M’Cheyne Bible Reading Plan
4 इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते.
इस्राएलाचा पलिष्ट्यांकडून पराभव
याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता. 2 पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.
पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले. 3 इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”
4 मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.
5 सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली. 6 पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.
7 परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही. 8 या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तऱ्हेच्या पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने. 9 पण पलिष्ट्यांनो, धीर धरा. मर्दासारखे लढा. पूर्वी हेच इस्राएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.”
10 तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. 11 पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.
12 त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता. 13 तो शिलोह येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाटत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. लोक तो ऐकून आकांत करु लागले. 14-15 एली आता अठ्ठ्याण्णव वर्षांचा झाला होता. आंधळा झाल्यामुळे त्याला काय घडतेय हे दिसत नव्हते. पण त्याला हा आक्रोश ऐकू येत होता. तेव्हा त्याने त्याबद्दल विचारले.
तेव्हा त्या बन्यामीन माणसाने एलीजवळ जाऊन सर्व सांगितले 16 तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धातून पळून आलो आहे.”
एलीने त्याला सर्व हकीकत सांगायला सांगितले.
17 तेव्हा तो म्हणाला, “इस्राएलींनी पळ काढला आहे. इस्राएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ट्यांनी ताब्यात घेतला आहे.”
18 करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.
वैभव गेले
19 एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली. 20 तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,”
पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली. 21 करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभव) असे ठेवले. 22 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली.
अब्राहामाचे उदाहरण
4 तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? 2 जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. 3 कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”
4 जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. 5 कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. 6 ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;
7 “ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
तो धन्य!
8 धन्य तो पुरुष
ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (A)
9 तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.
विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन
13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.
16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [a] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.
18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [b] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.
42 ते गेरुथ किम्हाम येथे रहात असताना योहानान व होशायाचा मुलगा यजन्या यिर्मया संदेष्ट्याकडे गेले. त्यांच्याबरोबर सर्व सेनाधिकारीही होते. सर्वजण राजापासून रंकापर्यंत यिर्मयाकडे गेले. 2 ते सर्वजण यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, कृपया आमची विनंती मान्य कर. यहूदाच्या कुळातील वाचलेल्या सर्व लोकांसाठी परमेश्वराकडे तुझ्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. यिर्मया, आमच्यापैकी फारच थोडे वाचले आहेत, हे तुला दिसतेच आहे. एकेकाळी आम्ही संख्येने जास्त होतो. 3 यिर्मया, आम्ही कोठे जावे व काय करावे हे तुझ्या परमेश्वर देवाने आम्हाला सांगावे म्हणून तू प्रभूचा, तुझ्या देवाचा धावा कर.”
4 मग संदेष्टा यिर्मया म्हणाला, “तुमची विनंती मी ऐकली तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रभूची, तुमच्या देवाची करुणा भागीन. देवाचे सर्व म्हणणे मी तुम्हाला सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”
5 मग ते लोक यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर तुझा परमेश्वर देवच आमच्याविरुद्धचा खरा व प्रामाणिक साक्षीदार असेल. 6 आम्हाला त्याचा संदेश आवडला का नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही परमेश्वराची, आमच्या देवाची, आज्ञा पाळू. त्याच्याकडून संदेश आणण्यासाठी आम्ही तुला पाठवीत आहोत. तो सांगेल ते आम्ही ऐकू. मग आमचे कल्याण होईल खरंच, आम्ही परमेश्वराची आमच्या देवाची आज्ञा पाळू.”
7 दहा दिवसानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 8 मग यिर्मयाने कारेहचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सेनाधिकारी व राजापासून रंकापर्यंत सर्व लोक यांना एकत्र केले. 9 मग तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव काय म्हणतो पाहा तुम्ही मला त्याच्याकडे पाठविले तुम्ही मला केलेली विनंती मी त्याला सांगितली. परमेश्वर असे म्हणतो: 10 ‘जर तुम्ही यहूदात राहिलात, तर मी तुमचा नाश करणार नाही. उलट मी तुम्हाला सामर्थ्यशाली करीन. मी तुम्हाला रुजवीन, उपटून टाकणार नाही. मी असे करण्याचे कारण म्हणजे तुमच्यावर मला आणाव्या लागलेल्या वाईट प्रसंगामुळे मला वाईट वाटते. 11 सध्या तुम्ही बाबेलच्या राजाला भीत आहात. पण त्याला भिऊ नका. बाबेलच्या राजाची अजिबात भीती बाळगू नका.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘कारण मी तुमच्याबरोबर आहे. मी तुमचे रक्षण करीन. मी तुमची सुटका करीन. त्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 12 मी तुमच्यावर कृपा करीन आणि बाबेलचा राजाही तुमच्याशी दयाळूपणाने वागेल. तो तुम्हाला तुमच्या देशात परत आणील.’ 13 पण कदाचित् ‘आम्ही यहूदात राहणार नाही.’ असे तुम्ही म्हणाल. तुम्ही असे म्हणाल्यास, तुम्ही परमेश्वराची, तुमच्या देवाची अवज्ञा केल्यासारखे होईल. 14 तुम्ही कदाचित् असेही म्हणाल ‘नाही, आम्ही मिसरमध्ये जाऊन राहू. तेथे युध्द आम्हाला दिसणार नाही किंवा रणशिंगाचा आवाज ऐकू येणार नाही तेथे आमची उपासमार होणार नाही.’ 15 तुम्ही असे म्हणत असाल तर यहूदातील वाचलेल्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो, ‘तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित केल्यास पुढील गोष्टी घडतील. 16 ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटत आहे, ती तुमचा तेथे पराभव करील. ज्या उपासमारीची तुम्ही काळजी करीत आहा, ती तेथे तुम्हाला गाठील. तुम्ही मिसरमध्ये मराल. 17 जो कोणी मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित करील, तो युद्धात, वा उपासमारीने किंवा भयंकर रोगराईने मरेल. मिसरमध्ये जाणारा एकही जण वाचणार नाही. मी घडवून आणणार असलेल्या भयंकर संकटातून कोणीही वाचणार नाही.’
18 “मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’
19 “यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो. 20 तुम्ही तुमच्या मृत्यूला कारण होईल, अशी चूक करीत आहात तुम्ही मला परमेश्वराकडे, तुमच्या देवाकडे, पाठविले तुम्ही मला म्हणाला, ‘आमच्यासाठी आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. परमेश्वराने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांग आम्ही परमेश्वराचे ऐकू.’ 21 म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराचा संदेश सांगितला आहे. पण तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने ज्या गोष्टी तुम्ही कराव्या हे सांगण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवले होते, त्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत. 22 तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहू इच्छिता. पण मग तुम्ही युद्धात वा उपासमारीने अथवा भयंकर रोगराईने मराल. ह्या गोष्टी तुमच्याबाबत घडतील, ह्याची खात्री बाळगा.”
प्रमुख गायकासाठी परमेश्वराचा सेवक दावीदयाचे स्तोत्र. दावीदाने हे स्तोत्र [a] परमेश्वराने त्याला शौलापासून आणि इतर शंत्रूपासून वाचवले तेव्हा लिहीले.
18 तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस,
मी तुझ्यावर प्रेम करतो.”
2 परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे.
माझा देव माझा खडक आहे.
मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो.
देव माझी ढाल आहे.
त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते. [b]
परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.
3 त्यांनी माझी चेष्टा केली.
परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला
आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
4 माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते.
मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.
5 थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या.
मृत्यूचा सापळा माझ्या भोवती होता.
6 सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला.
होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले.
देव त्याच्या मंदिरात होता.
त्याने माझा आवाज ऐकला.
त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
7 पृथ्वी हादरली आणि कंपित झाली.
स्वर्गाचा पाया हादरला.
का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.
8 देवाच्या नाकातून धूर आला
देवाच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या.
त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
9 परमेश्वराने आकाश फाडले
आणि तो खाली आला तो घट्ट् काळ्या ढगावर उभा राहिला.
10 परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन
वाऱ्यावर उंच उडत होता.
11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता.
तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
12 नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले.
तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
13 परमेश्वराने ढगांमधून गडगडाट केला,
त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली
परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.
15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास
आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला
पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला.
आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले.
परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते.
ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.
18 मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला.
परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.
19 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
म्हणून त्याने माझी सुटका केली.
तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.
20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल
मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली
मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो.
मी त्याचे नियम पाळतो.
23 मी त्याच्या समोर स्वत:ला शुध्द आणि निरपराध राखले.
मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.
24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल.
का? कारण मी निरपराध आहे.
देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून
तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.
25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील.
जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
26 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला
आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणाऱ्यांना तू नामोहरण करतोस.
27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस,
पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.
28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस
देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो.
देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.
30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे.
परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे.
जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
31 परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही.
आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
32 देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी
तो मला मदत करतो.
33 देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो.
तो मला उंचावर स्थिर ठेवतो.
34 देव मला युध्दाचे शिक्षण देतो.
त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.
35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस
तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास
माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
36 माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस.
त्यामुळे मी न पडता चालू शकलो.
37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो
आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन.
ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.
माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
39 देवा, तू मला युध्दात शक्तिमान बनवलेस
तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.
40 तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस
आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.
41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या
परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते.
त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले
पण त्याने उत्तर दिले नाही.
42 मी माझ्या शत्रूंचे मारुन तुकडे केले.
त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.
43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला
त्या राष्ट्रांचा प्रमुख कर
जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
44 ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील.
ते परदेशी मला घाबरतील.
45 ते परदेशी गलितगात्र होतील.
ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
46 परमेश्वर जिवंत आहे,
मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव
मला वाचवतो तो महान आहे.
47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली,
त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.
48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द् उभे राहिले
त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.
49 परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो
म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.
50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द् जिंकायला मदत करतो
तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो.
तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.
2006 by World Bible Translation Center