Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 11:1-12:19

शलमोन आणि त्याचा जनानखाना

11 स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले. परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला. त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले. तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही. सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले. अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराध केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.

कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले. आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच सोय केली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.

इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते. 10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले. 11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्या कडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या एखाद्या सेवकाला मी ते देईन. 12 पण तुझे वडील दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा मुलगा गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन. 13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दावीदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”

शलमोनाचे शत्रू

14 आणि मग परमेश्वराने अदोममधल्या हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमच्या राजघराण्यातला होता. 15 त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती. 16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोममध्ये सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोममध्ये कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही. 17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडीलांचे काही सेवकही त्याच्याबरोबर गेले. 18 मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.

19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. (तहपनेस ही राजाची राणी होती) 20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा मुलगा झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलां बरोबरच वाढला.

21 दावीदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”

22 तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?”

तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.

23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा मुलगा. सोबाचा राजा हददेजर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला. 24 दावीदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर रजोनने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला 25 अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.

26 नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.

27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता. 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले. 29 एकदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.

30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.

31 मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वतःजवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन. 32 आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे. 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही. 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले. 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन. 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वतःचे म्हणून निवडले. 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल. 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन. 39 शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.’”

शलमोनाचा मृत्यू

40 शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.

41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या आहेत. 42 यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43 मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.

नागरी युध्द

12 शलमोनाकडून पळाल्यावर नबाटाचा मुलगा यराबाम मिसरमध्ये गेला. तो अजून तिथेच होता. शलमोनाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर एफ्राईमच्या डोंगराळ भागातील जेरेदा या आपल्या नगरात तो परतला.

शलमोन मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्यानंतर त्याचा मुलगा रहबाम हा पुढचा राजा झाला. त्याला राज्याभिषेक करायला सर्व इस्राएल लोक शेखेम येथे जमले. रहबाम तिथे आला. लोक त्याला म्हणाले, “तुझ्या वडीलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हाला भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”

रहबाम म्हणाला, “तीन दिवसांनंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.

शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांना मी काय सांगू?”

यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”

पण रहबामने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले. रहबाम त्यांना म्हणाला, “माझ्या वडीलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा या लोकांना कामाचा भार कमी करुन हवा आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”

10 तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडीलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे काम कमी करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडीलांच्या अख्ख्या शरीरापेक्षा या माझ्या करंगळीत जास्त जोर आहे. 11 माझ्या वडीलांनी तुम्हाला कामाला जुंपले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी असा झोडपीन की विंचू डसल्यासारखे तुम्हाला वाटेल.’”

12 रहबामने त्या लोकांना “तीन दिवसांनी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व इस्राएल लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले. 13 त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. 14 मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर कष्टाचे काम लादले. मी तर तुम्हाला आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण मी तर असा मारीन की विंचवाच्या डंकासारख्या तुम्हाला वेदना होतील.” 15 हे अर्थातच लोकांच्या मनासारखे नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा मुलगा यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहिया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.

16 नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले,

“आम्ही दावीदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय?
    नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय?
नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी.
    करु दे या दावीदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य.”

एवढे बोलून ते निघून गेले. 17 तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएलींवर त्याची सत्ता होतीच.

18 अदोनीराम नावाचा एक माणूस सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामने त्याला लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला. 19 इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 9:1-25

शौलाचे परिवर्तन

शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला. शौलाने त्याला दिमिष्क येथील सभास्थानातील यहूदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिष्क येथील ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करुन यरुशलेमला आणले असते.

मग शौल दिमिष्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला. शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”

शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?”

ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे. आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”

जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरुन उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरुन त्याला दिमिष्क शहरात नेले. तीन दिवसांपर्तंत शौलाला काहीच दिसत नव्हते. त्याने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही.

10 दिमष्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभु त्याच्याशी एका दृष्टान्तात बोलला: तो म्हणाला, “हनन्या!”

हनन्याने उत्तर दिले, “मी आहे, प्रभु!”

11 प्रभु हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्तयावर जा. तेथे यहूदाचे [a] घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. 12 शौलाने दृष्टान्त पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे, असे त्याला दिसले. व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.”

13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभु मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुइया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”

15 परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे. 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”

17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.” 18 लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.

शौल दिमिष्कात सुवार्ता सांगतो

20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करु लागला. “येशू हा देवाचा पुत्र आहे.”

21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, “यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वांचा नाश करु पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याजकासमोर उभे करणार आहे.”

22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.

शौल यहूदी लोकांपासून निसटून जातो

23 बऱ्याच दिवसांनंतर यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. 24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला. 25 एक रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरुन रात्रीच्या वेळी खाली सोडली.

स्तोत्रसंहिता 131

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

131 परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही.
    मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही.
मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही.
    मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
मी अगदी अविचल आहे.
    माझा आत्मा शांत आहे.
माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या
    बाळासारखा अविचल आणि शांत आहे.

इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.

नीतिसूत्रे 17:4-5

दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा.

काही लोक गरीबांची थट्टा करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center