M’Cheyne Bible Reading Plan
योनाथानची दावीदला मदत
19 शौलाने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे. 2-3 त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोधत आहे. सकाळी तू शेतात जाऊन लप. मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असशील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबद्दल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”
4 योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे. 5 गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”
6 शौलाने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”
7 तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलाकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.
पुन्हा दावीदाला मारायचा शौलाचा प्रयत्न
8 पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला. 9 पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता. 10 शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.
11 शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली. 12 तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला. 13 मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
14 दावीदाला पकडून आणण्यासाठी शौलाने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.
15 जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”
16 जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदाला पळून जायला मदत केलीस.”
मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
दावीद रामा येथे जातो
18 दावीद जो पळाला तो रामा येथे शमुवेलकडे गेला. शमुवेलला त्याने शौलाने जे जे केले ते सर्व सांगितले. मग शमुवेल आणि दावीद संदेष्ट्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.
19 दावीद रामा नजीकच्या छावणीवर असल्याचे शौलाला कळले. 20 त्याने दावीदाच्या अटकेसाठी माणसे पाठवली. पण ती माणसे तिथे पोहोंचली तेव्हा संदेष्टे संदेश देत होते. शमुवेल त्यांचे नेतृत्व करत उभा होता. शौलाच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.
21 शौलाच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलाने तिसऱ्यांदा जासूद पाठवले. तेही तसेच करु लागले. 22 शेवटी शौल स्वतःच रामा येथे आला. सेखू येथील खड्या जवळच्या मोठ्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुवेल आणि दावीदाचा ठावठिकाणा विचारला.
लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तळावर आहेत.”
23 तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही होऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते. 24 नंतर त्याने अंगावरची वस्त्रे उतरवली. शमुवेलच्या समोर तो संदेश देऊ लागला.
दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवस्थेत होता म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेष्टयांपैकी आहे की काय?”
1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता निवडलेला, मी पौल आणि बंधु सोस्थनेस यांजकडून 2 देवाच्या सेवेला समर्पित केलल्या करिंथ येथील मंडळीस तसेच देवाने पवित्र होण्यास बोलाविलेल्या (पाचारलेल्या) व येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणऱ्या सर्व बंधूजनांस:
3 देव पिता आणि त्यांचा व आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा व शांति असो.
पौल दवाचे उपकार मानतो
4 मी नेहमीच माझ्या देवाचे तुमच्यासाठी उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुम्हांला मिळाली आहे, 5-6 त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक बाबतीत संपन्र झाला आहात: सर्व प्रकारच्या बोलण्यात व सर्व प्रकारच्या ज्ञानात, जशी आम्ही ख्रिस्ताविषयी साक्ष दिली, तुमच्यात ती पक्की झाली, याचा परिणाम असा झाला की, 7 तुम्ही कोणत्याही दानात कमी पडत नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहता. 8 तो सुद्धा आपल्या प्रभु येशूच्या दिवशी शेवटपर्यंत तुम्हांस निर्दोष असे प्रस्थापित करील. 9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभु याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले होते तो देव विश्वासनीय आहे.
करिंथ येथील मंडळीतील समस्या
10 परंतु बंधूनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावांमध्ये मी तुम्हांस विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच विचाराने व एकाच हेतूने परिपूणे व्हावे.
11 कारण क्लोअच्या घरातील माणसांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत, 12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी पेत्राचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.” 13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा, झालाय का? 14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. 15 यासाठी की कोणीही म्हणू नये की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला. 16 स्तेफनाच्या घरच्यांचासुद्धा मी बाप्तिस्मा केला, पण उरलेल्यांविषयी म्हणाल, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. 17 कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले, ती भाषणाच्या ज्ञानाने नव्हे, तर अशासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य निरर्थक होऊ नये.
ख्रिस्तामध्ये देवाचे सामर्थ्य आणि ज्ञान
18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19 कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,
“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन,
आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” (A)
20 ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का? 21 म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.
22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे. 24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. 25 तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे.
26 तर आता बंधुभागिनींनो, देवाने तुम्हांला केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे सामर्थ्यशाली नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे उच्च कुळातले नव्हते, 27 त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे. 28 आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. 29 यासाठी की कोणीही देवासमोर बढाई मारु नये. 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला. 31 यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, “जो बढाई मारतो त्याने देवाविषयी बढाई मारावी.”
यरुशलेमवरील हल्ल्यातील भयानकता
4 सोने कसे निस्तेज झाले आहे पाहा!
चांगले सोने कसे बदलले आहे बघा!
रत्ने सगळीकडे पसरली आहेत.
रस्त्याच्या नाक्या-नाक्यावर ती विखुरली आहेत.
2 सियोमच्या लोकांची किंमत भारी आहे.
ते आपल्या वजनाचे मोल सोन्यात ठरवितात.
पण आता शत्रू त्यांना मातीच्या जुन्या रांजणांप्रमाणे मानतो.
कुंभाराने केलेल्या मडक्याप्रमाणे तो त्यांना किंमत देतो.
3 राजकुत्रेसुध्दा आपल्या पिल्लांना भरवितात.
कोल्हीही आपल्या पिल्लांना दुध देते.
पण माझ्या लोकांची कन्या दुष्ट आहे.
त्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे आहेत.
4 तान्ह्या मुलांची जीभ तहानेने
टाळ्याला चिकटली आहे.
बालके भाकरी मागतात.
पण त्यांना कोणीही भाकरी देत नाही.
5 एकेकाळी ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्ले,
तेच आता रस्त्यावर मरत आहेत.
जे चांगल्या, लाल कपड्यात वाढले,
ते आता कचऱ्याच्या ढिगांतून मिळेल ते उचलतात.
6 माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते.
सदोम व गमोरा यांच्यापेक्षाही
ते पाप मोठे होते.
सदोमचा व गमोराचा अचानक नाश झाला,
आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.
7 यहुदातील काही लोकांनी
एका विशेष प्रकारे आपले जीवन देवाला वाहिले होते.
ते फार शुध्द होते.
ते हिमापेक्षा शुभ्र होते.
दुधापेक्षा पांढरे होते.
त्यांची कांती पोवळयांप्रमाणे लाल होती.
त्यांच्या दाढ्या म्हणजे
जणू काही तेजस्वी इंद्रनीलच.
8 पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत.
त्यांना रस्त्यांत कोणी ओळखतसुध्दा नाही.
त्यांची कातडी सुरकुतली आहे.
लाकडाप्रमाणे शुष्क होऊन ही हाडाला चिकटली आहे.
9 उपासमारीने मरण्यापेक्षा तलवारीने मेलेले बरे!
कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते.
ते व्याकुळ झाले होते.
शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.
10 त्या वेळी, प्रेमळ बायकांनीसुध्दा आपली मुले
शिजविली ती मुलेच त्यांच्या आयांचे अन्न झाले.
माझ्या लोकांचा नाश झाला.
तेव्हा असे घडले.
11 परमेश्वराने आपला सगळा क्रोध प्रकट केला.
त्यांने आपला सगळा राग बाहेर काढला.
त्याने सियोनमध्ये आग लावली
त्या आगीत पायापर्यंत सियोन बेचिराख झाले
12 जगातील राजे, जे घडले
त्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत.
पृथ्वीवरील लोकांचा ह्यावर
विश्वास बसला नाही.
यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू
येऊ शकेल ह्यवर कोणाचाच विश्वास बसला नाही.
13 यरुशलेमच्या संदेष्ट्यांनी पाप केले,
धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली,
लोकांनी प्रामाणिक माणसांचे रक्त यरुशलेममध्ये सांडले,
म्हणूनच असे घडले.
14 संदेष्टे आणि याजक आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते.
ते रक्ताने माखले होते.
कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत
कारण ती रक्ताने भरली होती.
15 लोक ओरडले, “लांब व्हा! दूर ब्ह!
आम्हाला शिवू नका.”
ते लोक इकडे तिकडे भटकले कारण त्यांना घरे नव्हती.
दुसऱ्या राष्ट्रांतील लोक म्हणाले,
“त्यांनी आमच्याबरोबर राहू नये असेच आम्हाला वाटते.”
16 परमेश्वराने स्वतः त्या लोकांचा नाश केला.
त्याने त्यांची अजिबात काळजी घेतली नाही.
त्यांने याजकांना मानले नाही
त्यांने यहुदातील वृध्दांना दया दाखवली नाही.
17 मदतीची वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत.
पण कोठूनही मदत मिळत नाही.
आमचेरक्षण करण्यास एखादे राष्ट्र येत आहे का,
ह्यची आम्ही बुरुजावरुन टेहळणी केली.
पण एकही देश आमच्याकडे आला नाही.
18 सर्वकाळ, आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली.
आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही.
आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते!
आमचा अंत आला!
19 आमचा पाठलाग करणारे
गरुडापेक्षाही वेगवान होते.
त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला.
आम्हाला पकडण्यासाठी ते वाळवंटात दडून बसले.
20 आमच्या दृष्टीने राजा सर्वश्रेष्ठ होता.
तो आमचा श्वास होता.
पण त्यांनी राजाला सापळ्यात पकडले.
प्रत्यक्ष परमेश्वरानेच राजाची निवड केली होती.
राजाबद्दल आम्ही असे म्हणालो होतो,
“आम्ही त्याच्या सावलीत राहू.
तो इतर राष्ट्रांपासून आमचे रक्षण करतो.”
21 अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा.
ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा.
पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल.
तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल,
तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.
22 सियोन, तुझी शिक्षा संपली.
आता पुन्हा तुला कैद करुन नेले जाणार नाही.
पण अदोमवासीयांनो, तुमची पापे उघडी करुन
परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.
दावीदाचे स्तोत्र.
35 परमेश्वरा माझ्या लढाया लढ.
माझे युध्द कर.
2 परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल.
ऊठ आणि मला मदत कर.
3 भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांशी लढ
परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”
4 काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर.
त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते
लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत.
त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
5 त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव.
परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
6 परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.
7 मी काहीही चूक केली नाही तरी
त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
8 म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे.
एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
9 नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन.
त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.
10 माझी सर्व हाडे म्हणतील,
“परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा,
तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”
11 साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे.
ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.
12 मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील.
परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.
13 जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले,
अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले.
त्यांच्यासाठी प्रार्थना करुन मी हेच मिळवले का?
14 मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले.
मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखे वागवले.
आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे.
त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.
15 परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते.
मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो
परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
16 त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली.
त्यांनी माझ्यावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.
17 परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?
ते लोक माझा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव, माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत.
18 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.
मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.
19 माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत.
त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल. [a]
20 माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत.
या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत.
21 माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलत आहेत.
ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.”
22 परमेश्वरा, काय घडत आहे
ते तुला तरी दिसतं आहे ना?
मग गप्प बसू नकोस मला सोडून जाऊ नकोस.
23 परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा,
माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय दे.
24 परमेश्वरा, देवा तुझ्या न्यायी बुध्दीने मला न्याय दे
त्या लोकांना मला हसू देऊ नकोस.
25 “आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस.
परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
26 माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे.
माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते
ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते.
म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.
27 काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते.
ते सर्व लोक सुखी होवोत
ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे
त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”
28 म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन.
मी रोज तुझी स्तुती करेन.
2006 by World Bible Translation Center