Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 10:32-12:21

हजाएलकडून इस्राएलचा पराभव

32 याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला. 33 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यांतील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच अर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.

येहूचा मृत्यू

34 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. 35 येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनमध्ये केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला. 36 येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

अथल्या यहूदामध्ये राजाच्या सर्व मुलांचा वध करते

11 अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघराण्याची तिने हत्या केली.

यहोशेबा ही राजा योरामची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.

योवाश आणि यहोशेबा मग परमेश्वराच्या मंदिरात लपून राहिले. योवाश तिथे सहा वर्षे राहिला. यहूदावर अथल्याचे राज्य होते.

सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. परमेश्वराच्या मंदिरात त्या सगळ्यांना बोलावले आणि यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.

यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे. दुसऱ्या एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. योवाशच्या मागे तुमची अशी संरक्षक भिंत होईल. प्रत्येक शब्बाथ दिवसाच्या अखेरीला तुमच्यापैकी दोनतृतीयांश लोक परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील. राजा योवाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे. प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”

याजक यहोयाद याने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या अधिकाऱ्यांनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. एका गटाने शनिवारी राजाचे रक्षण करावयाचे होते. आठवड्यातले इतर दिवस बाकीचे गट ते काम करणार होते. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले. 10 यहोयादाने भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीदाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच. 11 मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.

12 या सर्वांनी योवाशला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि राजा व देव यांच्यातील करारलेख त्याला दिला. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व राजा केले मग टाळ्यां वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला. 13 हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.

14 राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.

15 हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”

16 पहारेकऱ्यांनी मग तिला पकडले आणि घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.

17 यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.

18 या नंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडेतुकडे केले बालचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले.

याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. 19 सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला. 20 लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.

21 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.

योवाशच्या सत्तेची सुरुवात

12 येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती. योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता. पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.

मंदिर दुरुस्तीची योवाशची आज्ञा

4-5 योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची आर्थिक स्थिती चांगली आहे. लोकांनी मंदिराला बरेच काही दिले आहे. शिरगणती झाली तेव्हा लोकांनी कर भरला. केवळ इच्छेखातरही लोकांनी पैसे दिले. तुम्ही याजकांनी आता त्या पैशाचा विनियोग परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी करायला हवा. प्रत्येक याजकाने आपापल्या यजमानांकडून मिळालेले पैसे या कामी वापरले पाहिजेत. परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेल तर या पैशातून तिची दुरुस्ती व्हावी.”

तरीही याजकांनी काहीही सुरु केले नाही. योवाशचे राजा म्हणून तेविसावे वर्ष चालू होते तोपर्यत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केलेली नव्हती. तेव्हा मात्र योवाशने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”

याजकांनी लोकांकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले. तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.

10 मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत. 11 मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते. 12 दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.

13-14 लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण याजकांना ते चांदीची उपकरणी, कातऱ्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके यासाठी वापरता येत नव्हते, तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते मंदिराची दुरुस्ती करत. 15 कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशोब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.

16 आपल्याहातून घडलेल्या अपराधांचे, पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी अर्पणे करण्यासाठी लोक येत तेव्हा ते पैसे देत, पण हा पैसा कारागिरांना देण्यासाठी वापरला जात नसे. तो याजकांचा होता.

योवाश हजाएलपासून यरुशलेमचे रक्षण करतो

17 हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करुन गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.

18 योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.

योवाशचा मृत्यू

19 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात योवाशच्या थोर कृत्यांची नोंद आहे.

20 योवाशच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशचा वध केला. 21 शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले.

दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:1-22

करिंथमध्ये पौल

18 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्य [a] याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनविणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करु लागला.

प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच रिव्रस्त आहे अशी साक्ष देऊ लागला. परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्याला ते (यहूदी लोक) वाईट रीतीने बोलले. तेव्हा आपला विषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहूदी लोकांना म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी जबाबदार नाही. येथून पुढे मी यहूदीतर लोकांकडेच जाईन.”

पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.

एके रात्री, प्रभु स्वप्नामध्ये पौलाशी बोलला, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको! 10 मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.” 11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांना शिकवीत राहिला.

पौलाला गल्लियोपुढे उभे करतात

12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले. 13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

14 पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते. 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!” 16 मग गल्लियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले.

17 मग त्या सर्वांनी यहूदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.

पौल अंत्युखियास परत जातो

18 पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला, व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला. आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती. पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले. कारण त्याने नवस केला होता. 19 मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला. 20 जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही. 21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.

22 जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरुशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला.

स्तोत्रसंहिता 145

दावीदाचे स्तोत्र

145 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो.
    मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
मी तुझी रोज स्तुती करतो.
    तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
    त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील.
    तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे.
    मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
    तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
    लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
    परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो.
    तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो.
    तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात.
    तू किती महान आहेस हे ते सांगतात.
12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते.
    तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील.
    तू सदैव राज्य करशील.

14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो.
    जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात.
    आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस
    आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते.
    तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात,
    त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो.
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
    त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो.
    परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो.
तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो
    आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो.
    परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन.
    प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.

नीतिसूत्रे 18:1

18 काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center