Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 8:1-9:13

अलीशा त्या शूनेमच्या बाईला स्थलांतर करायला सांगतो

अलीशामुळे जो मुलगा जीवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”

तेव्हा अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊन सात वर्षे राहिली. सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली.

मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.

अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपा करुन मला सांग.”

अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती बाई राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती बाई आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”

राजाने त्या बाईची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली.

राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”

बेन-हदाद हजाएलला अलीशाकडे पाठवतो

अलीशा दिमिष्क येथे गेला. आरामचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्याला सांगितले, “आपल्या इथे एक संदेष्टा आला आहे.” तेव्हा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वराला विचारायला त्याला सांग.”

तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामचा राजा बेनहदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”

10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ [a] पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.”

अलीशाचे हजाएलबद्दल भविष्यकथन

11 एवढे बोलून मग देवाच्या माणसाने, हजाएल शरमिंदा होईपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशाला रडू फुटले. 12 हजाएलने त्याला विचारले, “तुम्ही का रडत आहात?”

अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”

13 हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!”

अलीशा म्हणाले, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”

14 मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?”

हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”

हजाएलकडून बेन-हदादचा वध

15 पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.

यहोरामच्या कारकीर्दीची सुरवात

16 यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला. 17 त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरुशलेमवर त्याने आठ वर्षे राज्य केले. 18 पण इस्राएलच्या इतर राजांप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची बायको अहाबची मुलगी होती म्हणून त्याने तसे केले. 19 पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहुद्यांचा नाश केला नाही. दावीदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दावीदाला दिले होते.

20 यहोरामच्या कारकिर्दीत अदोम यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वतःच राजाची निवड केली.

21 तेव्हा यहोराम आपले सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्याला वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामचे लोक पळाले आणि घरी परतले. 22 अशाप्रकारे अदोमी यहूदांच्या सत्ते पासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत.

सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.

23 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात यहोरामने जे जे केले त्याची नोंद आहे.

24 यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.

अहज्याच्या कारकिर्दीची सुरवात

25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामचा मुलगा अहज्या यहुदाचा राजा झाला. 26 त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेममध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी. 27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबचा जावई होता. त्यामुळे अहाबच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.

हजाएलशी झालेल्या लढाईत योराम जखमी होतो

28 अहाबचा मुलगा योराम याच्या बरोबर अहज्या रामोथ गिलाद येथे अरामचा राजा हजाएल याच्यावर चढाई करुन गेला. अराम्यांनी योरामला जखमी केले. 29 तेथे झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी म्हणून राजा योराम इस्राएलला परत गेला. इज्रेलच्या प्रदेशात तो गेला. त्याला भेटायला यहोरामचा मुलगा अहज्या ही इज्रेलला गेला.

येहूचा अभिषेक करण्याचा अलीशाचा एका संदेष्ट्याच्या मुलाला आदेश

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा. तेथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”

तेव्हा हा तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे आला तेथे पोचल्यावर त्याला सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.”

येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कुणासाठी आहे?”

तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”

यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, ‘इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे. तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. म्हणजे अहाबचे घराणे नष्ट होईल. अहाबच्या घराण्यात एकही पुरुष संतान जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबच्या घराण्याची मी गत करुन टाकीन. 10 ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही.’”

एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.

येहूला राजा म्हणून सेवक घोषित करतात

11 येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?”

येहू त्यांना म्हणाला, “तो माणूस आणि त्याच वेडपट बोलणं तुम्हाला माहीत आहेच.”

12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाल ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा मग तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.’”

13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 16:16-40

पौल व सीला तुरुंगात

16 एकदा आम्ही प्रार्थनेला जात असताना. एक दासीकाम करणारी मुलगी आम्हांना भेटली, तिच्या अंगात येत असे [a] ती दैवप्रश्ना सांगून आपल्या घरधन्यास पुष्कळ मिळकत करुन देत असे. 17 ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, “हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!” 18 तिने हे असे बरेच दिवस केले. त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, “येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने, मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ!” ताबडतोब तो आत्मा बाहेर आला.

19 ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की, आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करु शकणार नाहीत. म्हणून त्यांनी पौल व सीला यांना धरुन शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते. 20 त्या लोकांनी पौल व सीला यांना पुढाऱ्यांपुढे आणले, व ते म्हणाले, “हे लोक यहूदी आहेत. आपल्या शहरात ते त्रास देत आहेत. 21 आमच्यासाठी च्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यासाठी ते लोकांना सांगत आहेत. आम्ही रोमी नागरिक आहोत व या गोष्टी आम्ही करणार नाही.”

22 लोक पौल व सीला यांच्याविरुद्ध होते. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सीलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की, त्यांना काठीने मारा. 23 लोकांनी पौलाला व सीला यांना पुष्कळ मारले. मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुंरुंगात टाकले, पुढाऱ्यांनी तुंरुंगाधिकाऱ्याला सांगितले, “फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा!” 24 अधिकाऱ्याने तो खास आदेश मिळाल्यावर पौल व सीला यांना तुरुंगात आत दूरवर ठेवले. त्याने त्यांचे पाय लाकडाच्या ओंडक्यांमध्ये बांधले.

25 मध्यरात्रीच्या वेळी पौल व सीला, देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. 26 अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुगाचे पाये डळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली. 27 तुरुंगाधिकारी जागा झाला. त्याने पाहिले की, तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील म्हणून अधिकाऱ्याने आपली तरवार काढली, तो स्वतःला मारणार होता 28 इतक्यात पौल ओरडला, “स्वतःला इजा करुन घेऊ नकोस आम्ही सर्व येथेच आहोत!”

29 अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले. मग तो आतमध्ये पळाला. तो थरथर कापत होता. तो पौल व सीला यांच्यापुढे पडला. 30 मग त्यांने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?”

31 ते त्याला म्हणाले, “प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल-तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल.” 32 पौलाने व सीलाने तुरुंगाधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्यालासुद्धा प्रभूचा संदेश सांगितला. 33 त्या वेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्यांने पौल व सीला यांच्या जखमा धुतल्या. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला. 34 नंतर त्याने पौल व सीला यांना घरी नेले व अन्न खावयास दिले. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते. कारण ते आता देवावर विश्वास ठेवीत होते.

35 दुसऱ्या दिवशी सकाळी पुढाऱ्यांनी काही शिपायांना पाठविले व तुरुंगाधिकाऱ्याला निरोप दिला की, “त्या लोकांना (पौल व सीला) यांना मोकळे सोडा!”

36 तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”

37 परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला, “तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही. परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले. आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत. आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे. नाही! पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे!”

38 शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला, ते सांगितले, जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सीला रोमी नागारिक आहेत, तेव्हा ते घाबरले. 39 मग पुढाऱ्यांनी येऊन त्यांची क्षमा मागितली. पुढाऱ्यांनी येऊन त्यांना सोडविले व शहर सोडण्याविषयी सांगितले. 40 पण जेव्हा पौल व सीला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लीदीयाच्या घरी गेले. त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले, व त्यांना धीर दिला, मग पौल व सीला गेले.

स्तोत्रसंहिता 143

दावीदाचे स्तुतिगीत.

143 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे
    आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
    तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस.
    कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही.
पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत.
    त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे.
    ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत.
मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
    माझा धीर सुटत चालला आहे.
पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत.
    तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो.
    तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे.
परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो.
    तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.

परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे.
    माझा धीर आता सुटला आहे.
माझ्यापासून दूर जाऊ नकोस.
    मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.
परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव.
    माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव.
    मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो.
    माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
10 मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव.
    तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.
11 परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
    तू खरोखरच चांगला आहेस हे
मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
12 परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव.
    जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांचा पराभव कर.
    का? कारण मी तुझा सेवक आहे.

नीतिसूत्रे 17:26

26 काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center