Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
ते कधीही थरथरणार नाहीत.
ते सदैव असतील.
2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
प्रस्तावना
1 हे शब्द म्हणजे दावीदाचा मुलगा शलमोन याची शहाणपणाची शिकवण आहे. तो इस्राएलचा राजा होता. 2 लोक शहाणे व्हावेत आणि त्यांना योग्य गोष्ट कोणती ते कळावे म्हणून हे शब्द लिहिले गेले. या शब्दांमुळे लोकांना खरे शिक्षण समजण्यास मदत होईल. 3 हे शब्द लोकांना जगण्याची सर्वोत्कृष्ट पध्दत शिकवतील. लोक न्यायी, इमानी आणि चांगले राहाण्याचा योग्य मार्ग शिकतील. 4 ज्या लोकांना शहाणपण शिकण्याची गरज आहे, त्यांना हे शब्द शहाणपण शिकवतील. तरुण माणसे या शब्दांपासून शिकू शकतील. 5 या शब्दांतली शिकवण शहाण्या माणसांनी सुध्दा अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, तरच ते अधिक शिकू शकतील आणि अधिक शहाणे होतील. आणि जे लोक चांगले वाईट ओळखण्यात तरबेज आहेत त्यांना अधिक चांगले समजू शकेल. त्या 6 नंतरच लोकांना शहाणपणाच्या गोष्टींचा आणि म्हणींचा अर्थ समजू शकेल. शहाणे लोक ज्या गोष्टी सांगतात त्या लोकांना समजू शकतील.
7 पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.
शलमोनाचा त्याच्या मुलांस उपदेश
8 मुला, [a] तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस. 9 तुझ्या आईचे आणि वडिलांचे शब्द म्हणजे तुझे मस्तक सुशोभित करणारा फुलांचा मुकुट आहे. ते शब्द म्हणजे तुझ्या गळ्याभोवती असलेली सुंदर माळ आहे.
10 मुला, ज्या लोकांना पाप आवडते ते लोक तुला प्रलोभने दाखवतील. तू त्यांचे ऐकू नकोस. 11 ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू. 12 आपण कोणत्या तरी निरपराध माणसावर हल्ला करु आपण त्या माणसाला मारु आणि त्याला मृत्युलोकात पाठवू 13 आपण किमती वस्तूंची चोरी करु. आपण त्या माणसाचा सर्वनाश करु व त्याला कबरेत पाठवू. आपण अशा वस्तूंनी आपले घर भरु. 14 तेव्हा आमच्याबरोबर ये आणि या गोष्टी करायला आम्हाला मदत कर. आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या आपण वाटून घेऊ.”
15 मुला, ज्या लोकांना पाप आवडते त्यांच्या मागे जाऊ नकोस. ते ज्या रस्त्यावर राहातात त्या रस्त्यावर एक पाऊलही टाकू नकोस. 16 ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
17 लोक पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे पसरतात. पण पक्षी जेव्हा तुम्हाला बघत असतो तेव्हा त्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात अर्थ नसतो. 18 ते वाईट लोक लपतात व कोणाला तरी मारण्यासाठी वाट बघतात पण खरोखर तेच त्या सापळ्यात अडकतील. त्यांच्या सापळ्यामुळे त्यांचाच नाश होईल. 19 अधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.
तुम्ही यहूदीसुद्धा पापी आहात
2 म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस. 2 आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. 3 तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. 4 देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.
5 पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. 6 देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 7 नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. 8 परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. 9 जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. 11 देवाजवळ पक्षपात नाही.
2006 by World Bible Translation Center