Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 28

दावीदाचे स्तोत्र.

28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
    मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
    माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
    तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
    मी तुला साद घालीन त्यावेळी
    माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
    दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
    परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
    म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
    त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
    नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
    ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.

परमेश्वराची स्तुती कर.
    त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
    मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
    आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
    परमेश्वर त्याला वाचवतो.
    परमेश्वर त्याची शक्ती आहे.

देवा, तुझ्या लोकांना वाचव
    जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
    त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

यहेज्केल 18

18 परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, “आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली. त्याची आंबट चव मात्र मुलांनी घेतली. ही म्हण तुम्ही नेहमी म्हणता. ते का?

‘तुम्ही पाप करु शकता, भविष्यकाळात कोणालातरी
    त्याची शिक्षा मिळेल, असे तुम्हांला वाटते.’”

पण परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “माझ्या प्राणांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की इस्राएलच्या लोकांना ह्यापुढे ही म्हण खरी वाटणार नाही. मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.

“जर माणूस सज्जन तर तो जगेल. तो सर्वांशी चांगलेच वागतो. तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांना दाखवलेले नैवेद्य खात नाही, इस्राएलमधील अमंगल मूर्तीची तो प्रार्थना करीत नाही. तो शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करीत नाही, आपल्या स्वतःच्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी तिच्याजवळ जात नाही. तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो. एखाद्याला पैसे उसने दिल्यावर, तो त्यावर व्याज घेत नाही. तो कपट करीत नाही. तो सर्वांशीच चांगला वागतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात. तो सज्जन माझे नियम पाळतो, माझ्या निर्णयांवर विचार करतो, तो न्यायी आणि विश्वासनीय होण्याचे शिकतो. तोच चांगला माणूस होय, म्हणूनच तो जगेल.

10 “पण त्या सज्जनाचा मुलगा कदाचित् ह्या सर्व चांगल्या गोष्टी करणार नाही. तो मुलगा कदाचित् चोरी करीत असेल व लोकांना ठार मारीत असेल. 11 तो मुलगा पुढील वाईट गोष्टी करत असेल. तो डोंगरावर जाऊन खोट्या देवांना दाखविलेला नैवेद्य खात असेल, तो दुष्ट मुलगा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर, व्यभिचाराचे पाप करीत असेल. 12 तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल. 13 एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत: जबाबदार असेल.

14 “आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल व त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो. 15 तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांचा प्रसाद खात नाही. तो इस्राएलमधील घाणेरड्या मूर्तीची कधी प्रार्थना करीत नाही. शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचाराचे पाप करीत नाही. 16 तो लोकांचा फायदा घेत नाही. तो कर्जफेडीनंतर गहण ठेवलेल्या वस्तू कर्जदाराला परत करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो. 17 तो गरिबांना मदत करतो गरजूला पैसे उसने दिल्यास, त्यावर व्याज घेत नाही. तो माझे नियम पाळतो त्याचप्रमाणे वागतो. त्याच्या वडिलांच्या पापांसाठी, चांगल्या मुलाला मृत्युदंड मिळणार नाही. तो मुलगा जिवंत राहील. 18 वडील कदाचित लोकांना दुखवीत असतील आणि चोरी करीत असतील. ते त्यांच्या माणसांकरिता काहीच भल्या गोष्टी करीत नसतील ते त्यांच्या पापांनी मरतील. पण वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही.

19 “तुम्ही कदाचित् विचाराल ‘वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा का होणार नाही?’ कारण मुलगा प्रामाणिक होता व त्याने सत्कृत्ये केली. त्याने माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या. म्हणून तो जगेल. 20 पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वतःचाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

21 “पण, वाईट माणूस, सुधारला, तर तो मरणार नाही. तो जगेल. त्याने पूर्वी केलेल्या वाईट गोष्टी तो करण्याचे सोडून देईल व माझे नियम काळजीपूर्वक पाळील तो सज्जन व प्रामाणिक होईल. 22 तर मग देव त्याच्या दुष्कृत्यांचे स्मरण ठेवणार नाही. तो फक्त त्याचा चांगुलपणाच स्मरेल. मग तो माणूस जगेल.”

23 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वाईट लोकांनी मरावे अशी माझी इच्छा नाही. त्यांनी आपले मार्ग बदलावे. मग ते जगू शकतील.

24 “कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”

25 देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात. 26 जर सज्जन बिघडला व दुष्ट झाला, तर त्याने त्याच्या दुष्कृत्याबद्दल मेलेच पाहिजे. 27 पण वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील. 28 तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”

29 इस्राएलचे लोक म्हणाले, “हे न्याय्य नाही. परमेश्वर, आमचा प्रभू, असा असूच शकत नाही!”

देव म्हणाला, “मी न्यायी आहे तुम्ही लोकच न्यायी नाही आहात. 30 का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,

“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका. 31 तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी (मूर्ती) फेकून द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता. तुमचे ह्दयपरिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या. इस्राएलच्या लोकांनो, स्वतःच स्वतःचा मृत्यू का ओढवून घेता? 32 मला तुम्हाला ठार मारण्याची इच्छी नाही. कृपा करुन परत या व जगा” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

प्रेषितांचीं कृत्यें 9:32-35

यापो येथे पेत्र

32 पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांना भेटला. 33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास. येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center