Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
2 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
मी तुला साद घालीन त्यावेळी
माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
3 परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
4 परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
5 वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
6 परमेश्वराची स्तुती कर.
त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
7 परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
8 परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
परमेश्वर त्याला वाचवतो.
परमेश्वर त्याची शक्ती आहे.
9 देवा, तुझ्या लोकांना वाचव
जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
इस्राएलचे पाप संकट आणते
9 सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे.
आमच्याभोवती फक्त अंधार आहे.
म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे.
आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो.
पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
10 आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत.
आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो.
रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो.
दिवसासुध्दा् आम्ही पाहू शकत नाही.
दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
11 आम्ही सर्व, फार दु:खी आहोत.
आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो.
लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत.
पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही.
आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत.
पण तारण अजून खूप दूर आहे.
12 का? कारण आम्ही देवाविरूध्द् वागून खूप खूप पापे केली.
आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात.
ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.
13 आम्ही पाप केले
आणि परमेश्वराविरूध्द् गेलो.
आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आम्ही त्याला सोडले.
आम्ही देवाच्याविरूध्द् दुष्ट बेत केले.
आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला
व मनात दुष्ट बेत केले.
14 न्याय आमच्यापासून दूर गेला आहे.
प्रामाणिकपणा दूर उभा आहे.
सत्य रस्त्यात पडले आहे
चांगुलपणाला शहरात प्रवेश नाही.
15 सत्य गेले
आणि सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे लुबाडले गेले.
परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही.
परमेश्वराला हे आवडले नाही.
16 परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा
राहून लोकांना मदत करताना दिसला नाही.
म्हणून परमेश्वराने स्वतःचे सामर्थ्य
आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
17 परमेश्वराने युध्दा्ची तयारी केली.
त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले,
तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले.
दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.
18 परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे.
म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील.
परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील.
त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
19 नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील.
पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील.
देवाने सोडलेल्या झंझावातामुळे,
वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
जिवंत धोंडा व पवित्र राष्ट्र
2 म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या. 2 नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल. 3 आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.” [a]
4 जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे. 5 तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे. 6 म्हणून खालील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:
“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो,
जो मौल्यवान व निवडलेला आहे
आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” (A)
7 तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,
“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा
तोच कोनशिला झाला आहे.” (B)
8 तो असा झाला,
“एक धोंडा जो लोकांना अडखळवितो
आणि एक खडक जो लोकांना पाडतो.” (C)
ते लोक अडखळतात कारण ते देवाची आज्ञा पाळत नाहीत. त्यांना त्याच्यासाठी नेमलेले आहे.
9 पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता
पण आता तुम्ही देवाचे लोक आहात.
एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती
पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.
2006 by World Bible Translation Center