Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 3:3-4:34

शलमोनही आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मनःपूर्वक पालन करुन परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. दावीदाने सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखीही एक गोष्ट तो करत असे. यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.

गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन एकदा यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली. तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला, “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”

शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही. मी तुझा सेवक तू निवडलेल्या अक्षरश: अगणित अशा लोकांपैकी एक आहे. शासकाला तर अनेक निर्णय करावे लागतात. तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”

10 शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला 11 म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वतःसाठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. 12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही. 13 शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान मिळेल आणि तुझ्यासारखा थोर राजा कोणी असणार नाही. 14 मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”

15 शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.

16 एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या. 17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. आम्ही दोघी गर्भवती होतो आणि आमचे दिवस भरत आले होते. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती. 18 तीन दिवसांनंतर ही पण प्रसूत झाली. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहात होतो. 19 एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले. 20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वतःकडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले. 21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”

22 पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत मूलच माझे आहे, मेलेले बाळ तुझे आहे.”

पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्राकरे दोघींचाही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.

23 तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.” 24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले. 25 राजा शलमोन म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करुन त्याचे दोन तुकडे करु आणि दोघींना एक एक देऊ.”

26 दुसरी बाई म्हणाली, “फार छान! बाळाचे दोन तुकडे करा, म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.” पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.”

27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”

28 राजाचा हा निवाडा इस्राएलच्या लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना आदर वाटला. योग्य निर्णय घेण्याचे उच्च कोटीचे परमेश्वरी शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

शलमोनाचे साम्राज्य

समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती. त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सादोकचा मुलगा:

अजऱ्या हा याजक होता

शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते.

अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता.

बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता.

सादोक आणि अब्याथार याजक होते

नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता.

नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.

अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.

अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.

इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी:

बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.

माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.

10 अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.

11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.

12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता.

13 रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दरवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.

14 इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.

15 नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.

16 हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.

17 पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता.

18 एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.

19 उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.

20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती.

21 युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.

22-23 शमोनाला त्याच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांसाठी दररोजच खालील अन्नपदर्थ लागत दीडशे बुशेल मैदा, तीनशेबुशेल कणीक, दहा पुष्ट गुरे, कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरण, सांबर, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.

24 युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती. 25 दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.

26 रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते. 27 शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. 28 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.

शलमोनाची सूज्ञता

29 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती. 30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. 31 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते. 32 आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.

33 निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. 34 देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.

प्रेषितांचीं कृत्यें 6

विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते

अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.

प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”

बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.

देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.

स्तेफनाविरुद्ध यहूदी लोक

स्तेफन (सात लोकांपैकी एक) यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्ध्य दिले होते. परंतु काही यहूदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहूदी सभास्थानातून [b] आले होते. त्याला लिबर्तीनांसाठी सभास्थान असे म्हणत. (हे सभास्थान कुरेने, आणि अलेक्सांद्र येथील यहूदी लोकांसाठी सुद्धा होते). किलीकिया व आशियातील यहूदीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफानबरोबर वाद घालू लागले. 10 परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहूदी लोकांचा टिकाव लागेना.

11 तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.” 12 त्यामुळे लोकसमुदाय, यहूदी वडीलजन आणि परुशी लोक भडकले. ते इतके चिडले की, त्यांनी येऊन स्तेफनाला धरले. आणि त्याला यहूदी लोकांच्या (पुढाऱ्यांच्या) सभेत नेले.

13 आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. 14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की, नासरेथचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” 15 धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.

स्तोत्रसंहिता 126

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
    तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
    इतर देशांतील लोक म्हणतील,
    “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
    तर आपण खूप आनंदी होऊ.

परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
    तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
    पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
    पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

नीतिसूत्रे 16:26-27

26 कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.

27 कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center