M’Cheyne Bible Reading Plan
परमेश्वराची शमुवेलला हाक
3 लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
2 एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. 3 परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. 4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” 5 एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”
पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”
शमुवेल झोपायला गेला. 6 पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.
एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”
7 परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.
8 परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.
परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. 9 तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”
तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.
शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”
11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”
15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.
तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.
17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”
18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.
एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”
19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली. 21 शिलोह येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.
3 तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? 2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. 3 हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? 4 खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
असता तू विजय मिळविशील.” (A)
5 जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). 6 खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” 8 आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
सर्व लोक दोषी आहेत
9 तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत. 10 शास्त्रात असे लिहिले आहे:
“पापाशिवाय असा कोणीही नाही.
एकही नाही.
11 समंजस असा कोणी नाही.
कोणीही देवाचा शोध करीत नाही.
12 ते सर्व दूर गेले आहेत,
आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत.
चांगले करणारा कोणी नाही,
एकही नाही.” (B)
13 “लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत
ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” (C)
“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” (D)
14 “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” (E)
15 “त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
16 जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
17 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” (F)
18 “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” (G)
19 आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्रा प्रमाणे सर्व दोषी आहेत. 20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
देव लोकांना नीतिमान कसे करतो?
21 परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. 23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे. 25-26 लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे.देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
27 मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे. 28 कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. 29 किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे. 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील. 31 तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
41 सातव्या महिन्यात नथन्याचा मुलगा इश्माएल हा अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे आला. नथन्या हा अलीशामाचा मुलगा होता. इश्माएल त्याच्याबरोबर त्याच्या दहा माणसांना घेऊन आला. ते सर्वजण मिस्पाला आले. इश्माएल राजघराण्यातील होता. यहूदाच्या राजाच्या अधिकाऱ्यांपैकी तो एक होता इश्माएल व त्याच्या बरोबरची माणसे गदल्याबरोबर जेवावयास बसली. 2 ते जेवत असतानाच, इश्माएल व त्याची दहा माणसे उठली व त्यांनी अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास तलवारीने ठार मारले. बाबेलच्या राजाने यहूदाचा राज्यपाल म्हणून गदल्याची निवड केली होती. 3 गदल्याबरोबर मिस्पा येथे असलेल्या सर्व यहुद्यांनासुद्धा इश्माएलने ठार मारले. एवढेच नाही तर, गदल्याबरोबर असलेल्या खास्दी सैनिकांनासुद्धा त्याने ठार केले.
4-5 गदल्याला मारल्याच्या दुसऱ्या दिवशी 80 लोक मिस्पाला आले ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी धान्य व धूप आणीत होते. त्या सर्वांनी दाढ्या कापलेल्या होत्या अंगावर जखमा केलेल्या होत्या त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांनी मुंडन केले होते. [a] ते शखेम, शिलो व शोमरोन येथून आले होते. त्यातील कोणालाही गदल्याच्या वधाविषयी माहिती नव्हती. 6 इश्माएलने मिस्पा सोडले व तो त्या माणसांना भेटायला गेला. तो त्यांना भेटायला जाताना रडला. [b] तो त्या माणसांना म्हणाला, “अहीकामचा मुलगा गदल्या ह्याला भेटण्यास माझ्याबरोबर चला.” 7 ती 80 माणसे मिस्पाला गेली. इश्माएलने व त्याच्या माणसांनी त्यातील 70 जणांना मारले. आणि त्यांची प्रेते खूप खोल असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकली. 8 पण राहिलेली दहा माणसे इश्माएलला म्हणाली, “आम्हाला मारु नको. आमच्याजवळ गहू व सातू आहेत. तसेच तेल व मधही आहे आम्ही ह्या गोष्टी शेतात लपवून ठेवल्या आहेत.” म्हणून इश्माएलने ह्या दहा माणसांना सोडले. इतरांसारखे त्यांना मारले नाही. 9 (ती पाण्याची टाकी खूप मोठी होती. ती यहूदाचा राजा आसा याने, युद्धाच्या वेळी नगराला पाणी मिळावे म्हणून बांधली होती. [c] इस्राएलचा राजा बाशा ह्याच्यापासून आपल्या नगराचा बचाव करण्यासाठी आसाने असे केले होते. ती टाकी भरुन जाईपर्यंत इश्माएलने त्यात प्रेते टाकली.)
10 मिस्पामधील इतर सर्व लोकांना इश्माएलने पकडले ह्या लोकांत राजाच्या मुली व इतर मागे राहिलेले लोक होते. हे लोक म्हणजे नबूजरदानने गदल्याला ज्या लोकांवर लक्ष ठेवण्यास नेमले होते, तेच होते नबूजर दान हा बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. इश्माएलने त्या सर्व लोकांना कैद केले व तो अम्मोनी लोकांचा देश पार करुन जाण्यास निघाला.
11 त्याच्याबरोबर असलेल्या कारेहचा मुलगा योहानानला व इतर सैन्याधिकाऱ्याना त्याने केलेली दुष्कृत्ये कळली. 12 म्हणून योहानान व इतर सैन्याधिकारी आपल्या लोकांना घेऊन नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढण्यास गेले.त्यांनी गिबोन जवळील तलावापाशी इश्माएलला पकडले. 13 इश्माएलने ज्यांना कैद करुन नेले होते, त्या कैद्यांनी योहानानला व सैन्याधिकाऱ्यांना पाहिले. त्यांना मग खूप आनंद झाला. 14 नंतर इश्माएलने पकडलेले सर्व लोक मिस्पा येथून कारेहचा मुलगा योहानान ह्याच्याकडे धावले. 15 पण इश्माएल व त्याची आठ माणसे योहानानच्या हातातून निसटली. ते अम्मोनच्या लोकांकडे पळाले.
16 मग कारेहचा मुलगा योहानान व इतर सर्व सैन्याधिकारी यांनी सर्व कैद्यांना सोडविले. गदल्याला ठार मारल्यानंतर इश्माएलने ह्या लोकांना मिस्पा येथून आणले होते. त्या वाचलेल्या लोकांत सैनिक, स्त्रिया, मुले व दरबारातील अधिकारी होते. योहानानने त्यांना गिबोनमधून परत आणले.
मिसरकडे पलायन
17-18 योहानान व इतर सैन्याधिकारी खास्द्यांना भीत होते. बाबेलच्या राजाने गदल्याला यहूदाचा राज्यपाल म्हणून निवडले होते. पण इश्माएलने गदल्याचा खून केला, म्हणून खास्दी रागावले असतील अशी भीती योहानानला वाटत होती. म्हणून त्यांनी मिसरला पळून जाण्याचे ठरविले मिसरच्या वाटेवर ते गेरुथ किम्हाम येथे राहिले. गेरुथ किम्हाम बेथलेहेमनजीक आहे.
दावीदाची प्रार्थना.
17 परमेश्वरा, न्यायासाठी,
प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
माझी खरी प्रार्थना ऐक.
2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
तू सत्य बघू शकतोस.
3 तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
8 तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर.
मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
9 परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत
त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत
आणि ते स्वतःच्याच बढाया मारत आहेत.
11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता
ते माझ्या अवती भोवती आहेत
आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत.
12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत.
ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.
13 परमेश्वरा, ऊठ आणि शत्रूकडे जा.
त्यांना शरण यायला लाव.
तुझ्या तलवारीचा उपयोग कर.
आणि मला दुष्टापासून वाचव.
14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन,
या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर.
परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात.
त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते.
त्या लोकांना खूप अन्न दे.
त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे.
त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.
15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
2006 by World Bible Translation Center