M’Cheyne Bible Reading Plan
एक लेवी आणि त्याची उपपत्नी
19 त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता.
एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे. यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे. 2 एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या वडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले. 3 तेव्हा तिची समजूत घालून तिला परत आणावे या उद्देशाने तिचा नवरा तेथे जायला निघाला. एक नोकर आणि दोन गाढवे ही त्याने बरोबर घेतली होती. तिच्या वडीलांच्या घरी तो पोहोंचला त्याला आलेले पाहताच तिचे वडील आनंदाने त्याच्या स्वागताला पुढे आले. 4 त्यांनी या लेवीला आपल्याकडे राहायचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करत तो तीन दिवस तेथे राहिला.
5 चौथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तयारी सुरु केली. पण मुलीचे वडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.” 6 सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुन्हा मुलीचे वडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपारनंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली. 7 लेवी जायच्या तयारीत होता पण सासऱ्याच्या आग्रहामुळे पुन्हा त्याला एक रात्र मुक्काम वाढवावा लागला.
8 पाचव्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाला. पण पुन्हा सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करुन घ्या ताजेतवाने व्हा दुपारपर्यंत थांबा.” मग दोघांची जेवणे झाली.
9 लेवी, त्याची उपपत्नी आणि नोकर आता जायला निघाले. पण तिचे वडील म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.”
10 पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्काम करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्नी यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यबूस (म्हणजेच यरुशलेम) पर्यंत आला. 11 यबूसरर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्काम आपण या यबूसी लोकांच्या नगरात करु.”
12 पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इस्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.” 13 तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापैकी एखादे शहर गाठू त्यापैकी एका शहरात रात्र काढू.”
14 आणि ते सगळे पुढे निघाले. गिबात शिरताशिरताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हद्दीत येत होता. 15 तेथे मुक्काम करायच्या उद्देशाने ते त्या शहराच्या भर चौकात येऊन उभे राहिले. पण कोणीच त्यांना रात्रीपुरता आसरा द्यायला पुढे आले नाही.
16 एक म्हातारा माणूस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफ्राइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहात होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.) 17 या वाटसरुंना पाहून त्याने विचारले, “तुम्ही कोण? कुठुन आलात? कोठे निघालात?”
18 तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माझ्या घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफ्राईमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे. 19 गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्नस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”
20 यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्कामाला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.” 21 आणि त्याने त्या सर्वांना आपल्या घरी नेले. गाढवांना वैरण दिले. या तिघांनी हातपाय धुतले आणि थोडेफार खाऊन घेतले.
22 हे सगळे मजेत गप्पागोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैंगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.
23 म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका. 24 घरात माझी मुलगी आहे ती अजून कुमारी आहे. मी तिला व ह्या माणसाच्या उपपत्नीला बाहेर काढून तुमच्या स्वाधीन करतो. त्यांचे तुम्हाला काय हवे ते करा, परंतु या माणसाबरोबर असले भयंकर पाप करु नका.”
25 पण ती माणसे काही केल्या ऐकेनात. शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले. तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे तिला तिथे टाकून निघून गेले. 26 पहाटे ती कशीबशी त्या घरात आपल्या धन्याजवळ आली आणि पुढच्या दाराशीच पडली उजाडेपर्यंत ती तशीच तिथे होती.
27 सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लवकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती. 28 “चल ऊठ, आता जायचे आहे” असे तो तिला म्हणाला. पण ती कुठून उत्तर देणार? ती केव्हाच गतप्राण झाली होती.
त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला. 29 घरी पोहोंचल्यावर सुरीने त्याने तिचे बारा तुकडे केले इस्राएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले. 30 जो तो हे पाहून म्हणाला, “इस्राएलमध्ये कधीच असे घडले नव्हते. मिसर सोडल्यापासून आजतागायत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करुन, व चर्चा करुन. काय करायचे ते सांगा.”
23 पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.” 2 तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. 3 पौल हनन्याला म्हणाला, “सफेती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारील! त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबडीत मारण्याचा आदेश देतोस?”
4 जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाल, “देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?”
5 पौल म्हणाल, “बंधूनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की, ‘तू आपल्या शासन करणाऱ्याविरुद्ध बोलू नकोस’” [a]
6 जेव्हा पौलाच्या लक्षात आले की, धर्मसभेतील एक गट सदूकी आहे तर दुसरा परुशी. तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला, “बंधूनो, मी एक परुशी आहे, परुश्याचा मुलगा आहे! मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे, त्यामुळे माइयावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.”
7 पौलाने असे म्हणताच, परुशी व सदूकी या दोन गटांमध्ये कलह सुरु झाला. आणि धर्मसभेत फूट पडली. 8 (सदूकी असे म्हणतात की, मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात, परुशी दोन्हीवर विश्वास ठेवतात.) 9 सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!”
10 वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले.
11 त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.”
Some Jews Plan to Kill Paul
12 दुसऱ्या सकाळी काही यहूदी लोकांनी एकजूट करुन कट रचला, त्याना पौलाला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांनी अशा प्रकारची शपथ वाहिली की, पौलाला ठार मारेपर्यंत अन्नपाणी सेवन करायचे नाही. 13 अशा प्रकारे कट करणान्यांची संख्या चाळीस होती. 14 या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक क वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही! 15 म्हणून तुम्ही आता असे करा: तुम्ही (मुख्य याजक) व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंति अर्ज सरदाराला लिहा की, पौलासंबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो येथे येण्याअगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.”
16 पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या व तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले, 17 पौलाने एका शताधिपतीला बोलाविले आणि सांगितले या तरुणाला सरदारकडे घेऊन जा. कारण सरदाराला सांगण्यासारखे याच्याकडे काहीतरी आहे. 18 मग त्याने त्या मुलाला घेतले व सरदाराकडे गेला व त्याला म्हणाला, “कैदेत असलेल्या पौलाने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे घेऊन जायला सांगितले. कारण हा तुम्हांला काही तरी सांगणार आहे.”
19 सरदाराने त्या तरुणाचा हात धरुन बाजूला नेले आणि तो त्याला म्हणाला, “तू मला काय सांगणार आहेस?”
20 तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे. 21 पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.”
22 तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, “हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली.
पौलाला कैसरीया येथे पाठवितात
23 मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार व दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा! 24 खोगीर घातलेला घोडा पौलासाठी तयार ठेवा. आणि त्याला राज्यपाल फेलीक्स यांच्याकडे सुखरुप न्या.” 25 सरदाराने एक पत्र लिहिले. त्यात असे लिहिलेले होते:
26 क्लौद्य लुसिया याजकडून,
राज्यपाल फेलिक्स महाराज यांस,
सलाम.
27 या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली. 28 यहूदी लोक त्याच्यावर का दोषारोप करीत आहेत हे कळावे म्हणून मी त्याला धर्मसभेपुढे घेऊन गेलो. 29 यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल. 30 जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.
31 शिपायांनी त्यांना मिळालेल्या हुकुमाचे पालन केले. ते पौलाला घेऊन रात्रीच अंतिपत्रिसास गेले. 32 दुसऱ्या दिवशी घोडेस्वर पौलासोबत कैसरियास गेले. व शिपाई किल्ल्यात परतले. 33 जेव्हा पौल व घोडेस्वार कैसरियास पोहोंचले, तेव्हा त्यांनी राज्यपालाला पत्र दिले. व पौलाला त्याच्या स्वाधीन केले.
34 राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला, 35 “तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या [b] राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.
देवाचे वचन
33 यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता. 2 “परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो, 3 ‘यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.’ 4 परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी व यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, ‘शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल.
5 “‘यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील.
6 “‘पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन. 7 यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन. 8 त्यांनी माझ्याशी पापे केली. पण मी ती पापे धुवून टाकीन. ते माझ्याविरुद्ध लढले पण मी त्यांना क्षमा करीन. 9 मग यरुशलेम एक सुंदर ठिकाण होईल. लोक सुखी असतील दुसऱ्या राष्ट्रांतील लोक त्या नगरीची स्तुती करतील. यरुशलेममध्ये चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ऐकून इतर लोक प्रशंसा करतील. मी इस्राएलला शांतता आणि हित प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटेल व त्यामुळे ते कापतील.’
10 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल. 11 तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील. 13 मेंढ्या मेंढपाळांच्या पुढे चालत असताना. मेंढपाळ त्या मोजतील. सर्व देशातील लोक-डोंगराळ प्रदेशातील, पश्र्चिमेकडच्या डोंगरपायथ्याचे व नेगेव मधील लोक आणि यहूदातील इतर शहरांतील माणसे मेंढ्यांची मोजदाद करतील.”
चांगली शाखा
14 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे. 15 त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील. 16 ह्या ‘शाखेच्या’ काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल. लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील. त्या शाखेचे नाव ‘परमेश्वर चांगला आहे’” असे आहे.
17 परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल व इस्राएलवर राज्य करील. 18 आणि याजक नेहमी लेवी घराण्यातील असतील. ते याजक नेहमी माझ्यासमोर उभे राहतील आणि ते मला होमार्पण, धान्य अर्पण करतील आणि बळीही अर्पण करतील.”
19 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 20 परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला, 21 तरच तुम्ही माझा दावीद व लेवी यांच्याबरोबर झालेला करार बदलू शकाल. मग दावीदाचे वंशज राजे होणार नाहीत आणि लेवीच्या घराण्यातून याजक येणार नाहीत. 22 पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईन. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.”
23 यिर्मयाला परमेश्वराचा पुढील संदेश मिळाला 24 “यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
25 परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते. 26 मग कदाचित याकोबाच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”
दावीद आपला मुलगा अबशालोम याच्याकडून पळाला तेव्हाचे दावीदाचे स्तोत्र.
3 परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत.
खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
2 बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”
3 परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस
तूच माझे वैभव आहेस
परमेश्वरा मला महत्व [a] देणारा तूच आहेस.
4 मी परमेश्वराची प्रार्थना करेन
आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
5 मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे.
मला हे कसे कळते?
कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
6 माझ्याभोवती हजारो सैनिक असतील.
परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.
7 परमेश्वरा जागा हो!
देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस
तू जर माझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस
तर त्यांचे सगळे दात पडतील.
8 परमेश्वरा, जय तुझाच आहे.
परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. [b]
4 माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन
तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक.
आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग.
मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
2 लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात?
तुम्ही माझ्याबद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
3 परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा
जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.
4 जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका.
तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
5 देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा
आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
6 बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल?
परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
7 परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
8 मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का?
कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
2006 by World Bible Translation Center