Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 21-22

दावीद अहीमलेख याजकाकडे जातो

21 मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला. दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.

अहीमलेख त्याला भेटायला चार पावले पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने कापरे भरले होते. दावीदला त्याने विचारले, “तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?”

दावीदाने सांगितले, “राजाच्या खास आज्ञेवरुन मी आलो आहे. त्यानुसार हे काम गुप्त ठेवायचे आहे. त्याबद्दल कोणालाही काही कळू द्यायचे नाही. माझी माणसे विशिष्ट संकेतस्थळी मला भेटणार आहेत. आता आधी तुझ्या जवळ खायला द्यायला काय आहे ते सांग. पाच भाकरी किंवा जे असेल ते दे.”

तेव्हा याजक म्हणाला, “साधी भाकर तर आत्ता नाही पण पवित्र भाकर आहे. तुझ्या अधिकाऱ्यांचा बायकांशी संबंध आला नसेल तर त्यांना ती चालेल.”

दावीद म्हणाला, “आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युध्दावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघालो तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको.”

पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातली ही होती.

दवेग नावाचा शौलाचा एक अधिकारी त्या दिवशी तेथे होता. तो अदोमी असून शौलाच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेले [a] होते.

दावीदाने अहीमलेखला विचारले, “इथे भाला किंवा तलवार आहे का? राजाचे काम फार निकडीचे असल्यामुळे मला तातडीने निघावे लागले. त्यामुळे मी माझे शस्त्र बरोबर आणू शकलो नाही.”

पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ट्याला तू एलाच्या खोऱ्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदच्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.”

दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”

गथ येथील शत्रुकडे दावीद पळ काढतो

10 शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला. 11 आखीशच्या अधिकाऱ्याला हे आवडले नाही. त्याचे अधिकारी म्हणाले, “हा दावीद, इस्राएल भूमीचा राजा. इस्राएल याचे गुणगान गातात. नाचत गात ते याच्याविषयी म्हणतात,

“शौलाने हजार शत्रूंना मारले
    तर दावीदाने लाखोंचा वध केला.”

12 दावीदाने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. गथचा राजा आखीश याला सामोरे जायची त्याला भीती वाटली. 13 म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठवले. प्रवेशद्वारावर थुंकला, दाढीवर लाळ ओघळू दिली.

14 आखीश हे पाहून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे. याला इथे कशाला येऊ दिलेत? 15 वेड्यांची इथे कमतरता आहे की काय? माझ्यासमोर याचे वेडेचाळे चालायचे नाहीत. त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका.”

दावीदाची भटकंती

22 दावीद मग गथहून निघाला तो अदुल्लाम गुहेत पोचला. दावीदाच्या भावांनी आणि नातलगांनी हे ऐकले तेव्हा ते त्याला तिथे भेटायला गेले. वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.

अदुल्लामहून तो मवाबातील मिस्पा येथे गेला. मवाबच्या राजाला तो म्हणाला, “परमेश्वराने माझे काय करायचे ठरवले हे मला कळेपर्यंत कृपया माझ्या आईवडिलांना तुमच्या आश्रयाने राहू द्या.” एवढे बोलून आपल्या आईवडिलांना त्याने तिथे सोडले आणि स्वतः किल्ल्याकडे परतला.

पण गाद हा संदेष्टा दावीदला म्हणाला, “इथे राहू नको. यहूदा प्रांतात जा.” तेव्हा दावीद निघाला आणि हरेथ नामक वनात आला.

अहीमलेखच्या कुटुंबियांचा शौलकडून वध

दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांचा इतरांना पत्ता लागला आहे हे शौलला कळले. तो गिबा येथे एका टेकडीवर झाडाखाली बसला होता. हातात भाला होता. सर्व अधिकारी त्याच्या भोवती उभे होते. शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का? माझ्याविरुद्ध तुम्ही कटकारस्थाने रचत आहात. योनाथान बद्दल तुमच्या पैकी एकानेही मला विश्वासात घेतले नाही. या इशायच्या मुलाबरोबर त्याचा करार झालेला आहे हे कोणी मला सांगितले नाही. तुमच्या पैकी कोणी माझी काळजी घेत नाही. योनाथानने दावीदला प्रोत्साहन दिले हे तुमच्यापैकी कोणीही मला कळू दिले नाही. लपून राहून माझ्यावर हल्ला करायला योनाथानने दावीदला, माझ्या सेवकाला सांगितले. दावीदाचे सध्या तेच चालले आहे.”

अदोमी दवेग तेव्हा तिथेच होता. तो म्हणाला, “मी दावीदला नोब येथे पाहिले. अहिटूबचा मुलगा अहीमलेख याला भेटायला तो आला होता. 10 अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”

11 हे ऐकून शौलाने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोब येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले. 12 शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.”

अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”

13 शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायचा मुलगा दावीद यांनी माझ्याविरुध्द कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज्ज आहे.”

14 अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावईही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात. 15 त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची ही पहिलीच वेळ नव्हे. मला किंवा माझ्या नातेवाईकांना बोल लावू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत. काय चालले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.”

16 पण राजा त्याला म्हणाला, “तू आणि तुझे नातेवाईक यांना मृत्युदंड दिला पाहिजे.” 17 राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”

पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला. 18 तेव्हा शौल राजाने दवेगला आज्ञा केली, “याजकांना तू ठार कर.” तेव्हा अदोमी दवेगाने ती आज्ञा अंमलात आणली. दवेगने त्यादिवशी पंच्याऐंशी याजकांना जिवे मारले. 19 नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष बायका, मुले, तान्ही बाळे, इतकेच नव्हे तर गायीगुरे, गाढवे, मेंढरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.

20 पण त्यातून अब्याथार हा अहीमलेखचा मुलगा निसटला. अहीमलेख हा अहीटूबचा मुलगा. अब्याथार पळून जाऊन दावीदाला मिळाला. 21 परमेश्वराच्या याजकांना शौलने ठार केल्याचे त्याने दावीदला सांगितले. 22 तेव्हा दावीद अब्याथारला म्हणाला, “मी नोब येथे त्यादिवशी त्या अदोमी दवेगला पाहिले होते. तो शौलला ही खबर देईल हेही मला माहीत होते. तुझ्या वडीलांच्या कुटुंबाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. 23 शौल तुझ्या जिवावर उठला आहे तसा माझ्याही जीवावर उठला आहे. माझ्याजवळ राहा. भिऊ नको. माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”

1 करिंथकरांस 3

माणसांना अनुसरणे चुकीचे आहे

परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले. मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय? कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?

तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले. मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे. जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत.

तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. 10 आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. पण दुसरा कोणी तरी त्यावर बांधतो, परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी. 11 येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. 12 जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, 13 तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल. कारण तो दिवस ते स्पष्ट करील, तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नि प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल. 14 ज्या कोणाचे बांधकाम, जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल, त्याला बक्षीस मिळेल. 15 जर एखाद्याचे काम जळून गेले, तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल.

16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय? 17 जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.

18 कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. 19 कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.” 20 आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.” 21 म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 22 तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 23 तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.

यहेज्केल 1

प्रस्तावना

मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्या [a] चौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे. यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला. तेथेच त्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली.

परमेश्वर देवाच्या सिंहासनाचा रथ

उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता. त्यामध्ये चार प्राणी होते. ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसत होते. पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते. त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते. त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. त्यांचे पंख एकमेकांना स्पर्श करत होते. ते चालताना वळत नव्हते. ते ज्या दिशेकडे पाहत, त्याच दिशेला जात होते.

10 प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते. 11 ते प्राणी पंखांचा उपयोग स्वतःला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत. 12 ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वारा [b] जेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते.

13-14 ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.

15-16 मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती. 17 चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते.

18 चाकांच्या धावा उंच आणि भयंकर होत्या. चारही चाकांच्या धावांवर सर्वत्र डोळे होते.

19 चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात. 20 वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता. 21 म्हणून जर प्राणी हालले, तर चाकेही फिरत. प्राणी थांबले की चाकेही थांबत. जर चाके हवेत उडाली, तर प्राणीही वर जात. का? कारण वारा चाकांत होता.

22 त्या प्राण्यांच्या डोक्यांवर विलक्षण असे काहीतरी होते. वाडगा [c] पालथा घालावा तसे ते दिसत होते. तो वाडगा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होता. 23 ह्या वाडग्याखाली, प्रत्येक प्राण्याला पंख होते आणि ते जवळच्या दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत होते. दोन पंख एका बाजूला व दोन पंख दुसऱ्या बाजूला पसरवून ते अंग झाकीत.

24 मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत.

25 ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. 26 त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती. 27 मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती. 28 त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.

स्तोत्रसंहिता 37

37 तू दुष्टांवर चिडू नकोस.
    वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या
    आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास
    तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे
    तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
परमेश्वरावर अवलंबून राहा.
    त्याच्यावर विश्वास ठेव.
    आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
परमेश्वर तुझा चांगुलपणा
    आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा
    दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस.
तुला स्वत:ला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे.
    परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत.
    तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
    आणि ते शांती व समाधानात जगतील.

12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
    दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
13 परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो.
    त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात.
    त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल
    व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या
    जमावापेक्षा चांगले असतात.
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल
    आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.
18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो
    त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही.
    भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत
    आणि त्या माणसांचा नाश होणार आहे
त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील.
    त्यांचा संपूर्ण नाश होईल.
21 वाईट माणूस पैसे चटक्‌न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही.
    परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
    परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
23 परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो.
    परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल
    तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे.
    आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही
    चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो
    आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
27 जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास
    आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील.
28 परमेश्वराला न्याय आवडतो.
    तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही.
तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल
    पण दुष्टांचे निर्दालन करेल.
29 चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
    ते सदैव त्या जमिनीवर राहातील.
30 चांगला माणूस चांगला उपदेश करतो
    आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.
31 परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते.
    तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.

32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
33 परंतु परमेश्वर त्यांना तसे करु देत नाही.
    तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही.
34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा.
    त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल
    आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.

35 मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा
    दुष्टमाणूस पाहिला होता.
36 परंतु नंतर तो नाहीसा झाला,
    मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
37 शुध्द आणि सत्यवादी राहा
    शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल.
38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल.
    आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.
39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो
    ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले
    लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center