Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GNT. Switch to the GNT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 1-2

अहज्यासाठी संदेश

अहाबच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएल पासून वेगळा झाला.

एकदा अहज्या आपल्या शोमरोनमधल्या घराच्या माडीवर बसला होता. तेव्हा तिथल्या लाकडी कठडयावरुन तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. अहज्याने मग आपल्या सेवकांना बोलावले आणि सांगितले. “एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्या पुरोहितांना मी या दुखण्यातून बरा होईन का ते विचारुन या.”

पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “राजा अहज्याने शोमरोनहून आपले काही दूत रवाना केले आहेत. त्यांना जाऊन भेट त्यांना म्हण, ‘इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तेव्हा एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारायला का जाता? राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.’” मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला.

तेव्हा ते दूत अहज्याकडे आले. अहज्याने त्यांना विचारले, “तुम्ही एवढ्या लौकर कसे आलात?”

ते अहज्याला म्हणाले, “आम्हाला एकजण भेटायला आला होता. त्याने आम्हाला तुमच्याकडे परत येऊन परमेश्वराचा हा निरोप सांगायला सांगितले, ‘इस्राएलात परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना का पाठवलेस? ज्याअर्थी तू असे केलेस त्याअर्थी तू आता बरा होणार नाहीस. तू मृत्यू पावशील.’”

अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”

तेव्हा ते दूत म्हणाले, “तो एक केसाळ माणूस होता आणि त्याने कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.”

तेव्हा अहज्या म्हणाला, “म्हणजे तो एलीया तिश्बी होता.”

अहज्याने पाठवलेले सरदार आगीत भस्मसात

अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. हा सरदार एलीयाकडे गेला. एलीया तेव्हा एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या), राजाने तुला खाली बोलावले आहे.”

10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.”

तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.

11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.’”

12 एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.”

तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्न झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.

13 अहज्याने तिसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस. 14 आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”

15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदाराबरोबर जा व त्याला भिऊ नकोस.”

तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.

16 एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”

अहज्याच्या जागी यहोराम

17 अहज्या मरण पावला. परमेश्वराने एलीयाला सांगितले होते तसेच झाले. अहज्याला मुलगा नव्हता. तेव्हा अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदावर राज्य करत असताना दुसऱ्या वर्षी हा यहोराम राज्य करु लागला.

18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्या ने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली आहेत.

एलीयाला घेऊन जाण्याची परमेश्वराची योजना

एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला.

एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.”

पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले.

तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?”

अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”

एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.”

पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.

तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?”

अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”

एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.”

अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले.

संदेष्ट्यांपैकी पन्नास जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलीया आणि अलीशा यार्देन नदीजवळ थांबले. ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले. एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.

नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.”

अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”

10 एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.”

परमेश्वर एलीयाला स्वर्गात नेतो

11 एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.

12 अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”

अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले. 13 एलीयाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलीशाने उचलला. अलीशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले, “एलीयाचा परमेश्वर देव कुठे आहे?” 14 अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.

संदेष्ट्यांकडून एलीयाची चौकशी

15 यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलीशाला पाहिल्यावर ते म्हणाले, “एलीयाच्या आत्म्याचा आता अलीशात प्रवेश झाला आहे.” ते सर्वजण अलीशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले. 16 मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.”

पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”

17 पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.”

मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. 18 शेवटी ती माणसे यरीहो येथे अलीशा राहात होता तेथे आली. एलीयाचा शोध लागत नाही असे त्यांनी अलीशाला सांगितले. तेव्हा आपण या गोष्टीला नको म्हणत होतो असे अलीशाने त्यांना सांगितले.

अलीशाकडून पाण्याचे शुध्दीकरण

19 एकदा त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “हे नगर फार चांगल्या ठिकाणी वसले आहे हे तुम्ही पाहताच आहात पण इथले पाणी खराब आहे. त्यामुळे या जमिनीत पिके निघू शकत नाहीत.”

20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यात मीठ घाला.”

तेव्हा लोकांनी एक पात्र त्याला दिले. 21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला. तिथे त्याने मीठ टाकले. मग तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘आता हे पाणी मी शुध्द करत आहे. आता या पाण्याने मृत्यू ओढवणार नाही की पिकाची वाढ खुंटणार नाही.’”

22 अशाप्रकारे पाणी शुध्द झाले ते पाणी अजूनही चांगले आहे. अलीशा म्हणाला होता तसेच झाले.

अलीशाची मुलांकडून चेष्टा

23 अलीशा मग त्या नगरातून बेथेलला आला. तो डोंगर चढून जात होता आणि काही मुले गावातून डोंगर उतरत होती. त्यांनी अलीशाची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”

24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि शापवाणी उच्चारली. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वले बाहेर आली आणि त्यांनी या मुलांवर हल्ला केला. बेचाळीस मुलांचा त्या अस्वलांनी चिंधड्या केल्या.

25 अलीशाने बेथेल सोडून कर्मेल डोंगराचा रस्ता धरला. आणि तिथून मग तो शोमरोनला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 13:42-14:7

42 जेव्हा पौल व बर्णबा (सभास्थानातून) जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा. 43 सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.

44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हांला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करुन घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करुन घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ! 47 प्रभूने आम्हांला हे करण्यास सांगितले आहे. प्रभु म्हणाला:

‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की,
    तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’” (A)

48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाचा त्यांनी बहुमान केला. आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.

49 आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. 51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली. व ते इकुन्या शहराला गेले. 52 पण अंत्युखियातील येशूचे अनुयायी आनंदाने व पवित्र आत्म्याने भरुन गेले होते.

इकुन्या येथे पौल व बर्णबा

14 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. (प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत) तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा इतके चांगले बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.

म्हणून पौल व बर्णबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदूभुत कृत्ये करण्यास मदत करुन ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले. परंतु शहरातील काही लोकांना यहूदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना पौल व बर्णबाचे म्हणणे पटले. (त्यानी विश्वास ठेवला) त्यामुळे शहरात दोन तट पडले.

काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करुन मारावयाचे होते. जेव्हा पौल व बर्णबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली.

स्तोत्रसंहिता 139

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.

139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
    तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
    तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
    मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
    ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
    माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
तुला जे सर्वकाही माहीत आहे
    त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो.
    परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे
    तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस.
    मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो.
    आणि तू मला हाताने धरुन नेतोस.

11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन,
    “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही
    तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
    मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
    तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.

15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
    माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
    तू माझी रोज पाहणी केलीस.
    त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
    देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
    आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.

19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक.
    त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात.
    ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.
    जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो.
    तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि
    माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ
    आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.

नीतिसूत्रे 17:19-21

19 ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वतःचीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.

20 वाईट माणसाला नफा होणार नाही. जो माणूस खोटे बोलतो त्याच्यावर संकटे येतील.

21 मूर्ख मुलगा असलेले वडील दु:खी होतील. मूर्खाचे वडील सुखी नसतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center