M’Cheyne Bible Reading Plan
दावीदाने शौलला लज्जित केले
24 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग करुन त्यांना घालवल्यावर लोक त्याला म्हणाले, “दावीद एन गेदीजवळच्या वाळवंटात आहे.”
2 तेव्हा शौलने सर्व इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदाच्या शोधार्थ निघाला. रानबकऱ्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली. 3 रस्त्यालगतच्या मेंढवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते. 4 ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, ‘मी शत्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.’”
दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरख्याचा एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही. 5 दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले. 6 तो आपल्या सोबत्यांना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.” 7 आपल्या माणसांना थोपवण्यासाठी, त्यांनी शौलाला इजा करु नये म्हणून तो असे म्हणाला.
शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला. 8 दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलाला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”
शौलाने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववून त्याला अभिवादन केले. 9 शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता? 10 मी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. ‘हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का लावणार नाही’ असे मी म्हणालो. 11 हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात. 12 परमेश्वरानेच याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात याचे परमेश्वराने शासन खुशाल करावे. पण मी तुमच्या विरुद्ध लढणार नाही. 13 एक जुनी म्हण आहे:
‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’
“माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही. 14 तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इस्राएलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निळळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला. 15 परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करु द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करु द्या. मला पठिंबा देवून माझेच खरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”
16 दावीदचे बोलून झाले तेव्हा शौलने विचारले, “दावीद, माझ्या मुला, तुच हे बोलतो आहेस का?” शौलला रडू फुटले. तो हमसाहमशी रडला.
17 तो पुढे म्हणाला, “तुझे खरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो. 18 तू काय चांगले केलेस ते आत्ता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस. 19 मी तुझा शत्रू नव्हे हे यावरुन दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल. 20 तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इस्राएलवर राज्य करशील. 21 आता मला एक वचन दे. परमेश्वराची शपथ घेऊन तू माझ्या मुलाबाळांना मारणार नाहीस असे कबूल कर. माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस असे कबूल कर.”
22 तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलाच्या कुटुंबाचा संहार न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.
मंडळीतील एक नैतिक समस्या
5 खरोखरच असे सांगण्यात आले आहे की, तुमच्यामध्ये जारकर्म चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या सावत्र आईशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य विदेशी लोकांमध्येही आढळणार नाही. 2 आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हांला त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? ज्या कोणी हे कर्म केले असेल त्याला तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. 3 कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे. आणि हजर असल्याप्रमाणे त्यांचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे, 4-5 जेव्हा तुम्ही प्रभु येशूच्या नावात आणि माझ्या आत्म्यात एकत्र जमता व आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्यात एकत्र येता, तेव्हा अशा माणसाला त्याच्या देहस्वभावाचा नाश व्हावा म्हणून सैतानाच्या स्वाधीन करावे यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.
6 तुमचे बढाई मारणे चांगले नाही. तुम्हांला माहीत नाही का की, “थोडेसे खमीर सगळे पीठ फुगविते.” 7 जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहातः बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले. 8 यासाठी चला आपण वल्हांडणाचा सण पाळू या. जुन्या खमीराच्या भाकरीने नव्हे तर खरेपणाच्या बेखमीर भाकरीने पाळावा.
9 जे जारकर्मी आहेत त्यांची संगत धरु नये असे मी माझ्या पूर्वीच्या पत्रात लिहिले होते. 10 माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही की, तुम्ही या जगातील जे लोक जारकर्मी, लोभी, फसविणारे किंवा मूर्तिपूजक यांची संगत धरु नये असे नाही. त्याबाबतीत तुम्हांलाच हे जग सोडून द्यावे लागेल. 11 परंतु असे आहे की, मी तुम्हांला लिहिले होते, तुम्हांतील जो कोणी स्वतःला बंधु म्हणतो, परंतु जर तो जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक निंदक, मद्यपि, फसविणारा असेल तर त्याची संगत धरु नये. अशा माणसाबरोबर भोजनसुद्धा करु नये.
12-13 परंतु जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा निवाडा करणे माझे काम आहे काय? जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? देव जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा न्याय करील. पवित्र शास्त्र म्हणते, “तुमच्यामधून दृष्ट मनुष्याला काढून टाका.”
3 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू जे पाहतोस, ते खा. तो पट खा. मग त्या गोष्टी इस्राएलच्या लोकांना जाऊन सांग.”
2 मग मी तोंड उघडले व त्याने तो पट माझ्या तोंडात घातला. 3 नंतर देव म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला हा पट देत आहे. तो गीळ. त्याने तुझे पोट भरु दे.”
मग मी तो पट सेवन केला. तो मला मधासारखा गोड लागला.
4 त्या नंतर देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांकडे जा. त्यांना माझे शब्द ऐकव. 5 तुला ज्यांचे बोलणे समजू शकणार नाही, अशा परदेशीयांकडे मी तुला पाठवीत नाही. तुला दुसरी भाषा शिकायची गरज नाही. मी तुला इस्राएल लोकांकडे पाठवीत आहे. 6 तुला समजत नसणाऱ्या भाषा बोलणाऱ्या निरनिराळ्या देशांत मी तुला पाठवीत नाही. जर तू त्या लोकांशी जाऊन बोलला असतास तर त्यांनी तुझे ऐकले असते. पण तुला त्या कठीण भाषा शिकण्याची जरुरी नाही. 7 नाही! मी तुला झ्स्राएल लोकांकडेच पाठवीत आहे. त्यांची मनेच फक्त कठोर आहेत! ते हट्टी आहेत. ते तुझे ऐकायला नकार देतील. त्यांना माझे म्हणणे ऐकण्याची इच्छा नाही. 8 पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन. 9 हिरा गारगोटीच्या दगडापेक्षा कठीण असतो. त्याचप्रमाणे तू त्यांच्यापेक्षा कठोर होशील. तू जास्त हट्टी होशील, म्हणजे तू त्या लोकांना घाबरणार नाहीस. माझ्या विरुध्द नेहमी जाणाऱ्या लोकांना तू घाबरणार नाहिस.”
10 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, माझा प्रत्येक शब्द तू ऐकला पाहिजेस, आणि ते शब्द लक्षात ठेवले पाहिजेस. 11 मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”
12 मग वाऱ्याने मला उचलले. नंतर मला माझ्यामागून आवाज आला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे प्रचंड होता. त्यांतून “परमेश्वराच्या वैभवाचा धन्यावाद असो” असे शब्द आले. 13 मग त्या प्राण्यांचे पंख फडफडले. पंख एकमेकांना भिडताना प्रचंड आवाज झाला. त्यांच्या पुढील चाकांचा खडखडाट झाला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे होता. 14 वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्मा [a] फार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती. 15 नंतर मी, तेल अबीब येथे सक्तीने राहत असलेल्या इस्राएली लोकांकडे गेलो. ते खबार कालव्याजवळ राहात होते. तेथे राहणाऱ्या लोकांना मी अभिवादन केले. मी त्यांच्याबरोबर सात दिवस भीतिग्रस्त होऊन गप्प बसून राहिलो.
इस्राएलचा पहारेकरी
16 सात दिवसांनी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा: 17 “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे. 18 जर मी म्हणालो ‘हा वाईट माणूस मरेल,’ तर तू त्या माणसाला इशारा दिलाच पाहिजेस. तू त्याला त्याचा जीवनक्रम बदलायला आणि दुष्कृत्ये करण्याचे टाळायला सांगितले पाहिजेस. जर तू त्याला इशारा केला नाहीस, तर तो मरेल. त्याने पाप केले, म्हणून तो मरेल. पण तरीसुद्धा त्याच्या मृत्यूसाठी मी तुला जबाबदार धरीन. का? कारण तू त्याच्याकडे जाऊन त्याला वाचविले नाहीस.
19 “कदाचित् असेही होईल की तू एखाद्याला सावध करशील, त्याला त्याचा मार्ग बदलायला सांगशील, दुष्कृत्ये न करण्याचे आवाहन करशील. पण त्याने तुझे ऐकले नाही, तर तो मरेल. तो त्याच्या पापामुळे मृत्यू पावेल, पण तू त्याला सावध केले होतेस, म्हणून तुझा स्वतःचा जीव वाचेल.
20 “किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील.
21 “पण तू सज्जन माणसाला सावध केलेस आणि पाप न करण्याबद्दल सांगितलेस आणि त्याने पाप करण्याचे सोडून दिले, तर तो मरणार नाही. का? कारण तू सांगितले आणि त्याने ऐकले. अशा प्रकारे तू तुझा स्वतःचाच जीव वाचविला.”
22 मग तेथेच परमेश्वराचा वरदहस्त मला लाभला. तो मला म्हणाला, “उठ आणि दरीकडे जा. तेथे मी तुझ्याशी बोलेन.”
23 मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो. 24 पण वारा आला आणि त्याने मला वर उचलले. तो मला म्हणाला, “घरी जा, आणि स्वतःला घरात कोंडून घे. 25 मानवपुत्रा, लोक दोऱ्या घेऊन येतील आणि तुला बांधतील. ते तुला बाहेर लोकांमध्ये जाऊ देणार नाहीत. 26 मी तुझी जीभ टाळ्याला चिकटवीन. मग तुला बोलता येणार नाही. मग त्या लोकांना ते चुकीचे वागत आहेत हे सांगायला कोणीही नसेल. का? कारण ते नेहमीच माझ्याविरुद्व जातात. 27 मी तुझ्याशी बोलेन आणि नंतर तुला बोलण्याची परवानगी देईन. पण तू त्यांना ‘परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो’ असे सांगितलेच पाहिजे. एखाद्याने ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा, न ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा! ते लोक नेहमीच माझ्याविरुद्व वागतात.
प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र
39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
मी फार चिडलो होतो.
3 मी फार रागावलो होतो
आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
म्हणून मी काही तरी बोललो.
4 माझे काय होईल?
हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.
7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
तूच माझी आशा आहेस!
8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
9 मी माझे तोंड उघडणार नाही.
मी काही बोलणार नाही.
परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
मी थोड्याच वेळात जाणार आहे.
2006 by World Bible Translation Center