Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 19:11-20:13

11 सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, “यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत. 12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात? 13 आणि अमासाला सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही तर देव मला शासन करो.”

14 दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.

15 मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्याला भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करुन आणण्याचा त्यांचा मानस होता.

शिमीची क्षमायाचना

16 गेराचा मुलगा शिमी हा बन्यामीनच्या घराण्यातील होता. तो बहूरीम येथे राहात असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला. 17 बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हाही आला. आपले पंधरा मुलगे आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोंचले.

18 राजाच्या कुटुंबियांना उतरुन घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले. 19 तो राजाला म्हणाला, “स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करु नका. महाराज, तुम्ही यरुशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरुन जा. 20 मी पापी आहे हे तुम्ही जाणता. म्हणूनच योसेफच्या घराण्यातून तुमच्या भेटीला आलेली मी पहिलीच व्यक्ती आहे.”

21 पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, “परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले. तेव्हा त्याला ठारच करायला हवे.”

22 दावीद म्हणाला, “सरुवेच्या मुलानो. मी तुमच्या बरोबर कसे वागावे? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरूद्ध आहे. इस्राएलमध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही कारण आज मी इस्राएलचा राजा आहे.”

23 मग राजा शिमीला म्हणाला, “तू मरणार नाहीस.” आपण शिमीचा वध करणार नाही असे राजाने शिमीला वचन दिले. [a]

मफीबोशेथ दावीदाला भेटायला येतो

24 शौलचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरुशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वतःकडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत. 25 मफीबोशेथ यरुशलेमहून आला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तेथून निघालो तेव्हा तूही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?”

26 मफीबोशेथने सांगितले, “महाराज, माझ्या नोकराने, सीबाने, मला फसवले, त्याला मी म्हणालो, ‘मी पांगळा आहे तेव्हा गाढवावर खोगीर चढव म्हणजे त्यावर बसून मी राजाबरोबर जाईन’ 27 पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरुद्ध तुझे कान फुंकले पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा. 28 माझ्या आजोबांच्या घराण्याचा तुम्ही समूळ नाश करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही. तुम्ही मला आणखी काही जणाबरोबर आपल्या पंक्तीला बसवलेत. तेव्हा मला काहीही तक्रार करायचा हक्क नाही.”

29 तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, “आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक. तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.”

30 मफीबोशेथ राजाला म्हणाला, “महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या माझे धनी सुखरुप परत आला यात सगळे आले.”

दावीद बर्जिल्ल्यला बोलवून घेतो

31 गिलादचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला. 32 बर्जिल्ल्यचे वय झाले होते. तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करु शकला. 33 दावीद त्याला म्हणाला, “नदी उतरुन माझ्याबरोबर चल. तू यरुशलेममध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.”

34 पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, “तुला माझे वय माहीत आहे का? यरुशलेमपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकेन असे तुला वाटते का? 35 मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करु शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुझ्यामागे लोढणे कशाला लावून देऊ? 36 आता मला तुझ्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक. यार्देन नदी मी उतरुन तुझ्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी? 37 पण मला पुन्हा परत घरी जाऊ दे. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरीतच माझे दफन होईल. पण किम्हनला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकतोस. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्याला वागव.”

38 तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल. तुला स्मरुन मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.”

दावीद घरी परततो

39 राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.

40 नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोचवायला आले.

इस्राएलांचा यहूद्यांशी वाद

41 सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करुन आणले असे का?”

42 तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांना सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हाला एवढा राग का यावा? आम्ही राजाच्या अन्नाचे मिंधे नाही. त्याने आम्हाला बक्षीसांची लालूचही दाखवली नाही.”

43 इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से [b] आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत. असे का? राजाला पुन्हा गादीवर बसवायचे आम्हीच आधी बोललो होतो.”

पण यहूदींनी इस्राएल लोकांना यावर अतिशय तुच्छतेने उत्तर दिले. इस्राएल पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.

शबा दावीदा विषयी इस्राएलांचे मन कलुषित करतो

20 शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबी अगदी कुचकामी पण खोडसळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोळा केले आणि त्यांना म्हणाला,

“दावीदाकडे आपला भाग नाही.
    या इशायच्या मुलात आपला वाटा नाही इस्राएलींनो,
चला आपापल्या डेऱ्यात परत.”

हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरुशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.

दावीद यरुशलेममधील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते. त्यांना त्याने एका खास घरांत [c] ठेवले. त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या बायका तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.

राजा अमासाला म्हणाला, “यहूदाच्या लोकांना तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.”

तेव्हा अमासा यहूदांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागला.

शबाला मारायची दावीदाची अबीशयला सूचना

दावीद अबीशयला म्हणाला, “अबशालोमपेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.”

तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरुशलेमहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.

यवाब अमासाचा वध करतो

यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली. त्याने अमासाला विचारले, “तुझे सर्व कुशल आहेना?” आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरुन त्याला पुढे खेचले. 10 यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला.

शबाचा शोध चालूच

यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला. 11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”

12 अमासा रस्त्याच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरुन ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले. 13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.

योहान 21

येशू सात शिष्यांना दिसतो

21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.”

ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.

दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”

त्यांनी उत्तर दिले, “नाही.”

तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.

तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”

11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.

14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.

येशू पेत्राबरोबर बोलतो

15 मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”

तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”

16 पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीति करतोस का?”

पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभु तुम्हांला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.”

17 तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”

पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, “तू माझ्यावर प्रीति करतोस का?”

तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार. 18 मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”

20 मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. 21 जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?”

22 येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”

23 या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”

24 जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.

25 आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.

स्तोत्रसंहिता 120

वर मंदिरांत जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

120 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने मला वाचवले.
परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
    त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का?
    त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि
    जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.

खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे,
    केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ
    मी खूप काळ राहिलो आहे.
मी म्हणालो, मला शांती हवी,
    म्हणून त्यांना युध्द हवे आहे.

नीतिसूत्रे 16:16-17

16 ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

17 चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center