Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गीतरत्न 2:8-13

ती पुन्हा बोलते

मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
    तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
    टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
माझा प्रियकर मृगासारखा,
    हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
    खिडकीतून डोकावणाऱ्या,
    झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
    आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
    पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
    आता गाण्याचे दिवस आले आहेत.
    ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
    बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
    आपण आता दूर जाऊ या.”

स्तोत्रसंहिता 45:1-2

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया सुरांवर बसवलेले मास्कील प्रीतीचे स्तोत्र

45 मी राजासाठी या गोष्टी लिहितो
    तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते.
एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत
    त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.

तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस.
    तू चांगला वक्ता आहेस,
    म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.

स्तोत्रसंहिता 45:6-9

देवा [a] तुझे सिंहासन नेहमी साठी आहे.
    चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
तुला चांगुलपणा आवडतो
    आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा,
    तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा [b] राजा निवडले.
तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
    हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
राजांच्या मुली करवल्या आहेत.
    तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.

याकोब 1:17-27

17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते. 18 सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.

ऐकणे आणि आज्ञा पाळणे

19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा. 20 कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.

22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. 24 तो मनुष्या स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25 पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

देवाच्या उपासनेचा मार्ग

26 जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वतःला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

मार्क 7:1-8

देवाचा नियम आणि माणसांनी बनविलेले नियम(A)

काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले. आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले. (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.) बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात.

मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”

येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,

‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात
    परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत,
ते व्यर्थ माझी उपासना करतात
    कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ (B)

तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”

मार्क 7:14-15

14 येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

मार्क 7:21-23

21 जारकर्म, चोरी, खून, 22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, 23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center