Revised Common Lectionary (Semicontinuous)
ईयोब उत्तर देतो
23 नंतर ईयोबाने उत्तर दिले:
2 “तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन.
का? कारण मी अजूनही दु:खी आहे.
3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते.
देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.
4 मी देवाला माझी कथा सांगितली असती.
माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.
5 देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युत्तर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते.
मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
6 देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का?
नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.
7 मी सत्यप्रिय माणूस आहे, देव मला माझी गोष्ट सांगू देईल.
नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.
8 “पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो.
मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
9 देव दक्षिणेत कार्यमग्न असला तरी मला तो दिसत नाही.
देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.
16 देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो.
सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.
17 माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत.
परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
12 कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंतःकरणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.
देवासमोर येण्यास येशू आपणांस मदत करतो
14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरू या. 15 कारण आपल्याला लाभलेला महान याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. 16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(A)
17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”
20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”
21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”
22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.
23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”
24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”
26 ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
27 त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”
28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”
29 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी 30 त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31 परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”
2006 by World Bible Translation Center