Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 17:1-18:12

होशेचे इस्राएलवर राज्य

17 एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले. परमेश्वराने ज्या कृत्यांचा निषेध केला होता तीच कृत्ये होशेने केली. पण या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.

अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.

पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.

मग अश्शूरचा राजा इस्राएलमधून चाल करत शोमरोनमध्ये येऊन ठेपला. त्याने शोमरोनशी तीन वर्षे लढा दिला. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले. मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले. इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावून लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली. इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.

लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली. 10 प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले. 11 या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला. 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.

13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”

14 पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. 15 या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बजावून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होते तेच ही राष्ट्रे करत होती.

16 परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली. 17 आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वतःलाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. 18 या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.

यहूदा लोकांचेही अपराध

19 पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.

20 परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले. 21 दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले. 22 यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली. 23 परमेश्वराने त्यांना नजरेआड करीपर्यंत त्यांनी पापे करणे सोडले नाही. परमेश्वराने असे होणार हे भाकीत वर्तवले होतेच. ते सांगायला त्याने संदेष्ट्यांनाही पाठवले होते. तेव्हा इस्राएल लोकांची त्यांच्या प्रदेशातून अश्शूरमध्ये हकालपट्टी करण्यात आली. आजतागायत ते तिथेच आहेत.

शोमरोनी लोकांची सुरुवात

24 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना शोमरोनमधून बाहेर काढले. त्यानंतर या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हामाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनमध्ये त्यांना वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि त्या भोवतालच्या गावांमध्ये ते राहू लागले. 25 या लोकांनी त्या प्रदेशात राहू लागल्यावर परमेश्वराचा मान राखला नाही. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायला परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या सिंहांनी काहीजणांचा बळी घेतला. 26 काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”

27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “शोमरोनमधून काही याजकांना तुम्ही आणले आहे. तरी अटक करुन आणलेल्यांपैकी एका याजकाला तिथे पाठवा. त्याला तिथे राहू द्या. तो मग लोकांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकवेल.”

28 तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.

29 पण या लोकांनी स्वतःच्या दैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पुजास्थळामध्ये त्या ठेवल्या. सर्वत्र त्यांनी असेच केले. 30 बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली, 31 अव्वी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावीम लोकांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.

32 पण तरी त्यांनी परमेश्वराविषयी आदर बाळगला. उंचस्थानातील पुजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. 33 परमेश्वराविषयी आदर बाळगून ते आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रांत ते करीत तसेच इथेही करीत.

34 आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत. 35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत. 36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. 37 त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये. 38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. 39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”

40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. 41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वतःच्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.

यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ

18 अहाजचा मुलगा हिज्कीया हा यहूदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशे याच्या इस्राएलवरील सत्तेचे तेव्हा तिसरे वर्ष होते. हिज्कीया पंचवीस वर्षाचा असताना राज्यावर आला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. [a] ही जखऱ्याची मुलगी.

आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच हिज्कीयाचे वर्तनही परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते.

हिज्कीयाने उंचस्थानावरील पुजास्थळे नष्ट करुन टाकली. तसेच स्मृतिस्तंभ, आणि अशेराचे खांबही पाडून टाकले. इस्राएलचे लोक तेव्हा मोशेने केलेल्या पितळी सापापुढे धूप जाळत असत. या पितळी सापाला “नहुश्तान” [b] म्हणत. लोक याची पूजा करत म्हणून हिज्कीयाने त्याचे तुकडे तुकडे केले.

इस्राएलचा देव परमेश्वर याच्यावरच हिज्कीयाचा विश्वास होता. हिज्कीयासारखा राजा यहूदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ त्याची परमेश्वरावर निष्ठा होती. त्यात त्याने खंड पडू दिला नाही. मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे हिज्कीयाने पालन केले. परमेश्वर हिज्कीयाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले.

अश्शूरच्या राजाविरुध्द बंड करुन हिज्किीयाने त्याचे मांडलिकत्व नाकारले. थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.

अश्शूरांचा शोमरोनला वेढा

अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिज्कीयाच्या यहूदावरील सत्तेच्या चौथ्या वर्षी (म्हणजेच एलाचा मुलगा होशे याचे इस्राएलवरच्या अधिपत्याचे सातवे वर्ष असताना) हे झाले. 10 तीन वर्षांनी शल्मनेसरने शोमरोन घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. (आणि अर्थातच इस्राएलचा राजा होशे याच्या नवव्या वर्षी.)

11 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजनमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले. 12 इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 20

पौल मासेदिनिया व ग्रीसला जातो

20 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजत दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला. त्या ठिकाणी तो तीन माहिने राहिला.

पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर काही लोक होते ते असे: बिरुया शहराच्या पुरर्ाचा मुलगा सोपत्र. थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली. बखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.

पौलाची त्रोवसला शेवटची भेट

मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी [a] एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला. वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.

10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरुन म्हणाला, “चिंता करु नका! त्याच्यात अजून जीव आहे.” 11 मग पौल वर गेला. त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. 12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.

त्रोवसापासून मिलेतापर्यंत प्रवास

13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. 14 जेव्हा आम्हांला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो. 15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुले नाहून निघालो व खियासमोर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेतला आलो. 16 कारण पौलाने ठरविले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणसाठी त्याला यरुशलेम येथे राहावयास हवे होते.

पौल इफिस येथील वडीलजनंशी बोलतो

17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.

18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हांना माहीत आहे. 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21 पश्चाताप करुन देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.

22 “आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो 24 मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे-ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

25 “राच्याची करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हांतील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26 म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28 तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. 30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हांला शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. 31 यासाठी सावध राहा. तुम्हांतील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रु आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.

32 “आणि आता मी तुम्हांला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे. 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.’”

36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दु:ख झाले, मग ते त्याला जहाजापर्चंत निरोप देण्यास गेले.

स्तोत्रसंहिता 148

148 परमेश्वराची स्तुती करा.

स्वर्गातल्या देवदूतांनो
    स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
    त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
    ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
    आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
    का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
    त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
    देवाने कधीही न संपणारे नियम केले.
पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
    महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
    आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
    आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
    पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
    त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
    देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
    त्याच्या नावाला सदैव मान द्या.
    स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
    लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
    हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्र

नीतिसूत्रे 18:6-7

मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वतःवर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.

मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वतःचाच नाश करुन घेतो. त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center