Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 39

प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र

39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
    मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”

मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
    मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
    मी फार चिडलो होतो.
मी फार रागावलो होतो
    आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
    म्हणून मी काही तरी बोललो.

माझे काय होईल?
    हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
    ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
    माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
    कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
    आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
    पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.

तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
    तूच माझी आशा आहेस!
परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
    मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
मी माझे तोंड उघडणार नाही.
    मी काही बोलणार नाही.
    परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
    तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
    त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
    कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.

12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
    मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
    या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
    केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
    मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
    मी थोड्याच वेळात जाणार आहे.

ईयोब 28:12-29:10

12 “पण माणसाला शहाणपण कुठे मिळेल?
    समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही.
    पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’
    सागर म्हणतो, ‘माझ्याजवळही ते नाही.’
15 तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
    ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने
    वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते.
    सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे.
    माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत.
    शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.

20 “मग शहाणपणा कुठून येतो?
    समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे.
    आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाश [a] म्हणतात,
    ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही.
    आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’

23 “फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे.
    फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते.
    त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली.
    सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले
    आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला.
    शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 आणि देव लोकांना म्हणाला,
    ‘परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे.
    वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.’”

ईयोब त्याचे बोलणे चालू ठेवतो

29 ईयोबाने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:

“काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता,
    तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता.
    तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो.
    त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता
    आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते.
    मी माझे पाय मलईत धूत असे.
    माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.

“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे
    आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
सगळे लोक मला मान देत.
मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात.
    मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
लोकप्रमुख बोलणे थांबवीत
    आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10 महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत.
    होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.

प्रकटीकरण 8:1-5

सातवा शिक्का

कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला. तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती. आणि मी सात देवदूतांना देवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.

दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूप प्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पण सिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले. धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्या प्रार्थनेसह गेला. मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकू लागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center