लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस.
    त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.

परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस.
    ते लोक वाईट योजना आखत आहेत.
    पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत.
    माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे.
    त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्ड्यात फेकून दे.
11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस.
    त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे.
    देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
    चांगले लोक तुझी उपासना करतील.

एस्तेर 4

मर्दखय मध्यस्थीसाठी एस्तेरला राजी करतो

जे काही झाले ते मर्दखयच्या कानावर आले. यहुद्यांविरुध्द राजाने काढलेला हुकूम त्याला समजला तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. शोकाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासून तो नगरातून मोठयाने आक्रोश करत आणि रडत निघाला. पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला. शोकाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही तिथून आत जाण्यास मनाई होती. राजाचा हुकूम ज्या प्रांतात पोचला तिथे तिथे यहुद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि शोकवस्त्रे घालून बहुतेक यहुदी राखेत पडून राहिले.

एस्तेरच्या दासी आणि खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयविषयी सांगितले. तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. शोकाच्या वस्त्रांऐवजी घालायला तिने मर्दखयकडे चांगली वस्त्रे पाठवली. पण तो ती घेईना. एस्तेरने मग हथाकला बोलावले. हथाक हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. मर्दखय एवढा कशाने त्रस्त झाला आहे हे शोधून काढायची एस्तेरने त्याला आज्ञा दिली. राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला. मर्दखयने मग हथाकला त्याच्या बाबतीत जे जे झाले ते सर्व सांगितले. यहुद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती रक्कम जमा करायचे हामानने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले. यहूद्यांच्या वधाच्या राजाज्ञेची प्रतही मर्दखयने हथाकला दिली. हा हुकूम शूशन नगरात सर्वत्र दिला गेला होता. हथाकने एस्तेरला तो हुकूम दाखवून सर्व काही तिला सांगावे अशी त्याची इच्छा होती. एस्तेरने राजाकडे जाऊन मर्दखय आणि तिचे लोक यांच्यासाठी दयेची याचना व मदत करण्यास हथाकने तिला प्रवृत्त करावे असेही त्याने सांगितले.

हथाकने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखय म्हणाला ते सगळे सांगितले.

10 मग मर्दखयसाठी एस्तेरने हथाकजवळ निरोप दिला: 11 “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री राजाचा एकच कायदा आहे तो म्हणजे मृत्युदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या माणसाला जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”

12-13 मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयला मिळाला. मर्दखयला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यातून सुटशील असे समजू नकोस. 14 तू आत्ता गप्प बसलीस तर यहुद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून मदत आणि स्वातंत्र्य मिळेल. पण तू आणि तुझे पितृकुळ यांचा मात्र नाश होईल. आणि कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”

15-16 तेव्हा एस्तेरने मर्दखयला हे उत्तर पाठवले: “मर्दखय, शूशन मधील सर्व यहुद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आपल्या उपवासानंतर मी राजाकडे जाईन. राजाने मला बोलावलेले नसताना त्याच्याकडे जाणे नियमाविरुध्द आहे हे मला माहीत आहे. पण तरी मी जाईन. मग मी मेले तर मेले.”

17 तेव्हा मर्दखय निघून गेला. एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.

1 पेत्र 1:3-9

जिवंत आशा

आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.

आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.

जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center