M’Cheyne Bible Reading Plan
रूथ आणि बवाज यांची भेट
2 बेथलेहेममध्ये बवाज नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहात असे. तो अलीमलेखच्या कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगच होता.
2 एकदा रूथ नामीला म्हणाली, “मी आज शेतावर जाऊ का? कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन.”
3 नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली.
रूथ शेतावर गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीमलेखाचा नातेवाईक बवाज याच्याच मालकीचे होते.
4 थोडया वेळाने बवाज बेथलेहेमहून शेतावर आला. परमेश्वर तुमच्याबरोबर असो असे म्हणून त्याने आपल्या मजुरांचा समाचार घेतला. मजुरांनीही परमेश्वर तुमचे भले करो असे म्हणून त्याचे उलट अभिष्टचिंतन केले.
5 मजुरांवर देखरेख करणाऱ्या मुकादमाजवळ मग बवाजने ही मुलगी कोण म्हणून चौकशी केली.
6 मुकादम म्हणाला, “नामीबरोबर मवाबातून आलेली तरूण स्त्री ती हीच. 7 ती आज सकाळी इथे आली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागून धान्य वेचायची परवानगी तिने मागितली. सकाळपासून ती येथे आहे.तिचे घर त्या तिकडे आहे.” [a]
8 हे ऐकून बवाज तिला म्हणाला, “मुली, माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर. दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही. इथल्या कामावरच्या बायकांना धरून. 9 त्यांच्या मागोमाग जा. तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे. तहान लागेल तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पी.”
10 रूथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले अणि ती म्हणाली, “माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे, मी खरे तर परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केलीत.”
11 बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे. आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस. आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे, या देशात आलीस.इथले लोक तुला परकेच,पण तू आलीस, 12 तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल. इस्राएलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपादृष्टी ठेवील. त्याच्या आश्रयाला [b] तू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील.”
13 रूथ म्हणाली, “माझ्यावर तुमची मोठीच कृपा आहे. मी निव्वळ एक दासी, तुमच्या नोकराएवढीही माझी लायकी नाही. असे असूनही गोड बोलून तुम्ही माझ्या मनावर फुंकर घातली आहे.”
14 जेवायची वेळ झाली तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “चल, थोडी भाकर आमच्या बरोबर खाऊन घे. या रसात बुडवून खा.”
तेव्हा रूथ सर्व मजुरांबरोबर बसली. बवाजने तिला हुरडाही दिला. तिने पोटभर खाल्ले. अगदी ताटात उरेपर्यंत खाल्ले. 15 मग ती उठली आणि राहिलेले धान्य गोळा करू लागली.
बवाज आपल्या मजुरांना म्हणाला, “कापलेल्या पेंढ्यां मधूनही रूथला धान्य गोळा करू द्या आडकाठी करू नका. 16 तसेच मुद्दाम तिच्यासाठी दाणे भरलेली कणसेही टाकत जा. तिला हवे तेवढे घेऊ द्या,पुरे म्हणू नका.”
नामी बवाजबद्दल ऐकते
17 रूथ संध्याकाळपर्यंत शेतात होती. गोळा केलेल्या धान्याची तिने झोडणी केली. भुश्श्यातून दाणे बाहेर काढले. अर्धा बुशेले सातू निघाले. 18 घरी आणून तिने ते सासूला दाखवले. उरलेले दुपारचे जेवणही तिला दिले.
19 सासूने तिला विचारले, “कुठून एवढे धान्य गोळा केलेस? काम कोठे केलेस? तुझी दखल घेणाऱ्याचे भले होवो.”
२० मग रूथने तिला सर्व हकीकत सांगितली. बवाज नावाच्या माणसाकडे आपण काम केल्याचे तिने सांगितले. नामी सुनेला म्हणाली, “परमेश्वर त्याचे भले करो. मेलेल्यांना आणि हयात असलेल्यांना दया दाखवायचे त्याने चालू ठेवलेले आहे.”
बवाज आपल्या नातेवाईकांपैकी असून आपला त्राता असल्याचे तिने रूथला सांगितले.
21 तेव्हा रूथ म्हणाली, “त्याने मला पून्हा यायला सांगितले आहे. कापणी होईपर्यंत मजुरांबरोबर राहून धान्य गोळा कर असे तो म्हणाला आहे.”
22 नामी आपल्या सुनेला म्हणाली, “त्याच्याच कडल्या बायकांबरोबर तू शेतात गेलीस तर बरे. इतर कुठे गेलीस तर पुरूषांचा तुला उपद्रव होईल.” 23 अशा प्रकारे रूथ बवाजकडे तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली. सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले. पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली. अशा तऱ्हेने ती आपल्या सासूबरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली.
पौल समुद्रमार्गे रोमला निघतो
27 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता. 2 अद्रमुतिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
3 दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोंचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्राना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. 4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. 5 किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करुन लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहोंचलो. 6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.
7 आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हांला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हांला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो. 8 यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.
9 बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही [a] निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला, 10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!” 11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. 12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)
वादळ
13 जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे. 14 परंतु लवकरच क्रेत बेटावरुन “ईशान्येचे” म्हटलेले वादळी वारे वाहू लागले. 15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली. 17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्ती [b] नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. 19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. 20 बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.
21 बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे. 22 कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’ 25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. 26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”
27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला. 28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली. 29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले. 30 खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या. 31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” 32 यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.
33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही. 34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” 35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. 36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. 37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो. 38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायलयांनंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
जहाज नष्ट होते
39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले. 40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. 41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. 43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. 44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.
यिर्मयाचा तुरुंगवास
37 नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा होता. नबुखद्नेस्सरने, यहोयाकीमचा मुलगा यहोयाकीन उर्फ यकोन्या याच्याऐवजी, सिद्कीयाला यहूदाचा राजा केले. सिद्कीया योशीयाचा मुलगा होता. 2 पण, परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्यातर्फे दिलेल्या संदेशाकडे सिद्कीयाने लक्ष दिले नाही. सिद्कीयाच्या सेवकांनी व यहूदाच्या लोकांनीही परमेश्वराच्या संदेशांकडे दुर्लक्षच केले.
3 राजा सिद्कीयाने यहूकल व याजक सफन्या ह्यांना आपला निरोप देऊन यिर्मया संदेष्ट्याकडे पाठविले, यहूकल शलेम्याचा व याजक सफन्या मासेयाचा मुलगा होता. त्यांनी यिर्मयासाठी आणलेला निरोप असा होता “यिर्मया, आमच्यासाठी परमेश्वर देवाजवळ प्रार्थना कर.”
4 त्यावेळी, यिर्मयाला कैद केलेले नव्हते, त्यामुळे तो कोठेही जाण्यास मोकळा होता. 5 नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले.
6 संदेष्टा यिर्मयाला देवाचा संदेश आला. 7 “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो, ‘यहूकल व सफन्या, यहूदाचा राजा सिद्कीया याने तुम्हाला मला काही प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे पाठविले आहे, हे मला माहीत आहे. सिद्कीयाला सांगा की बाबेलच्या सैन्यापासून तुम्हाला वाचविण्यासाठी फारोचे सैन्य मिसरमधून निघाले आहे. पण त्या सैन्याला मिसरला परत जावे लागेल. 8 मग बाबेलचे सैन्य परत येईल. ते यरुशलेमवर हल्ला करील. ते यरुशलेमचा पाडाव करुन यरुशलेम जाळील.’ 9 परमेश्वर पुढे असे म्हणतो, ‘यरुशलेमच्या लोकांनो, स्वतःची फसवणूक करुन घेऊ नका. “बाबेलचे सैन्य नक्कीच आपल्याला सोडून माघारी फिरेल, असे समजू नका.” तसे होणार नाही. 10 यरुशलेमच्या लोकांनो, समजा, जरी तुम्ही, तुमच्यावर चाल करुन आलेल्या खास्द्यांच्या सैन्याचा पराभव करु शकला, तरी काही जखमी सैनिक त्यांच्या तंबूत राहतील. ते येऊन यरुशलेम जाळतील.’”
11 जेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, मिसरचा राजा फारो याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी, यरुशलेम सोडले, 12 तेव्हा यिर्मयाला, यरुशलेमहून मालमत्तेची वाटणी व्हायची होती म्हणून यिर्मया तेथे जाणार होता. 13 पण यिर्मयाला यरुशलेमच्या बन्यामीन प्रवेशद्वाराजवळ जाताच, तेथील पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने त्याला अटक केले. त्या प्रमुखाचे नाव इरीया होते. इरीया शलेम्याचा मुलगा होता. व शलेम्या हनन्याचा मुलगा होता. इरीयाने यिर्मयाला अटक केले व तो म्हणाला, “यिर्मया, तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला जात आहेत.”
14 यिर्मया इरीयाला म्हणाला, “हे खरे नाही मी तुम्हाला सोडून खास्द्यांकडे जात नाही” पण यिर्मयाचे म्हणणे इरीयाने ऐकले नाही. त्यांनी यिर्मयाला अटक करुन यरुशलेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेले. 15 ते अधिकारी यिर्मयावर खूप रागावले. त्याने यिर्मयाला चोपून काढण्याचा हुकूम दिला. मग त्यांनी यिर्मयाला तुरुंगात ठेवले, तुरुंग योनाथान नावाच्या माणसाच्या घरात होता. योनाथान यहूदाच्या राजाचा लेखनिक होता. त्याच्या घराचाच तुरुंग केला होता. 16 त्या लोकांनी योनाथानच्या घराच्या तळघराच्या अंधार कोठडीत [a] यिर्मयाला ठेवले. यिर्मया तेथे बराच काळ होता.
17 मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?”
यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.” 18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “माझे काय चुकले! मी तुझ्याविरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वा यरुशलेमच्या लोकांविरुद्ध काय गुन्हा केला? मला तुरुंगात का टाकलेस? 19 राजा सिद्कीया, तुझे संदेष्टे कोठे आहेत? त्यांनी तुला खोटा संदेश दिला. ते म्हणाले ‘बाबेलचा राजा तुझ्यावर किंवा यहूदावर हल्ला करणार नाही.’ 20 पण आता, माझ्या धन्या, यहूदाच्या राजा, कृपया माझे ऐक. माझी विनंती तुला मान्य होवो. योनाथान लेखनिकाच्या घरी मला परत पाठवू नये एवढेच माझे मागणे आहे. तू मला परत पाठविलेस, तर मी तेथे मरेन.”
21 म्हणून सिद्कीया राजाने यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवण्याचा हुकूम दिला व यिर्मयाला रस्त्यावरील रोटीवाल्याकडून रोटी द्यावी असे ही सांगितले. नगरातील रोट्या संपेपर्यंत यिर्ममाला रोटी दिली गेली. अशा रीतीने यिर्मया चौकात पहारेकऱ्याच्या नजरेखाली राहिला.
10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
2 गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
आणि गरीब लोकांना त्रास देतात.
3 दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
आधाशी लोक देवाला शाप देतात.
अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
4 वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
5 दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
6 आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
7 ते लोक नेहमी शाप देत असतात.
ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
ते सतत वाईट योजना आखत असतात.
8 ते गुप्त जागी लपून बसतात
आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
9 ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
असा विचार गरीब लोक करतात.
12 परमेश्वरा, ऊठ!
आणि काहीतरी कर.
देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.
13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
म्हणून त्यांना मदत कर.
15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस.
त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर.
दुखी: लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस.
दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून सोड!
2006 by World Bible Translation Center