M’Cheyne Bible Reading Plan
पवित्र कोशामुळे पलिष्ट्यांवर संकटे
5 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला. 2 तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला. 3 दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
4 पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी ती जमिनीवर पडलेली आढळली अश्दोदच्या लोकांनी ती मूर्ती उचलून पूर्ववत ठेवली. यावेळी परमेश्वराच्या पवित्र करारकोशा जवळ पडताना दागोनचे शिर आणि हात तुटून उंबरठ्यावर पडले होते. धड तेवढे शाबूत होते. 5 त्यामुळे अजूनही पुरोहित किंवा इतर लोक अश्दोदला दागोनच्या देवळात शिरतात तेव्हा उंबरठ्यावर पाऊल ठेवत नाही.
6 अश्दोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने सळो की पळो केले. त्यांना हर प्रकार त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैराण केले. जमीन, गलबतं यावर उंदरानी उच्छाद मांडला, गावातील लोक भयभीत झाले होते. 7 या घटना पाहून अश्दोदचे लोक म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा पवित्र करार कोश येथे ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यावर आणि आपल्या देवावर त्या परमेश्वराचा कोप झाला आहे.”
8 अशदोदच्या लोकांनी पलिष्ट्यांच्या पाचही अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली.
अधिकाऱ्यांनी हा पवित्र कोश गेथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ट्यांनी तो पवित्र करारकोश हलवला.
9 गथ येथे तो नेऊन ठेवल्यावर त्या शहरावर परमेश्वराचा कोप ओढवला. त्यामुळे तेथील लोक भयभीत झाले. लहान मोठी सगळी माणसे वेगवेगळ्या व्याधींनी हैराण झाली. तेथील लोकांच्या अंगावर गळवे उठली. 10 तेव्हा पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश एक्रोन येथे हलवला.
एक्रोन येथे हा पवित्र कोश येताच तेथील लोक तक्रार करु लागले. “इस्राएलच्या परमेश्वराचा हा पवित्र कोश आमच्या एक्रोनमध्ये आणून आमचा जीव द्यायचा आहे का?” असे ते विचारु लागले. 11 एक्रोनच्या लोकांनी सर्व पलिष्टी अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून सांगितले “तो पवित्र कोश आमचे बळी घ्यायच्या आधी तो कोश होता तेथे परत पाठवा.”
एक्रोनचे लोक फार घाबरले. परमेश्वराने त्यांना त्रस्त करुन सोडले. 12 अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एक्रोनच्या लोकांचा आक्रोश आकाशाला भिडला.
परमेश्वराच्या पवित्र कोशाची पाठवणी
6 पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात सात महिने ठेवला. 2 त्यांनी याजकांना आणि शकुन पाहणाऱ्यांना बोलावून विचारले “या कोशाचे आता काय करायचे? तो परत कसा पाठवायचा ते सांगा.”
3 याजक आणि शकुन पाहणारे म्हणाले, “तुम्ही हा कोश परत पाठवणार असाल तर तो तसाच पाठवू नका. त्याच्या बरोबर देणगीदाखल काही अर्पणे पाठवा म्हणजे इस्राएलांचा देव तुमच्या पापांचे हरण करील. तुम्ही बरे व्हाल. शुध्द व्हाल. त्याचा क्रोध मावळावा म्हणून तुम्ही एवढे करा.” [a]
4 पलिष्ट्यांनी विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराने क्षमा करावी म्हणून आम्ही कोणत्या भेटी अर्पण कराव्यात?”
याजक आणि शकुन पाहणारे यांनी सांगितले, “प्रत्येक नगराचा एक असे तुम्ही पाच पलिष्टी अधिकारी आहात. तुम्ही सर्व सारखेच हैराण झालेले आहात. तेव्हा, गळवांसारख्या दिसणाऱ्या पाच सोन्याच्या प्रतिमा आणि पाच सोन्याचे उंदीर करा. 5 अशा पाच पाच प्रतिमा करुन त्या इस्राएलींच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, व तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल. 6 मिसरचे लोक आणि फारो यांच्यासारखे आडमुठेपणा करु नका. मिसरच्या लोकांना देवाने शिक्षा केली. म्हणूनच इस्राएल लोक मिसर सोडून जाऊ शकले.
7 “एक नवीन गाडी तयार करुन नुकत्याच व्यायलेल्या दोन गाई तिला जुंपा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्यांच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आणून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका. [b] 8 आता परमेश्वराचा पवित्र करारकोश गाडीत ठेवा. त्याच्याशेजारी एका थैलीत त्या सुवर्ण प्रतिमा ठेवा. तुमच्या पापक्षालनासाठी त्या परमेश्वराला अर्पण केलेल्या आहेत. मग गाडी सरळ जाऊ द्या. 9 ती कशी जाते ते पाहा. गाडी बेथशेमेश कडे इस्राएलांच्या प्रदेशात गेली तर या व्याधी, हे अरिष्ट परमेश्वरामुळेच ओढवले होते असे समजू. पण गाई सरळ त्या दिशेने गेल्या नाहीत, तर हा इस्राएलच्या परमेश्वराचा कोप नव्हता, हे अरिष्ट असेच कोसळले असे आपण समजू.”
10 पलिष्ट्यांनी हा सल्ला मानून त्या प्रमाणे सर्व काही केले. नुकत्याच व्यालेल्या दोन गाई त्यांनी मिळवल्या. त्यांना गाडीला जुंपून वासरे गोठ्यात ठेवली. 11 मग करार कोश गाडीत चढवला. गळवे आणि उंदीर यांच्या सुवर्ण प्रतिमांची थैलीही त्याशेजारी ठेवली. 12 गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हद्दीपर्यंत पलिष्ट्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.
13 बेथशेमेशमधले शेतकरी त्या खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र करारकोश. कोशाचे दर्शन झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले. 14-15 बेथशेमेश येथील यहोशवाच्या शेतात येऊन एका मोठ्या खडकापाशी गाडी थांबली. स्थानिक लोकांनी त्या गाडीची लाकडे फोडली आणि गाईचा बळी दिला. परमेश्वराला तो अर्पण केला.
लेवींनी मग परमेश्वराचा पवित्र कोश उतरवला. तसेच सुवर्ण प्रतिमांची थैली घेतली. कोश आणि ती थैली त्या प्रचंड खडकावर ठेवली. बेथशेमेशच्या लोकांनी त्या दिवशी परमेश्वराला यज्ञार्पणे वाहिली.
16 त्या पाच पलिष्टी अधिकाऱ्यांनी हे सर्व नीट पाहिले आणि ते त्याच दिवशी एक्रोन येथे परतले.
17 अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत. 18 सोन्याचे उंदीरही करुन पाठवले. पाच पलिष्टी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संख्येच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावाभोवती तटबंदी असून सभोवार खेडी होती.
बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशवाच्या शेतात तो खडक अजूनही आहे. 19 पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला. 20 ते म्हणाले, “त्या कोशाचे जतन करील असा याजक कोठे आहे? इथून हा कोश कोठे जायला पाहिजे?”
21 किर्याथ-यारीम येथे एक याजक होता. लोकांनी त्याच्याकडे संदेश पाठवला. “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश पाठवला आहे. तरी येऊन तो आपल्या नगरात घेऊन जा” असा त्याला निरोप पाठवला.
देवाशी नीतिमान
5 ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. 2 आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. 3 याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. 4 आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. 5 आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.
6 आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. 7 आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. 8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
9 तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.
आदाम आणि ख्रिस्त
12 म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. 13 नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. 14 परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले.
देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे. 15 पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली. 16 आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. 17 एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.
18 म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. 20 पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली. 21 अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही, नीतिमत्वाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनसाठी राज्य करील.
43 अशा रीतीने यिर्मयाने परमेश्वराकडून, त्यांच्या देवाकडून आलेला संदेश लोकांना सांगितला. परमेश्वराने लोकांना सांगण्यास सांगितलेली प्रत्येक गोष्ट यिर्मयाने लोकांना ऐकविली.
2 होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहचा मुलगा योहानान व इतर काही लोक गर्विष्ठ व दुराग्रही होते. ते सर्व यिर्मयावर रागावले. ते यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, तू खोटे बोलत आहेस. ‘तुम्ही मुळीच मिसरला जाऊन राहू नये.’ असे सांगण्यासाठी आमच्या परमेश्वर देवाने तुला आमच्याकडे पाठविले नाही. 3 यिर्मया, नेरीयाचा मुलगा बारुख तुला आमच्याविरुद्ध भडकावीत आहे असे आम्हाला वाटते. आम्हाला खास्द्यांच्या हाती देण्याची त्याची इच्छा आहे त्यांनी आम्हाला मारावे अथवा कैदी म्हणून बाबेलला न्यावे म्हणून तो तुझ्यामार्फत असे सांगत आहे.”
4 म्हणून योहानान, सेनाधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन केले परमेश्वराने त्यांना यहूदात राहण्याची आज्ञा दिली होती. 5 पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान व सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते. 6 आता, योहानान व सेनाधिकारी यांनी, पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना गोळा करुन मिसरला नेले. ह्या लोकांत राजकन्याही होत्या (नबूजरदानने गदल्याला ह्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा नबूजरदान प्रमुख होता) योहानानने संदेष्टा यिर्मया व नेरीयाचा मुलगा बारुख ह्यांनाही बरोबर नेले. 7 त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले.
8 तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचा पुढीलप्रमाणे संदेश मिळाला: 9 “यिर्मया, काही मोठे धोंडे घे. ते तहपन्हेस येथील फारोच्या कचेरीसमोरच्या विटामातीच्या पादचारीमार्गावर पुर. तू यहूदातील लोक पाहत असताना, कर. 10 मग हे सर्व पाहत असलेल्या यहूदी लोकांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, मी बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सर, यास येथे पाठवीन, तो माझा सेवक आहे. मी पुरलेल्या ह्या दगडांवर मी त्याचे सिंहासन ठेवीन, तो ह्या दगडावर त्याचे छत्र उभारील. 11 नबुखद्नेस्सर येथे येईल व मिसरवर चढाई करील. ज्यांचे मरण आहे, त्यांना तो ठार मारील. ज्यांना कैद व्हायची आहे, त्यांना तो कैद करील. ज्यांचे मरण तलवारीने आहे, त्यांना तो तलवारीने ठार करील. 12 तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल. 13 तो मिसरमधील सूर्य देवतेच्या देवळातील स्मृती शिलांचा नाश करील आणि तेथील दैवतांची देऊळे जाळून टाकील.’”
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
2006 by World Bible Translation Center