Revised Common Lectionary (Semicontinuous)
चांगली स्त्री-ज्ञान
20 ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे. 21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहराच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान [a] (रुपी स्त्री) म्हणते.
22 “तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात? 23 तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
24 “परंतु तुम्ही माझे ऐकायला नकार दिला. मी मदत करायचा प्रयत्न केला. मी माझा हात दिला. पण तुम्ही माझी मदत झिडकारली. 25 तुम्ही दूर गेलात आणि माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही माझे शब्द स्वीकारायला नकार दिलात. 26 म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल. 27 मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओझ्यासारखे वाटेल.
28 “या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही. 29 मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. 30 तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही. 31 म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
32 “मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो. 33 परंतु जो माझी आज्ञा पाळतो तो सुरक्षित राहातो. तो समाधानी असतो. त्याला वाईट गोष्टींची भीती बाळगायचे कारण उरत नाही.”
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
ज्या गोष्टी आपण बोलतो त्यावर ताबा ठेवणे
3 माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.
2 मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे. 3 आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचे संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेऊ शकतो. 4 किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते. 5 त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते.
फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते! 6 होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती नरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
7 पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिराळ्या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे. 8 पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. ती फार चंचल, भयंकर, हिंस्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली असते. 9 आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो! 10 एकाच तोंडातून आशीर्वाद निघतात व शापही निघतात. माझ्या बंधूंनो, हे असे असू नये. 11 एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही. 12 माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही.
पेत्र म्हणतो की येशू हा रिव्रस्त आहे(A)
27 मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पै कैसरीयाच्या आसपासच्या खेड्यात गेले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही जण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.”
29 मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?”
पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”
30 येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(B)
31 तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. 32 त्याने हे स्पष्टपणे सांगितले,
तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला. 33 परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”
34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे. 35 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36 मनुष्याने सर्व जग मिळविले व जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 37 जिवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? 38 या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
2006 by World Bible Translation Center