Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 12:20-13:34

20 यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दावीदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.

21 रहबाम यरुशलेमला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एकलक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून आपले राज्य परत मिळवायचा रहबामचा विचार होता. 22 शमाया नामक देवाच्या माणसाशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला, 23 “शलमोनाचा मुलगा आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग, 24 ‘आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. सर्वजण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो.’” या आदेशानुसार रहबामचे सैन्य माघारी गेले.

25 शेखेम हे एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करुन यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल याही नगराची उभारणी केली.

26-27 यराबाम मनाशीच म्हणाला, “लोक यरुशलेम इथल्या परमेश्वराच्या मंदिरात असेच जात राहिले तर मग दावीदाच्याच घराण्याची सत्ता त्यांना हवीशी वाटू लागेल. यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील. मग ते माझा वध करतील.” 28 त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.” [a] 29 राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले. 30 पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.

31 उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले. 32 याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे.तसेच त्याने केलेल्या वासरांचा बळी अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले. 33 अशाप्रकारे यराबामने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलमधल्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.

बेथेलविरुध्द देववाणी

13 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या माणसाला) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता. परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती त्याप्रमाणे तो म्हणाला,

“हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे: ‘दावीदाच्या कुळात योशीया नावाचा मुलगा जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आत्ता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.’”

हे निश्र्चित घडेल याचीही संदेष्ट्याने लोकांना चुणूक दाखवली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”

यराबाम राजाने संदेष्ट्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेलमध्ये ऐकले. तेव्हा वेदीवरील आपला हात उचलून राजाने त्या माणसाकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” पण हे बोलत असताना राजाचाच हात लूळा पडला. त्याला तो हलवता येईना तसेच वेदी भंग पावली, त्यावरील राख जमिनीवर पडली. संदेष्ट्याच्या तोंडून देवच बोलत होता याचा तो पुरावाच होता. तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.”

तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला. राजा त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझ्या बरोबर घरी चल. काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”

पण हा संदेष्ट्या म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही. काहीही न खाण्यापिण्याेबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही अशीही त्याची आज्ञा आहे.” 10 त्या प्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.

11 बेथेल नगरात एक वृध्द संदेष्टा राहात होता. त्याच्या मुलांनी त्याला या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. यराबामला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले. 12 तेव्हा वृध्द् संदेष्टा म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडीलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला. 13 त्या वृध्द् संदेष्ट्याने मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.

14 हा वृध्द् संदेष्टा त्या देवाच्या माणसाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एका वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द् संदेष्ट्याने त्याला विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा माणूस?”(संदेष्टा)

संदेष्टा यावर त्याने होकार दिला.

15 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”

16 पण हा देवाचा माणूस म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही. 17 ‘तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही’ असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”

18 यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणी पुढे त्याने खोटेच सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”

19 तेव्हा तो देवाचा माणूस वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले. 20 ते मेजावर बसलेले असताना परमेश्वर वृध्द संदेष्ट्याशी बोलला. 21 वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या माणसाला म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. 22 येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”

23 या देवाच्या माणसाचे खाणे पिणे झाल्यावर वृध्द् संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा माणूस) निघाला. 24 परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारुन टाकले. देवाच्या माणसाचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते. 25 इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.

26 वृध्द् संदेष्ट्याने या देवाच्या माणसाला फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा माणूस. त्याने परमेश्वराचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्याला मारायला सिंहाची योजना केली. असे होणार असे परमेश्वराने सांगितले होते.” 27 मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले. 28 तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.

29 वृध्द संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला. 30 त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.” 31 मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी याच्याशेजारीच विसावू द्या. 32 परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”

33 राजा यराबाममध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या माणसांची तो पुरोहित म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्याला पुरोहित बनता येई. 34 या पापामुळेच त्याच्या राज्यावर सर्वनाश ओढवला.

प्रेषितांचीं कृत्यें 9:26-43

यरुशलेममध्ये शौल

26 नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वासणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे. 27 परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांना सांगितली.

28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभुची सुवार्ता सांगू लागला. 29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे. पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते. 30 जेव्हा बंधुजनांना (विश्वासणाऱ्यांना) हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्याला तार्सज्ञ नगराला पाठविले.

31 मंडळी जेथे कोठे ती होती-यहूदीया, गालीली, शोमरोन, तेथे त्यांना शांति लाभली. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने हा गट अधिक शक्तिशाली बनला. आपल्या वागणुकीने विश्वासणाऱ्यांनी दाखवून दिले की, ते प्रभूचा आदर करतात. या कारणामुळे विश्वासणाऱ्यांचा परिवार मोठा होत गेला.

यापो येथे पेत्र

32 पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांना भेटला. 33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास. येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.

36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे. 37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. त्यांनी (लोकांनी) तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले. 38 यापो येथीला अनुयायांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विंनति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”

39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. 40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. 41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलाविले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!

42 यापोमधील सर्व लोकांना हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 43 पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला.

स्तोत्रसंहिता 132

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

132 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
दावीदाने परमेश्वराला वचन दिले.
    दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही.
    मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही.
    मी झोपणार नाही.
माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी,
    याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”

आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले.
    आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
आपण पवित्र तंबूत जाऊ.
    या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन
    तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत.
    तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी,
    निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले.
    परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले.
    राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि
    मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”

13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला.
    त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील,
    मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन.
    गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन.
    आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन.
    मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन
    परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”

नीतिसूत्रे 17:6

नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center