Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GNT. Switch to the GNT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 3:1-4:17

इस्राएलचा राजा यहोराम

अहाबाचा मुलगा यहोराम हा शोमरोन मध्ये इस्राएलचा राजा म्हणून सत्तेवर आला. यहोशाफाटचे ते यहूदाचा राजा म्हणून अठरावे वर्ष होते. यहोरामने बारा वर्षे राज्य केले. यहोरामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. पण आपल्या आईवडीलांसारखे त्याने केले नाही. आपल्या वडीलांनी बाल मूर्तीच्या पूजेसाठी जो स्तंभ उभारला होता तो त्याने काढून टाकला. पण नबाटचा मुलगा यराबाम याने केली तीच पापे यहोरामनेही केली. शिवाय इस्राएल लोकांनाही ती करायला लावली. यराबामच्या पापात त्याने खंड पाडला नाही.

मवाब इस्राएलपासून वेगळा होतो

मेशा हा मवाबचा राजा होता. त्याच्याकडे मेंढयांचे बरेच कळप होते. एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके यांची लोकर तो इस्राएलच्या राजाला देत असे. पण अहाबच्या मृत्यूनंतर तो इस्राएलच्या सत्तेपासून फुटून वेगळा झाला.

यहोराम मग शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले. यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने आपले दूत पाठवले. यहोरामने निरोप पाठवला, “मवाबच्या राजाने बंड केले आहे तेव्हा त्याच्यावर हल्ला करायला तुम्ही माझ्या बाजूने याल का?”

यहोशाफाटने सांगितले, “होय, मी जरुर येईन तुझ्या माझ्यात काही भेदभाव नाही. माझे सैन्य, ते तुझे सैन्य माझे घोडे ते तुझे घोडे.”

तीन राजांची अलीशाकडे विचारणा

“कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे” यहोशाफाटने यहोरामला विचारले.

यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोरामने सांगितले.

इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोम यांच्या राजांबरोबर निघाला. सात दिवस त्यांनी वाटचाल केली. त्यांचे सैन्य, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे यांच्यासाठी पुरेसे पाणी नव्हते. 10 तेव्हा इस्राएलचा राजा यहोराम म्हणाला, “मवाबांच्या हातून पराभव पत्करावा लागावा म्हणून का परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले आहे.?”

11 यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.”

यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.”

12 यहोशाफाट म्हणाला, “अलीशाच्या मुखातून परमेश्वरच बोलतो.”

मग इस्राएलचा राजा यहोराम, यहोशाफाट आणि अदोमचा राजा असे तिघे जण अलीशाकडे गेले.

13 अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.”

तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”

14 अलीशा म्हणाला, “मी यहुदाचा राजा यहोशाफाट याचा आदर करतो व सर्वशक्तीमान परमेश्वराचा मी सेवक आहे. त्याला स्मरुन मी सांगतो की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामुळे मी येथे आलो आहे. मी तुम्हाला खरे सांगतो जर यहूदाचा राजा यहोशाफाट इथे नसता तर मी तुझी दखलही घेतली नसती. 15 तेव्हा आता एखाद्या वीणावादकाला इथे बोलावून आणा.”

एक वादक येऊन वीणा वाजवू लागला तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य अलीशात आले. 16 मग अलीशा म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: या खोऱ्यात जागोजाग खणून ठेवा 17 परमेश्वर म्हणतो तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल. तुम्हाला आणि तुमच्या जनावरांना पाणी मिळेल. 18 परमेश्वराला एवढे करणे सोपे आहे. मवाबांचाही तुम्हाला तो पराभव करु देईल. 19 प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त आणि निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करुन चांगल्या शेतांची नासाडी कराल.”

20 नंतर सकाळी, सकाळच्या यज्ञाच्या वेळी, अदोमच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि सगळे खोरे पाण्याने भरले.

21 राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबच्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले. 22 मवाबचे लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले. उगवत्या सूर्याची लाली खोऱ्यातल्या पाण्यात प्रतिबिंबित होऊन चमकत होती. तेव्हा मवाबी लोकांना ते रक्ताचे पाटच वाटले. 23 ते म्हणाले, “ते बघा रक्त! या राजांची आपापसात लढाई झालेली दिसते. त्यांनी परस्परांना मारले आहे. चला, आपण त्या मृतदेहावरील मौल्यवान वस्तू लुटून आणू.”

24 मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले. तेव्हा इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. मवाबी लोक पळत सुटले. इस्राएल लोकांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या प्रदेशात शिरकाव केला. 25 इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली. पिके उभी असलेल्या त्यांच्या शेतात दगडांचा मारा केला. झरे, विहिरी बुजवल्या. झाडे आडवी केली.कीर हरेसेथ येथपर्यंत इस्त्राएल लोकांनीचढाई केली,कीर हरेसेथला वेढा घालून या नगराचाही पाडाव केला.

26 या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाच्या राजाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमच्या राजाला तो मारायला निघाला पण त्याला ते जमले नाही. 27 मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले. हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला. मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले.

एका संदेष्ट्याच्या विधवेची अलीशाकडे मदतीसाठी याचना

संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलीशाकडे रडत रडत आली, आणि म्हणाली, “माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता. परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करुन घ्यायला येतो आहे.”

अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.”

तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.”

यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.”

मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.”

पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.

मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”

शूनेममधली बाई अलीशाला एक खोली देते

एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.

एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलीशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे, तो नेहमी आपल्या घरावरुन जातो. 10 तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल खुर्ची आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल.”

11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. 12 अलीशाने तेव्हा आपला सेवक गेहजी याला त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले.

त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. 13 अलीशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, “तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?”

ती बाई म्हणाली, “मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहात आहे.”

14 अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?”

गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”

15 मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला”

गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली. 16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.”

ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”

शूनेमच्या बाईला मुलगा होतो

17 या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 14:8-28

लुस्त्र व दर्बे येथे पौल

लुस्त्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते ,तो जन्मतःच पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की, देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे. 10 तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायावर उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उंच उडी मारली आणि चालू लागला.

11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांसारखे झाले आहेत! ते आमच्याकडे खाली आले आहेत!” 12 लोकांनी बर्णबाला ज्युपिटर [a] म्हटले व पौलाला मर्क्युरी [b] म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. 13 ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.

14 परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले, 15 “लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हांला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हांला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हांला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.

16 “भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. 17 परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्या द्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हांला आकाशातून पाऊस देतो.योग्य वेळी तो तुम्हांला चांगले पीक देतो. तो तुम्हांला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.”

18 पौल व बर्णबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या. व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत केले.

19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. 20 येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.

सिरीयातील अंत्युखियाला परत येणे

21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दु:खांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभु येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभुच्या हाती सोपविले.

24 पौल आणि बर्णबा पिशीदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले. 25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तालिया शहरात गेले. 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी अंत्युखियापासूनच केली होती.

27 जेव्हा ते तेथे पोहोंचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या, तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले, 28 नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.

स्तोत्रसंहिता 140

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतीगीत

140 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव
    दुष्टांपासून माझे रक्षण कर.
ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत.
    ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत.
    जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.

परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव.
    वाईट लोकांपासून माझे रक्षण कर.
ते लोक माझा पाठलाग करतात,
    आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला.
    त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले.
    त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.

परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
    परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस.
    तू माझा रक्षणकर्ता आहेस.
    लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस.
    त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.

परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस.
    ते लोक वाईट योजना आखत आहेत.
    पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत.
    माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे.
    त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्ड्यात फेकून दे.
11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस.
    त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे.
    देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
    चांगले लोक तुझी उपासना करतील.

नीतिसूत्रे 17:22

22 आनंद चांगल्या औषधासारखा असतो. पण दु:ख हे आजारासारखे असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center