Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 6-7

अलीशा आणि कुऱ्हाड

एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते. यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.”

अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”

एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.”

अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”

तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले. झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”

अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?”

तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले. अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.

आरामच्या राजाचा इस्राएलच्या राजावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.”

पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. तेथे अरामी सैन्य लपून बसले आहे.”

10 ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.

11 या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”

12 तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”

13 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “कुठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!”

तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला, अलीशा दोथानमध्ये असल्याचे सांगितले.

14 मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला. 15 अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले.

अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”

16 अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”

17 आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”

परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.

18 हे अग्नीरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.”

अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले. 19 अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.

20 ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.”

परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले. 21 इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”

22 अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.”

23 इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्राएलवर आली नाही.

शोमरोन मधील भयंकर दुष्काळ

24 या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला. 25 या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.

26 असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”

27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तर मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.” 28 मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली.

ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.’ 29 तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”

30 बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दु:खाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले. तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले. तेव्हा तो दु:खी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले.

31 राजा म्हणाला, “आज दिवस मावळे पर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”

32 राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत बसली होती. हा दूत तेथे पोंचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”

33 अलीशा हे बोलत असतानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”

अलीशा म्हणाला, “परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो ‘ऊद्या या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.’”

तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.”

अलीशा त्याला म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”

अरामी छावणी रिकामी असल्याचे कोडग्रस्त माणसांना आढळते

वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, “आपण मृत्यूची वाट पाहात इथे कशाला बसलो अहोत? शोमरोनमध्ये अन्नाचे दुर्भिक्ष आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ.”

तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही. परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांना आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊ करुन आपल्यावर चाल करुन पाठवलेले दिसते.”

आणि अरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळीच तेथून पळ काढला. आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसेच टाकून ते प्राणभयाने तिथून पळाले.

शत्रूच्या छावणीत कुष्ठरोगी

शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणे-पिणे केले. तिथले कपडे-लत्ते आणि सोने चांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली. आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडे पर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाही तर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची वर्दी देऊ.”

ही कुष्ठग्रस्त माणसे शुभवर्तमान देतात

10 मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारुन म्हणाली, “आम्ही अराम्यांच्या छावणीवर गेलो होतो, पण तिथे कुणाचीच चाहूल लागली नाही. एकही माणूस तिथे नव्हता. तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती. माणसांचा मात्र पत्ता नव्हता.”

11 तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करुन महालातील लोकांना ही खबर दिली. 12 रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”

13 यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहून येऊ द्या. गावात माणसे कशीबशी तग धरुन आहेत, तसेच हे घोडे एवीतेवी मरणारच आहेत.”

14 तेव्हा दोन रथ जोडून काही माणसे निघाली. राजाने त्यांना अरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायला सांगितले.

15 हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदी पर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाई घाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तूटाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.

16 तेव्हा लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांना एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.

17 आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा त्याने जे जे सांगितले त्या बरहुकूमच हे घडले. 18 अलीशाने सांगितले होते, “लोकांना मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.” 19 पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.” 20 त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नेमके तसेच झाले. लोक वेशीपाशी त्याला तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला.

प्रेषितांचीं कृत्यें 15:36-16:15

पौल व बर्णबा वेगळे होतात

36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”

37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते. 38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते 39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.

40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. 41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.

तीमथ्य पौल व सीला यांच्यासह जातो

16 पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला. तेथे रिव्रस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तीमथ्य, तो होता. तीमथ्याची आई एक यहूदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता. तीमथ्याविषयी लुस्त्र व इकुन्या येथील बंधुजनांचे फार चांगले मत होते. तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की, तीमथ्याचे वडील ग्रीक (यहूदीतर) आहेत. म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली.

मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. मग मंडळ्या विश्वासात भक्कम होत गेल्या व संख्येतदेखील त्या वाढत गेल्या.

पौलाला आशियातून बोलावतात

पौल व त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया व गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले. पौल व तीमथ्य मिसिया देशाच्या जवळ गेले. त्यांना बिथनीया प्रांतात जायचे होते. पण येशूच्या आत्म्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.

त्या रात्री पौलाने एक दृष्टान्त पाहिला, या दृष्टान्तामध्ये “मसेदोनियाला या आणि आम्हांला मदत करा!” अशी विनंति मासेदिनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. 10 पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.

लीदीयाच्या मनाचा पालट

11 नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो. 12 नंतर आम्ही फिलिप्पैला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.

13 शब्बाथवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरुन तेथे जाऊन बसलो, आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. 14 त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती, ती किरमीजी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे, ती चांगली देवभक्त होती. लीदीयाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतःकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. 15 तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हांला तिच्या घरी बोलाविले, ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभु येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हांला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली.

स्तोत्रसंहिता 142

दावीदाचे मास्कील तो गुहेत असतानाची प्रार्थना.

142 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन.
    मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन.
    मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे
    मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
    पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.

मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत.
    पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही.
    मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो.
    परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
परमेश्वरा, माझी प्रार्थना
    ऐक मला तुझी फार गरज आहे.
जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव.
    ते लोक मला फार भारी आहेत.
हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर,
    म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन.
चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील
    कारण तू माझी काळजी घेतलीस.

नीतिसूत्रे 17:24-25

24 शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.

25 मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center