Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 5-6

शलमोन मंदिर उभारतो

हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले. शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.

“माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते. परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही.

“परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या सिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”

हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.” मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला:

“तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईन. माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”

10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली.

11 आणि शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले. 12 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.

13 शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली. 14 अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. 15 ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती. 16 या कामकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती. 17 त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले. 18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.

मंदीराची बांधणी

अशा तऱ्हेने शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याला 480 वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथे वर्षे होते. वर्षाचा दुसरा महिना जिव चालू होता. मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. मंदिराची देवडी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. मंदिराची देवडी 30 फूट लांब आणि 15 फूट रुंद होती. मंदिराच्या रुंदीइतकीच या देवडीची लांबी असून ती मंदिराच्या मुख्य भागाला लागूनच होती. मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या. मंदिराच्या भोवती अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. हे बांधकाम तीनमजली होते. खोल्या मंदिराच्या भिंतीला लागून असल्या तरी त्यांच्या तुळ्या या भिंतीत नव्हत्या. मंदिराच्या भिंतीची रुंदी तळाकडे जास्त असून वर त्या निमुळत्या होत होत्या. त्यामुळे या खोल्यांच्या एका बाजूची भिंत तिच्या खालच्या भिंतीपेक्षा पातळ होती. तळमजल्यावरील खोल्यांची रुंदी साडेसात फूट, पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांची 9 फूट तर त्यावरच्या खोल्यांची साडे दहा फूट होती. भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले होते. खाणीतूनच ते योग्य मापाने कातून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना होतोड्या, कुऱ्हाही किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.

तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.

शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता. 10 मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची साडेसात फूट होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.

11 यावेळी परमेश्वर शलमोनाला म्हणाला, 12 “माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडील दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन. 13 तू बांधत असलेल्या या मंदिरात इस्राएलपुत्रांमध्ये माझे वास्तव्य राहील. इस्राएलच्या लोकांना सोडून मी जाणार नाही.”

14 शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले. 15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती. 16 मंदिराच्या आत मागच्या बाजूला तीस फूट लांबीचा अत्यंतपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या. 17 मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. हा साठ फूट लांब होता. 18 हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे नखभरही दर्शन होत नव्हते. या लाकडावर फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीवकाम केलेले होते.

19 आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या करारकोशासाठी गाभारा करवून घेतला होता. 20 याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी तीस तीस फूट होती. 21 शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोही सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या. 22 अतिपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवले होते.

23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी 15 फूट होती. ते अतिपवित्र गाभाऱ्यात ठेवले. 24-26 हे दोन्ही करुब तंतोतंत एकाच आकाराचे, एकाच मोजमापाचे होते. त्यांना प्रत्येकी दोन पंख असून प्रत्येक पंख साडेसात फूट लांबीचा होता. पसलेल्या दोन्ही पंखांची रुंदी 15 फूट भरत होती. आणि प्रत्येक करुब पंधरा फूट लांबीचा होता. 27 हे करुब देवदूत आतल्या अतिपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते. 28 हे दोन करुब देवदूतही सोन्याने मढवले होते.

29 दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती. 30 दोन्ही खोल्यांची जमीन सोन्याने मढवली होती.

31 जैतूनाच्या लाकडाचे दोन दरवाजे कारागिरांनी करुन ते अतिपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या महिरपीला पाच बाजू होत्या 32 जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.

33 मुख्य भागालाही त्यांनी दरवाजे केले. जैतून लाकडाची चौकट उभारुन 34 फरच्या लाकडाचे दरवाजे केले. 35 कारागिरांनी दोन दरवाजे केले आणि प्रत्येक दार दोन झडपांचे होते त्यामुळे ते दुमडले जात असे. त्यावरही पुन्हा करुब देवदूत, खजुरीची झाडे, फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने आच्छादली होती.

36 मग आतला चौक बांधला. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि देवदाराची एक ओळ अशा त्या भिंती होत्या.

37 वर्षाचा दुसरा महिना जिव तेव्हापासून त्यांनी मंदिराच्या कामाला सुरुवात केली. इस्राएलचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दींचे ते चौथे वर्ष होते. 38 बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पण शलमोनाचे ते सत्तेवरचे अकरावे वर्ष होते. म्हणजेच मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.

प्रेषितांचीं कृत्यें 7:1-29

स्तेफनाचे भाषण

प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?” स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते. देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’ [a]

“म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात. परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल. व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले.

“देव त्याला म्हणाला, ‘तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुइयावंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना चारशे वर्षे वाईट रीतीने वागवतील. परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ [b] देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’ [c]

“देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.

“या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.

12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.

17 “देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. 18 शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला. 19 त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.

20 “त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला. 21 आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल. 22 इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.

23 “जेव्हा तो चाळीस वर्षांचा झाला, त्याने विचार केला की, आपले बांधव, जे यहूदी लोक त्यांना जाऊन भेटावे, 24 आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. 25 देव त्याच्या हातून यहूदी लोकांची सुटका करीत आहे, हे यहूदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही.

26 “दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’ 27 परंतु जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारुन म्हटले, ‘आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? 28 काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस; तसाच माझाही जीव घेण्याचे तुइया मनात आहे का?’ [d] 29 जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले.

स्तोत्रसंहिता 127

शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
    तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
    तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.

भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
    रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
    त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.

मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
    आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
    भात्यातील बाणांसारखी आहेत.
जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
    त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.

नीतिसूत्रे 16:28-30

28 संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो.

29 जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो. 30 जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center