Revised Common Lectionary (Semicontinuous)
104 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस.
तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
2 माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस.
तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस.
तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि
वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
4 देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस
आणि तुझ्या सेवकांना अग्नीसारखे.
5 देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की
तिचा कधीही नाश होणार नाही.
6 तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस,
पाण्याने डोंगरही झाकले गेले.
7 परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले.
देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
8 पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले
आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
9 तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि
आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
36 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला:
2 “तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर.
देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो.
देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
4 ईयोब, मी खरे बोलत आहे
आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे.
5 “देव अतिशय सामर्थ्यवान आहे,
पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही.
तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
6 देव दुष्टांना जगू देणार नाही
आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.
7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.
तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो.
तो चांगल्यांना सदैव मान देतो.
8 म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले
तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार.
9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल.
देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे.
देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
10 देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल.
तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल.
आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील.
12 परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल.
त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
13 “जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात.
देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
14 ते लोक पुरुष वेश्यासारखे
अगदी तरुणपणी मरतील.
15 परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील.
देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो.
16 “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे.
तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते.
तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे.
तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.
7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा. 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत. 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:
“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” (A)
10 आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,
“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” (B)
11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते
“अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा
आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” (C)
12 यशयासुद्धा असे म्हणतो,
“इशायाचे मूळ प्रगट होईल,
ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल.
ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.” (D)
13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
2006 by World Bible Translation Center