Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र
39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
मी फार चिडलो होतो.
3 मी फार रागावलो होतो
आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
म्हणून मी काही तरी बोललो.
4 माझे काय होईल?
हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.
7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
तूच माझी आशा आहेस!
8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
9 मी माझे तोंड उघडणार नाही.
मी काही बोलणार नाही.
परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
मी थोड्याच वेळात जाणार आहे.
अलीहू युक्तिवादात आपली भर घालतो
32 नंतर ईयोबाच्या तीन मित्रांनी ईयोबाला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण ईयोबला स्वतःच्या निर्दोषपणाविषयी खात्री होती. 2 परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वतः बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत. 3 अलीहू ईयोबच्या तीन मित्रांवरदेखील रागावला. का? कारण ईयोबचे तीन मित्र ईयोबच्या प्रश्रांची उत्तरे देऊ शकले नाहीत. ईयोब चुकला हे ते सिध्द करु शकले नाहीत. 4 अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले. 5 परंतु नंतर अलीहूला दिसले की ईयोबच्या तीन मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही. म्हणून त्याला राग आला. 6 म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला:
“मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात.
म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो.
7 मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे.
वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’
8 परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो.
त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो.
9 केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात.
केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही.
10 “तेव्हा कृपा करुन माझे ऐका!
मी तुम्हांला माझे विचार सांगतो.
11 मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला.
तुम्ही ईयोबाला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
12 तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या.
तुमच्या पैकी कुणीही ईयोबावर टीका केली नाही.
तुमच्यापैकी एकानेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत.
13 तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही.
ईयोबाच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
14 ईयोबाने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत.
म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही.
15 “ईयोब, हे तिघेही वाद हरले आहेत.
त्यांच्या जवळ बोलायला आणखी काही उरले नाही.
त्यांच्या जवळ आणखी उत्तरे नाहीत.
16 ईयोब, यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो.
परंतु ते आता गप्प आहेत.
त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे.
17 म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो.
होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो.
18 मला इतके काही सांगायचे आहे
की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते.
19 मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे.
द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे.
20 म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल.
मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत.
21 मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे.
मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही.
मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन.
22 एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही.
मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.
श्रीमंत मनुष्य व लाजार
19 “एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे. 20 त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते. 21 त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22 “मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले. 23 आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले, 24 तो मोठ्याने ओरडला, ‘पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!’
25 “परंतु अब्राहाम म्हणाला, ‘माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस. 26 आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’
27 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, 28 कारण मला पाच भाऊ आहेत. त्याला त्यांना तरी सावध करु दे. म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत.’
29 “पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘नाही, पित्या अब्राहामा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’
31 “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.’”
2006 by World Bible Translation Center