Revised Common Lectionary (Semicontinuous)
21-22 मी फार मूर्ख होतो.
मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो.
देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो.
मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.
23 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे.
मी नेहमी तुझ्या जवळ असतो.
देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
24 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर
आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
25 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील
तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?
26 कदाचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल
परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे.
देव सदैव माझ्याजवळ असतो.
27 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
28 मी मात्र देवाकडे आलो आहे.
आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.
मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुरक्षित जागा बनवले.
देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.
29 जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला तू चुकतो आहेस असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
2 राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
3 जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.
4 राजा जर न्यायी असला तर राष्ट्र बलशाली होते. पण राजा स्वार्थी असला आणि लोकांना त्यांच्या गोष्टी करुन घेण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत असले तर ते राष्ट्र कमजोर होईल.
5 जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वतःसाठीच सापळा तयार करीत असतो.
6 वाईट लोकांचा त्यांच्याच पापामुळे पराभव होतो पण चांगला माणूस गाणे गाऊन आनंदी राहातो.
7 चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत. 8 जे लोक स्वतःला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
9 शहाणा माणूस जर मूर्खाबरोबर त्याच्या समस्या सोडवायला लागला तर तो मूर्ख वाद घालेल व मूर्खासारख्या गोष्टी करेल आणि त्या दोघांचे कधीही एकमत होणार नाही.
10 खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांना [a] ठार मारायचे असते.
11 मूर्खाला चटकन् राग येतो पण शहाणा माणूस धीर धरतो आणि स्वतःला काबूत ठेवतो.
12 राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील.
13 गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
14 राजा जर गरीबांच्या बाबातीत न्यायी असला तर तो खूप काळ राज्य करेल.
15 मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल.
16 जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
17 तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही.
18 जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
19 जर तुम्ही फक्त सेवकाशी बोललात तर तो त्याचा धडा शिकणार नाही. तो सेवक तुमचे शब्द समजू शकेल पण तो ते पाळणार नाही.
20 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आशेला जागा नाही. जो विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाच्या बाबतीत आशेला अधिक जागा आहे.
21 जर तुम्ही तुमच्या सेवकाला तो जे जे मागेल ते ते सर्व दिले तर शेवटी तो चांगला सेवक होणार नाही.
22 रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.
23 माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरांपेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.
24 बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायला खूपच घाबरेल.
25 भीती ही सापळ्यासारखी असते. पण जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल.
26 खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांचा योग्य न्याय करतो.
27 चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
येशू हाच ख्रिस्त आहे काय? लोकांना पडलेला प्रश्न
25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल. 27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.”
28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”
30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. 31 परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”
यहुदी लोक येशूला अटक करण्याचा प्रयत्न करतात
32 लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. 33 मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन. 34 तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”
35 यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? 36 हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थ काय?”
2006 by World Bible Translation Center