Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 124

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
    इस्राएल, मला उत्तर दे.
लोकांनी आपल्यावर हल्ला केला
    तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
    तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
    नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
    आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
    आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

जाळ्यात सापडलेल्या आणि
    नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
    जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
परमेश्वराकडून आपली मदत आली.
    परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

एस्तेर 1:1-21

राणी वश्तीचा आज्ञाभंग

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता. शूशन या राजधानीच्या नगरातून राजा अहश्वेरोश राज्य करीत असे.

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते. या मेजवान्या एकशेऐंशी दिवस चालल्या. या काळात राजा अहश्वेरोशने आपल्या राज्याच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले. आपल्या प्रासादाचे राजेशाही सौंदर्य आणि वैभव त्याने सर्वांना दाखवले. एकशेऐंशी दिवसांचा हा काळ संपल्यावर राजा अहश्वेरोशने आणखी एक मेजवानी दिली. ती सात दिवस चालली. राजवाडयाच्या अंतर्भागातील उद्यानात ही मेजवानी होती. तिथे शूशन या राजधानीच्या शहरातील समस्त लहान थोरांना आमंत्रित केले होते. या आतल्या उद्यानात अळशीच्या सुताचे पांढरे निळे शोभेचे पडदे खोलीभर टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया अळशीच्या दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभांना लावले होते. तेथील मंचक सोन्यारुपाचे असून जांभा, संगमरवर शिंप आणि इतर मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवलेले होते. सुवर्णपात्रांतून द्राक्षारस दिला होता. ही पात्रेही नानाविविध तऱ्हांची होती. राजा अतिशय उदार असल्यामुळे द्राक्षारस भरभरुन देण्यात आला. सर्व आमंत्रितांना मनसोक्त द्राक्षारस देण्यात यावा अशी राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती व सेवक राजाची आज्ञा पाळत होते.

राणी वश्ती हिनेही राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

10-11 मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मनः स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.

12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला. 13-14 पंडिताचा आणि ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. त्यानुसार कायदे जाणणाऱ्या पंडितांशी राजा बोलला. ही सुज्ञ मंडळी राजाला जवळची होती. त्यांची नावे अशी: कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. 15 राजा ने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी कारण तिने राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तीचे उल्लंघन केले आहे.”

16 तेव्हा ममुखानाने सर्व अधिकाऱ्यांसमक्ष राजाला सांगितले, “राणी वश्तीच्या हातून प्रमाद घडलेला आहे. तिची ही गैरवर्तणूक केवळ राजाच्याच विरुध्द नव्हे तर राज्यातील सर्व सरदार व प्रजा यांच्याविरुध्द आहे. 17 माझे म्हणणे असे आहे की राणी वश्ती अशी वागली हे इतर सर्व बायकांना समजेल. त्या उद्या आपल्या नवऱ्यांचा शब्द डावलतील. त्या आपापल्या नवऱ्यांना म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणायला सांगितले पण तिने यायला नकार दिला.’

18 “राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे. त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल. त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप फैलावेल.

19 “तर राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो. राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कुणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. 20 राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व बायका आपापल्या नवऱ्यांशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या बायका आपल्या नवऱ्याचा मान ठेवतील.”

21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.

प्रेषितांचीं कृत्यें 4:13-31

13 यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते. 14 त्यांनी पाहिले की, तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की, तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते.

15 यहूदी पुढारी त्यांना म्हणाले की, त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करु लागले. 16 ते म्हणाले, “या मनुष्यांचे आपण काय करावे? यरुशलेममधील प्रत्येक व्यक्ति हे जाणतो की, त्यांनी एक महान चमत्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही. 17 परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”

18 मग यहूदी पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की, येशूच्या नावाने काही करु नका व शिकवू नका. 19 पण पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची? 20 आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या आम्हांला सांगितल्याच पाहिजेत.”

21-22 प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना; कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुति करीत होते. (हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता, तो चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.) म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले.

पेत्र व योहान विश्वासणाऱ्यांकडे परततात

23 पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहूदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले. 24 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, “सर्वसमर्थ प्रभु, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माणकर्ता आहेस. 25 आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:

‘राष्ट्रे का ओरडत आहेत?
    लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?

26 ‘या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले
    आणि प्रभु परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ (A)

27 या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद. [a] पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’ 28 त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले. 29 आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर. 30 तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.”

31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center