Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 15-16

अजऱ्याची यहूदातील कारकीर्द

15 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला. तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती. अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला. परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.

परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.

अजऱ्याने जे केले ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.

जखऱ्याची इस्राएलवर अल्पजीवी कारकीर्द

यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते. जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.

10 मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वतः राज्यावर आला. 11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. 12 अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.

शल्लूमची इस्राएलवर अल्प कारकीर्द

13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.

14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वतः राजा झाला.

15 शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे.

इस्राएलमध्ये मनहेमचे राज्यअल्प

16 शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.

17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले. 18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अधःपात झाला तीच पापे मनहेमने केली.

19 अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली. 20 हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी कररूपाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.

21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.

पेकह्याची इस्राएलवर कारकीर्द

23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले. 24 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अधःपतन झाले तीच पापे पेकह्याने केली.

25 रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.

26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

पेकहाची कारकीर्द

27 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. 28 पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अधःपात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.

29 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.

30 एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.

31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

योथामचे यहूदावर राज्य

32 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते. 33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई. 34 आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता. 35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला. 36 यहूदांच्या राजाचा इतिहास या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.

37 अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.

38 योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.

यहूदाचा राजा आहाज

16 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलचा राजा होता. त्याच्या सतराव्या वर्षी योथामचा मुलगा आहाज यहूदाचा राजा झाला. आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे. त्याची वागणूक इस्राएलच्या राजांसारखी होती. आपल्या मुलालाही त्याने अग्नीतून चालायला लावले. इस्राएली आले तेव्हा परमेश्वराने ज्या लोकांना त्या प्रदेशातून जबरदस्तीने हद्दपार केले त्यांच्यासारखी भीषण कृत्ये आहाजने केली. उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.

अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत. अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.

अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.

10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला. 11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.

12 राजाने दिमिष्काहून येताच वेदी पाहिली. तिच्यावर यज्ञ अर्पण केला. 13 होमार्पण आणि धान्यार्पणही केले. पेयार्पण केले तसेच शांतिअर्पणाचे रक्तही वेदीवर शिंपडले.

14 आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली. 15 मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.” 16 उरीया याजकाने राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.

17 आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला. 18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.

19 यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत. 20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दावीदनगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:13-41

13-14 काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तिमधून प्रभु येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो.” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.

15 परंतु एकदा एक अशुद्ध आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”

16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.

17 इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीति वाटली, आणि लोक प्रभु येशूच्या नावाचा अधिकच आदर करु लागले. 18 पुष्कळसे विश्वासणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. 19 काही विश्वासणान्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वासणान्यांनी आपली जादूची पुस्तके सर्व लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली. 20 अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.

Paul Plans a Trip

21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरुशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोमदेखील पाहिलेच पाहिजे.” 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.

इफिस येथे दंगा

23 याकाळामध्येत्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडला. 24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.

25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले, आणि तो म्हणाला, “लोकहो, तुम्हांला माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. 26 पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत. 27 यामुळे केवळ आपल्या धंद्याची बदनामी होण्याची भीति नसून अर्तमी या महान देवीच्या मंदिराचे महत्व नाहीसे होईल व तिचे मोठेपण नाहीसे होण्याची भीति आहे. ही अशी देवी आहे की, जिची पूजा सर्व आशियात व जगात केली जाते.”

28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले, आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” 29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. 30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्याला असे करु देईनात 31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगुहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.

32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत. 33 यहूदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु लागला. 34 पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”

35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? 36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करु नये.

37 “तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुतःत्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. 38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करु शकतात!

39 “परंतु जर तुम्हांला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. 40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.” 41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.

स्तोत्रसंहिता 147

147 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    आपल्या देवाचे गुणगान करा.
    त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
परमेश्वराने यरुशलेम बांधले,
    इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते.
    त्यांना देवाने परत आणले.
देव त्यांच्या विदीर्ण ह्रदयावर फुंकर घालतो
    आणि त्यांच्या जखमांना मलम पट्टी करतो.
देव तारे मोजतो आणि
    त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
आपला प्रभु खूप मोठा आहे.
    तो फार शक्तीवान आहे.
    त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो.
    परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
परमेश्वराला धन्यावाद द्या.
    आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो.
    देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो.
    देव डोंगरावर गवत उगवतो.
देव प्राण्यांना अन्न देतो,
    देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक
    त्याला आनंद देत नाहीत.
11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो.
    जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.
12 यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर.
    सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.
13 यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो
    आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
14 देवाने तुझ्या देशात शांती आणली.
    म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही.
    आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
15 देव पृथ्वीला आज्ञा करतो
    आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.
16 जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो.
    देव गोठलेले बर्फ धुळीसारखे हवेत उडू देतो.
17 देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो.
    तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही.
18 नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात.
    बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.

19 देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली.
    देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले.
20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
    देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.

परमेश्वराची स्तुती करा.

नीतिसूत्रे 18:4-5

शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात.

लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center