Revised Common Lectionary (Semicontinuous)
ईयोब परमेश्वराला उत्तर देतो
42 नंतर ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले, तो म्हणाला:
2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे.
तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.
3 परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास: ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखे [a] बोलतो आहे?’
परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो.
ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
4 “परमेश्वरा, तू मला म्हणालास, ‘ईयोबा, तू ऐक, मी बोलेन.
मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे.’
5 परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते.
परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
6 आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते.
मला पश्चात्ताप होत आहे.
मी आता धुळीत आणि राखेत [b] बसून माझे मन
आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. 11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबबरोबर भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा [a] आणि सोन्याची अंगठी दिली.
12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14,000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत. 13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. 14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले. 15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.
16 अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला. 17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.
दावीदाचे स्तोत्र दावीद अबिमलेखापुढे वेड्यासारखा वागला तेव्हा त्याने दावीदाला हाकलून दिले. अशा रीतीने दावीद त्याला सोडून गेला
34 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन.
माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा
माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला.
आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले.
मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल
लाज वाटून घेऊ नका.
6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली
आणि परमेश्वराने माझे ऐकले.
त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो.
परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे
ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील.
परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.
20 परमेश्वर त्यांच्या सर्व हाडांचे रक्षण करेल.
त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या
माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो.
ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
23 तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे पुढे ते याजकपद चालवू शकले नाही. 24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो. 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
26 म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे. 27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. 28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन देण्यात आल्यामुळे पुत्र हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.
येशू आंधळ्याला बरे करतो(A)
46 मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47 जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”
48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”
49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा.”
तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.” 50 त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.
51 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”
आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”
52 मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.
2006 by World Bible Translation Center