M’Cheyne Bible Reading Plan
शमुवेलचे राजाबद्दल लोकांसमोर भाषण
12 शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे. 2 तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले. 3 हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
4 यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”
5 तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”
6 मग शमुवेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले. 7 आता सर्वजण येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणती सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.
8 “याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
9 “पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले. 10 तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, ‘आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.’
11 “तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली. 12 पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले. 13 तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली. 14 परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील. 15 पण त्याचा अवमान केलात, त्याच्या आज्ञेविरुध्द बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.
16 “आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा. 17 सध्या गव्हाच्या कापणीचे दिवस [a] आहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.” 18 आणि शमुवेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुवेलची धास्ती घेतली.
19 ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
20 शमुवेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खरे, पण घाबरुन जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा. 21 मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू, निव्वळ पुतळे, तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.
22 “पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही. 23 आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन. 24 पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत. 25 पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”
10 बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की, 2 त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही. 3 देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. 4 कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.
5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [a] 6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) 7 किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)
8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [b] ते वचन हे आहे 9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [c] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [d]
14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील? 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!”p
16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?” 17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.
18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय?” होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:
“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे
आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.” (A)
19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो,
“खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन.
विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.” (B)
20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो,
“जे मला शोधीत नव्हते
त्यांना मी सापडलो,
जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.” (C)
21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो,
“ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली,
आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.” (D)
अम्मोनसंबंधी संदेश
49 हा संदेश अम्मोनी लोकांसाठी आहे. परमेश्वर म्हणतो,
“अम्मोनी लोकांनो, इस्राएली लोकांना
मुले नाहीत असे तुम्हाला वाटते का?
आईवडील गेल्यावर तेथील जमिनीला
कोणी वारस नाही असे तुम्ही समजता का?
म्हणूनच कदाचित् मिलकोमने गादची भूमी घेतली का?”
2 परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा
खणखणाट ऐकण्याची वेळ येईल.
राब्बाचा नाश होईल.
ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल.
त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील.
ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली,
त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील.
पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.”
परमेश्वराने हे सांगितले.
3 “हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे.
अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा.
शोकप्रदर्शक कपडे घालून रडा!
सुरक्षेसाठी शहराकडे पळा!
का? कारण शत्रू येत आहे.
ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील.
4 तुम्ही तुमच्या सामर्थ्याबद्दल बढाया मारता.
पण तुम्ही दुर्बल होत आहात.
तुमचा पैसा तुम्हाला वाचवील असा तुम्हाला विश्वास वाटतो
तुमच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही असे तुम्ही समजता.”
5 पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो:
“मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन.
तुम्ही सर्व पळून जाल
आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.”
6 “अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
अदोमबाबत संदेश
7 हा संदेश अदोमसाठी आहे सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो:
“तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का?
अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का?
त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का?
8 ददानच्या लोकांनो, पळा! लपा!
का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन.
9 “मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात
पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात.
चोरसुद्धा सर्व नेत नाही.
10 पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन,
मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन.
तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही.
त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील.
11 त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही.
त्याच्या बायका निराधार होतील.
पण मी (देव) तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन.
तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात.”
12 परमेश्वर म्हणतो: “काही लोक शिक्षेला पात्र नाहीत. पण त्यांना सोसावे लागते. पण अदोम, तू शिक्षेला पात्र आहेस. म्हणून तुला खरोखरीच शिक्षा होईल. तुझ्या शिक्षेतून तुझी सुटका होणार नाही. तुला शिक्षा होईलच.” 13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.”
14 मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला
परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला.
तो असा “तुमची सैन्ये गोळा करा.
लढायला सज्ज व्हा.
अदोमकडे कूच करा.
15 अदोम, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र बनवीन.
प्रत्येकजण तुझा तिरस्कार करील.
16 अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस!
म्हणून तू स्वतःला श्रेष्ठ समजलास!
पण तू मूर्ख बनलास!
तुझ्या गर्वाने तुला फसविले.
अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस
पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस
तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
17 “अदोमचा नाश होईल.
लोकांना ते पाहून धक्का बसेल.
नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील.
18 सदोम, गमोरा त्याभोवतालची गावे यांच्याप्रमाणे अदोमचा नाश होईल.
तेथे कोणीही राहणार नाही.”
देव असे म्हणाला,
19 “यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.”
20 म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने
आखलेला बेत काय आहे तो ऐका:
तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे.
ते काय ठरविले आहे तेही ऐका.
शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल.
त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.
21 अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल.
त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू जाईल.
22 हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे.
परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल.
त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील
प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील.
दिमिष्काबद्दल संदेश
23 हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे.
“हमाथ व अर्पाद ही गावे घाबरली आहेत
वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत.
त्यांचा धीर खचला आहे.
ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही
24 दिमीष्क दुबळे झाले आहे.
लोकांना पळून जायचे आहे.
लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत.
प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत.
25 “दिमिष्क एक सुखी नगरी होती.
लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही.
26 म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील.
त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
27 “मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन.
ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.”
केदार व हसोरसाठी संदेश
28 हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला. परमेश्वर म्हणतो,
“जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा.
पूर्वेच्या लोकांचा नाश करा.
29 त्यांचे तंबू व कळप नेले जातील.
त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल.
लोक त्यांना ओरडून सांगतील.
‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’
30 लवकर पळा! हासोरवासीयांनो, लपायला चांगली जागा शोधा.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे.
तुमचा पराभव करण्यासाठी त्याने हुशारीने बेत रचला आहे.
31 “आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे.
त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणासाठी दरवाजे वा कुंपण नाही.
त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत.
परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’
32 शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल.
ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात. [a]
मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन.
मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
33 “हासोरला फक्त कोल्ह्यांची वस्ती होईल.
तेथे कोणीही मनुष्यप्राणी राहणार नाही.
ती जागा निर्जन होईल.
तेथे कायमचे ओसाड वाळवंट होईल.”
एलामबद्दल संदेश
34 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता.
35 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“मी लवकरच एलामचे धनुष्य मोडीन.
धनुष्य हे त्याचे सर्वांत सामर्थ्यशाली शस्त्र आहे.
36 मी एलामच्या विरुद्ध चार वारे सोडीन.
मी त्यांना आकाशाच्या चार कोपऱ्यातून सोडीन.
जगाच्या पाठीवर जेथे चारी वारे पोहोचतील अशा ठिकाणी मी त्यांना पाठवीन.
एलामचे लोक कैदी म्हणून प्रत्येक राष्ट्रांतून नेले जातील.
37 एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन.
जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन.
मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन.
मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन.
मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील.
38 नियंत्रण करणे माझ्या हातात आहे,
हे मी एलामला दाखवून देईन.
मी राजा व त्याचे अधिकारी यांना ठार करीन.”
हा देवाचा संदेश आहे.
39 “पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
दावीदाचे स्तोत्र.
26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
2 परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
3 मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
4 मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
5 मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
6 परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
7 परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
8 परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
9 परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.
दावीदाचे स्तोत्र.
27 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस.
मला कुणाचीही भीती बाळगायला नको.
परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे.
म्हणून मी कुणालाही भीत नाही.
2 माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील
ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील.
माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन
माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
3 परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही.
युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही.
का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
4 मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
मला हे मागायचे आहे,
“मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे
मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन
आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”
5 मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील.
तो मला त्याच्या तंबूत लपवेल
तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
6 माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे.
परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन.
मी बळी देताना आनंदाने ओरडेन.
मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.
7 परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे.
माझ्याशी दयेने वाग.
8 परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे.
मला अगदी माझ्या ह्रदयातून तुझ्याशी बोलायचे आहे.
परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
9 परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस.
तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस.
मला मदत कर! मला दूर लोटू नकोस.
मला सोडू नकोस, देवा तूच माझा तारणारा आहेस.
10 माझे आईवडील मला सोडून गेले.
परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव.
मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले.
मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की
मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ.
सामर्थ्यवान आणि धीट हो
व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
2006 by World Bible Translation Center