M’Cheyne Bible Reading Plan
मीखाची मूर्तिपूजा
17 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता. 2 तो एकदा आपल्या आईला म्हणाला, “तुझ्याजवळचे अठ्ठावीस पौंड रुपे कोणी तरी चोरले होते. आठवते ना? तू त्याला शापही दिला होतास. खंर तर ते मीच घेतले होते. माझ्याकडे ते आहे.”
त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, परमेश्वर तुझे भले करो.”
3 मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करुन ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.”
4 पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौंड रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली. 5 त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले. 6 (त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)
7 बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता. 8 इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर
9 मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?”
या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेतरी आसरा शोधतोय”
10 मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नवस्त्रही देईन.”
त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले. 11 मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार देला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला. 12 मीखाने त्याच्यावर पौरोहित्य सोपवले. तेव्हा तो त्याप्रमाणे मीखाच्या घरी राहू लागला. 13 मीखा म्हणाला, “लेवी कुळातील माणूसच माझ्याकडे पुरोहित म्हणून असल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील.”
पौल यरुशलेमला जातो
21 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो. 2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हांला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
3 तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावययाचा होता. 4 तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले, आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरुन त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. 5 आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरु केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहरबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. 6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
7 सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो. 8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकी [a] एक होता. 9 त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्रे झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते.
10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला. 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे महणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरुशलेमा येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”
12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंति केली की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही मला हळवे बनवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभु येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
14 यरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंति करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेमला निघालो. 16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले. कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
पौल याकोबची भेट घेतो
17 आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. 18 दूसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला. तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करुन घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधु, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. 21 या यहूदी लोकांनी तुइयाविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशांत राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस. तसेच आपल्या मुलांची सुंता करु नका असे सांगतो व आपल्या चालीरीति पाळू नका असे सांगतो.
22 “मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. 23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर: आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. 24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करुन घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
25 “जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे.
ते असे ‘मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये.
रक्त अगर गुदमरुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ
नयेत अनैतिक कृत्ये करु नयेत.’”
Paul Is Arrested
26 मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले. 28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.” 29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरुशलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले, पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे.
30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली. 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. 32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
33 मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले. 34 गर्दितून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे. 35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले. 36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”
37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?”
तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? 38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करुन सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सज्ञ नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हांला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
40 जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल हिब्रू भाषेत बोलू लागला:
आशेचे वचन
30 यिर्मयाला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. 2 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणाला, “मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव. 3 असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.”
4 इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला. 5 परमेश्वर म्हणाला,
“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते.
लोक घाबरले आहेत.
कोठेही शांती नाही.
6 “पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा.
पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही
मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे
पोट धरताना का दिसत आहे?
प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे?
का? कारण ते फार घाबरले आहेत.
7 “याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे.
हा अतिशय संकटाचा काळ आहे.
पुन्हा असा काळ कधीच येणार नाही.
पण याकोबाचे रक्षण होईल.
8 “त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत. 9 इस्राएल आणि यहूदा यांच्यामधील लोक परक्या देशांची सेवा करणार नाहीत. नाही! ते परमेश्वराची, त्यांच्या देवाची सेवा करतील. मी त्यांच्यासाठी पाठवणार असलेल्या त्याच्या दावीद राजाचीही ते सेवा करतील.
10 “तेव्हा, याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस,”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएल, भीऊ नकोस
मी त्या दूरच्या ठिकाणाहून तुझे रक्षण करीन.
तुम्ही त्या दूरच्या प्रदेशात कैदी आहात.
पण मी तुमच्या वंशजांना वाचवीन.
मी त्यांना तेथून परत आणीन.
याकोबाला पुन्हा शांती लाभेल.
लोक त्याला त्रास देणार नाहीत.
माझ्या माणसांना घाबरविणारा कोणीही शत्रू नसेल.
11 इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“मी तुमचे रक्षण करीन.
मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले.
पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन.
खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन.
पण मी तुमचा नाश करणार नाही.
तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे.
पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.”
12 परमेश्वर म्हणतो,
“इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे,
कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
13 तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही,
म्हणून तुम्ही बरे होणार नाही.
14 तुम्ही बऱ्याच राष्ट्रांचे मित्र झालात
पण ती राष्ट्रे तुमची पर्वा करीत नाहीत.
तुमचे ‘मित्र’ तुम्हाला विसरले आहेत.
मी शत्रूला दुखवावे, तसे तुम्हाला दुखविले आहे.
मी तुम्हाला कडक शिक्षा केली.
तुमच्या भयंकर अपराधांसाठी मी हे केले.
तुम्ही खूप पापे केलीत, म्हणून मी असे केले.
15 इस्राएल आणि यहूदा, तुमच्या जखमेबद्दल तुम्ही आरडाओरड का करता?
तुमची जखम यातना देणारी आहे.
पण त्यावर काही इलाज नाही.
मी, परमेश्वराने, तुमच्या भयंकर अपराधांबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्या.
तुमची पापे खूप वाढली. म्हणून मी असे केले.
16 त्या राष्ट्रांनी तुमचा नाश केला.
पण आता त्या राष्ट्रांचा नाश केला जाईल.
इस्राएल व यहूदा, तुमच्या शत्रूंना कैद केले जाईल.
त्या लोकांनी तुमच्या वस्तू चोरल्या.
पण आता दुसरे लोक त्यांच्या वस्तू चोरतील.
युद्धात त्यांनी तुम्हाला लुटले.
आता लढाईत इतर लोक त्यांना लुटतील.
17 मी तुम्हाला पुन्हा तंदुरूस्त करीन.
तुमच्या जखमा मी बऱ्या करीन.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस.
ते म्हणतात, ‘सियोनाची काळजी करणारे कोणीही नाही.’”
18 परमेश्वर म्हणतो,
“सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत.
पण ती परत येतील.
याकोबाच्या घरांची मला दया येईल.
सध्या नगरी म्हणजे पडक्या
इमारतींनी भरलेली टेकडी आहे.
पण नगरी पुन्हा बांधली जाईल.
राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल.
19 तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील.
तेथे हास्याच्या लहरी उठतील.
त्यांना मी पुष्कळ संतती देईन
इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही
मी त्यांना मान मिळवून देईन.
कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.
20 याकोबाचे घराणे पूर्वीच्या इस्राएलच्या घराण्याप्रमाणे होईल.
मी, इस्राएल आणि यहूदा, यांना सामर्थ्यशाली करीन
आणि त्यांना इजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
21 त्यांच्यातीलच एक त्यांचे नेतृत्व करील.
तो माझ्या माणसांपैकीच एक असेल.
मी सांगितल्यावरच लोक माझ्याजवळ येऊ शकतील.
मग मी त्या नेत्याला माझ्याजवळ यायला सांगीन आणि तो माझ्याजवळ येईल.
तो मला जवळचा होईल.
22 तुम्ही लोक माझे व्हाल
आणि ती तुमचा देव होईन.”
23 परमेश्वर खूप रागावला होता.
त्याने लोकांना शिक्षा केली.
शिक्षा वादळाप्रमाणे आली.
त्या दुष्ट माणसांविरुद्ध शिक्षा तुफानाप्रमाणे आली.
24 लोकांची शिक्षा पूर्ण होईपर्यंत
परमेश्वराचा राग राहील.
परमेश्वराने ठरविलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत
तो शांत होणार नाही.
यहूदाच्या लोकांनो,
तो दिवस उजाडल्यावरच तुम्हाला हे समजेल.
नवीन इस्राएल
31 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.”
2 परमेश्वर म्हणतो:
“काही लोक शत्रूकडून मारले गेले नव्हते. ते लोक वाळवंटात आश्रय घेतील.
इस्राएल विश्रांतीच्या अपेक्षेने तेथे जाईल.”
3 खूप लांबून परमेश्वर
लोकांना दर्शन देईल.
परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतन राहील.
तुमची निष्ठा मी कायमची सांभाळीन.
4 इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन.
तुझ्यातून देश निर्माण करीन.
तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या
इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील.
5 इस्राएलमधील शेतकऱ्यांनो, तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल.
शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर
तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल.
त्या द्राक्षमळ्यातील
पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल.
6 अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून
पुढील आदेश देतील.
‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर
सियोनला जाऊ या.’
एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.”
7 परमेश्वर म्हणतो,
“आनंदित व्हा आणि याकोबासाठी गा.
सर्व राष्ट्रांत अग्रेसर असलेल्या इस्राएलचा जयघोष करा.
स्तुतिस्तोत्रे गा व
‘परमेश्वराने त्याच्या लोकांना वाचविले [a] असे जाहीर करा.
इस्राएलच्या जिवंत राहिलेल्या लोकांचे देवाने रक्षण केले.’
8 लक्षात ठेवा, मी त्या उत्तरेकडच्या देशातून इस्राएलला आणीन.
जगातील दूरदूरच्या ठिकाणाहून
मी इस्राएलच्या लोकांना एकत्र करीन.
काही लोक आंधळे आणि पंगू असतील.
काही बायका गर्भवती असतील आणि त्यांच्या प्रसूतींची वेळ आली असेल.
पण खूप खूप लोक परत येतील.
9 ते लोक रडत परत येतील.
पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन.
मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत.
मी त्यांना अशाच मार्गाने नेईन
कारण मी इस्राएलचा पिता आहे
आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
10 “राष्ट्रांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका!
समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा.
‘देवाने इस्राएलच्या लोकांना पांगविले.
पण देव त्यांना पुन्हा गोळा करील
आणि तो आपल्या कळपावर (लोकांवर)
मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवील.’
11 परमेश्वर याकोबाला परत आणील.
परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील.
12 इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील
आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील.
परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे
त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील.
परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस,
ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल.
भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल.
इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही.
13 मग इस्राएलमधील तरुणी
आनंदित होऊन नाचतील
आणि तरुण व वृद्ध
त्यांच्या नाचात सामील होतील.
मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन.
मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
14 मी याजकांना भरपूर अन्न देईन.
मी दिलेल्या चांगल्याचुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
15 परमेश्वर म्हणतो,
“रामामधून आवाज ऐकू येईल.
तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल.
राहेल आपल्या मुलांसाठी रडेल
तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही
सांत्वन करुन घेणार नाही.”
16 पण परमेश्वर म्हणतो, “रडू नकोस!
तुझे डोळे आसवांनी भरु नकोस
तुझ्या कामाबद्दल तुला बक्षीस मिळेल”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएलचे लोक त्यांच्या शत्रूंच्या देशातून परत येतील.
17 इस्राएल, तुला आशा आहे.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“तुझी मुले त्यांच्या स्वतःच्या देशात परत येतील.
18 एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे.
एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे.
‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो.
मी बेबंद वासराप्रमाणे होतो.
कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव.
मी तुझ्याकडे परत येईन.
तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.
19 परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते.
पण मी केलेली पापे मला कळली,
म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले.
मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते.
त्यामुळे मला ओशाळे वाटते.’”
20 देव म्हणतो,
“एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे,
हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो.
हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली.
पण तरीही मला त्याची आठवण येते.
तो मला अतिशय प्रिय आहे
आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
21 “इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा.
घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा.
वाटेवर लक्ष ठेवा.
तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात.
त्याचे स्मरण ठेवा.
इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये.
तुझ्या गावांना परत ये.
22 तू विश्वासघातकी मुलगी होतीस.
पण तू बदलशील.
तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?
“परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे.
स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.” [b]
23 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!’
24 “यहूदातील सर्व गावांतील लोक एकत्र येतील व तेथे शांतता नांदेल. यहुदामधील शेतकरी आणि (मेंढ्यांचे) कळप घेऊन फिरणारे सर्वजण शांतीने राहतील. 25 दुबळ्या आणि थकलेल्या लोकांना मी आराम आणि शक्ती देईन. मी दु:खितांच्या इच्छा पुऱ्या करीन.”
26 हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती.
27 “असे दिवस येतील,” हा परमेश्वराचा संदेश आहे. “की तेव्हा मी यहूदाच्या व इस्राएलच्या घराण्यांची वृद्धी होण्यास मदत करीन. मी त्यांच्या मुलांची व गुराढोरांचीही वृद्धी होण्यास मदत करीन. हे सर्व जणू काही झाडे लावून त्याची निगा राखण्यासारखे असेल. 28 पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
29 “आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,
‘पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली.
ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.’
30 प्रत्येकजण आपल्या पापाने मरेल. जो आंबट द्राक्षे खाईल, तोच त्याची चव चाखील.”
नवा करार
31 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे. 32 मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
33 “भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील. 34 लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
परमेश्वर कधीही इस्राएलचा त्याग करणार नाही
35 परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो
आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो.
परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात.
सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.”
36 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो,
“इस्राएलचे वंशज कधीही राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाहीत.
सूर्य, चंद्र, तारे व समुद्र ह्यांच्यावरील माझे नियंत्रण ढळले, तरच असे होणे शक्य आहे.”
37 परमेश्वर म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही.
लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे.
तरच मी इस्राएलच्या वंशजांना नाकारीन.
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, मगच मी त्यांना दूर करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
नवीन यरुशलेम
38 “असे दिवस येत आहेत की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे परमेश्वरासाठी यरुशलेम नगरी पुन्हा उभारली जाईल. हानानेलच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या दारापर्यंत सगळी नगरी पुन्हा उभारली जाईल. 39 ओळंबा कोपऱ्याच्या दारापासून थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तेथून गवाथकडे वळेल. 40 ज्या दरीत प्रेते व राख टाकली जाते, ती परमेश्वराला पवित्र वाटेल. ह्यात पूर्वेकडच्या किद्रोन दरीपासून घोडे दाराच्या कोपऱ्यापर्यंतच्या पठाराचा समावेश असेल. हा सर्व प्रदेश परमेश्वराला पवित्र वाटेल. यरुशलेमचा पुन्हा कधीही विध्वंस केला जाणार नाही वा तिचा नाश होणार नाही.”
येशू मरणातून उठला हे अनुयायांना कळते(A)
16 शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3 त्या एकमेकीस म्हणत होत्या की, “कबरेच्या तोंडावरुन आणांसाठी धोंड कोण बाजूला लोटील?”
4 नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5 त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
6 तो त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका, तुम्ही नसरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा. 7 जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, ‘तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’”
8 मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
काही शिष्य येशूला पाहतात(B)
9 आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरीया मग्दालियाला, जिच्यातून त्याने सात भुते काढली होती, तिला दर्शन दिले. 10 ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11 त्यांनी ऐकले की तो जिंवत आहे. व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
12 यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रगट झाला. 13 ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही.
येशू शिष्यांबरोबर बोलतो(C)
14 नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
15 तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा धिक्कार होईल. 17 परंतु जे विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18 ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
येशू परत स्वर्गात जातो(D)
19 मग प्रभु येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. 20 शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
2006 by World Bible Translation Center