Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 9:14-10:31

येहू इज्रेल येथे जातो

14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला.

यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. 15 राजा योरामने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता.

तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”

16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता.

17 इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारेकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावानिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय”

योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”

18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?”

येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागोमाग ये.”

पहरेकऱ्याने योरामला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”

19 तेव्हा योरामने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहू कडे आला आणि राजा योरामच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले.

येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”

20 पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.”

21 योरामने मग स्वतःचा रथ तयार ठेवण्यास सांगितले.

तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची येहूशी गाठ पडली.

22 येहूला पाहून योरामने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?”

येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”

23 योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”

24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाहुंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.

25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? 26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले, तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”

27 यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.”

तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला. 28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरुशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.

29 योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्ष चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.

ईजबेलचा निघृण वध

30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. 31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”

32 येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!”

तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. 33 येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.”

तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरुन चालून गेले. 34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”

35 लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तीचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले. 36 तेव्हा लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलिया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलिया म्हणाला होता. ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील. 37 शेणखता सारखा तिचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांना तिचे प्रेत ओळखू येणार नाही.’”

शोमरोनच्या वडीलधाऱ्यांना येहूचे पत्र

10 शोमरोनमध्ये अहाबला सत्तर मुलगे होते. शोमरोनमधील अधिकारी आणि वडीलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. तसेच ज्यांनी या अहाबच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले. 2-3 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्या जवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल त्याला त्याच्या बापाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”

पण हे वाचून ती अधिकारी आणि वडीलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुध्द येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्याला अडवणार?”

मग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”

शोमरोनच्या अधिकाऱ्यांकडून अहाबच्या मुलांची हत्या

येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबच्या मुलांचा शिरच्छेद करा. ऊद्या साधारण याच वेळेला त्यांना माझ्याकडे आणा.”

अहाबला सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते. या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या सर्वच्यासर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या इज्रेलला येहूकडे पाठवल्या. निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.”

त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करुन सकाळपर्यंत तिथे ठेवा.”

सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत. 10 परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करुन दाखवल्या आहेत.”

11 आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.

अहज्याच्या नातलगांचा वध

12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. 13 यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?”

ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”

14 तेव्हा येहू आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.”

तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.

येहूची यहोनादाबशी भेट

15 तिथून निघाल्यावर येहूला रेखाबचा मुलगा यहोनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?”

यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.”

येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.”

आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.

16 येहू यहोनादाबला म्हणाला, “चल माझ्या बरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.”

तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. 17 शोमरोनला पोंचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.

बाल देवतेच्या पूजकांना येहू बोलावतो

18 येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबने बालची थोडी सेवा केली. पण येहू मात्र बालची बरीच सेवा करणार आहे. 19 आता बालच्या सर्व पुरोहितांना आणि संदेष्ट्यांना बोलावून घ्या. तसेच जे जे बालची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बालसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की”

येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बालच्या पूजकांचा संहार करायचा होता. 20 येहू म्हणाला, “बालसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली. 21 येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बालचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बालच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.

22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बालच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वांसाठी वस्त्रे दिली.

23 मग येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब बालच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बालच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करुन घ्या. बालची पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.” 24 यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले.

बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”

25 स्वतः यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.”

तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बालदेवळाच्या गर्भगृहात गेले 26 स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि देऊळ जाळले. 27 बालच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बालच्या देवळाचाही विद्धवंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करुन टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.

28 अशा प्रकारे इस्राएलमधली बालची पूजा येहूने मोडून काढली. 29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.

इस्राएलवर येहूचे राज्य

30 परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.”

31 पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मनःपूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वतःला थोपवू शकला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 17

थेस्सलनीका येथे पौल

17 पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते. यहूदी लोकांना भेटण्यासाठी पौल सभास्थानात गेला. तो असे नेहमीच करीत असे. तीन आठवडे प्रत्येक शब्बाथवारी पवित्र शास्त्राविषयी पौलाने यहूदी लोकांशी चर्चा केली. पौलाने पवित्र शास्त्रातील वचने यहूदी लोकांना स्पष्ट करुन सांगितली. त्याने दाखवून दिले की, रिव्रस्ताने मरणे अगत्याचे होते. तसेच त्याचे मरणातून उठणेही अगत्याचे होते. पौल म्हणाला, “हा मनुष्य ‘येशू’ ज्याच्याबद्दल मी तुम्हांला सांगत आहे तो ‘ख्रिस्त’ आहे.” सभास्थानांमध्ये काही ग्रीक लोक होते, जे खऱ्या देवाची उपसाना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सीला यांना जाऊन मिळाले.

पण ज्या यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नव्हता, ते जळफळू लागले. शहरातून काही दुष्ट माणसांना त्यांनी भाड्याने आणले. त्या दुष्ट माणसांनी आणखी लोकांना जमा केले व शहरात अशांतता निर्माण केली. लोक यासोनाच्या घरी गेले. पौल व सीला यांचा शोध घेत ते गेले. त्या लोकांची अशी इच्छा होती की, पौल व सीला यांना लोकांसमोर आणायचे. पण त्यांना पौल व सीला सापडले नाहीत. म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाल, “या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली. आणि आता ते येथेसुद्धा आले आहेत! यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्या [a] नियमांविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की, आणखी एक राजा आहे. त्याचे नाव येशू आहे.”

शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले. ते खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले.

पौल व सीला बिरुया येथे जातात

10 त्याच रात्री विश्वासणाऱ्यांनी पौल व सीला यांना बिरुया नावाच्या दुसऱ्या शहरी पाठविले. बिरुयामध्ये पौल व सीला यहूदी सभास्थानामध्ये गेले. 11 हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते. 12 यातील पुष्कळ यहूदी लोकांनी विश्वास ठेवला. पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी (ज्यांना समाजात महत्व होते.) त्यांनीसुद्धा विश्वास ठेवला.

13 परंतु जेव्हा थेस्सलनीका येथील यहूदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेस्सलनीका येथील यहूदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैराण केले व त्रास दिला. 14 म्हणून विश्वासणाऱ्यांनी पौलाला ताबडतोब सुमुद्राकडे नेले. पण सीला व तीमथ्य तेथेच राहिले. 15 विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेनै शहरात आणले. या बांधवांनी पौलचा संदेश जो सीला व तीमथ्यासाठी होता, तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते. ʇतुम्हांला शक्य होईल तितक्या लवकर माइयाकडे या.

अथेनै येथे पौल

16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले. कारण त्याने पाहिले की, ते शहर मूर्तीनी भरलेले आहे. 17 सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे. 18 काही एपिकूरपंथी व स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.

त्यांच्यातील काही म्हणाले, “या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, “असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे.”

19 त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्या [b] सभेपुढे नेले ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा. 20 तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.” 21 (अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).

22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!

24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.

27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’

29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”

32 जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!” 33 पौल त्यांच्यापासून निघून गेला. 34 पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले. त्यांच्यापैकी एक दिओनुस्य होता. तो अरीयपगा सभेचा सभासद होता. दामारि नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला. आणखीही काही लोक होते, ज्यानी विश्वास ठेवला.

स्तोत्रसंहिता 144

दावीदाचे स्तोत्र

144 परमेश्वर माझा खडक आहे.
    परमेश्वराला धन्यवाद द्या.
परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो.
    परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
    परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे.
परमेश्वर माझी सुटका करतो.
    परमेश्वर माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवतो.
    परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.

परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात?
    आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो?
माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत,
    माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली.

परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये,
    पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव,
    तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव.
    मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस.
    मला त्या परक्यांपासून वाचव.
हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन.
    मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो.
    परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
11 मला या परक्यांपासून वाचव.
    हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत.
    आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत.
    आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
14     आमचे सैनिक सुरक्षित आहेत.
कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रयत्न करीत नाही.
    आम्ही लढाईवर जात नाही.
    आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.

15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात.
    जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

नीतिसूत्रे 17:27-28

27 शहाणा माणूस शब्द काळजीपूर्वक वापरतो. शहाणा माणूस लवकर रागावत नाही.

28 मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center