M’Cheyne Bible Reading Plan
कईला येथे दावीद
23 लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.
2 दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?”
परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”
3 पण दावीद बरोबरचे लोक त्याला म्हणाले, “जरी आपण यहूदात आहोत. तरी किती भीतीच्या वातावरणात आपण इथे आहोत. मग प्रत्यक्ष पालिष्टी सैन्याजवळ गेल्यावर आपले काय होईल?”
4 दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, परमेश्वराने पुन्हा सांगितले, “कईला येथे जा. पलिष्ट्यांचा पाडाव करायला मी तुम्हाला मदत करतो.” 5 तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले. 6 (अब्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्याबरोबर एफोद आणाला होता.)
7 दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगिते. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदला माझ्या हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.” 8 शौलने मग युध्दासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.
9 शौलची आपल्याविरुध्द मसलत चाललेली आहे हे दावीदला कळले. तेव्हा दावीदाने अब्याथार याजकाला एफोद आणण्यास सांगितले.
10 मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलाचा बेत आहे असे मी ऐकले. 11 खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलाच्या हवाली करतील का? इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”
परमेश्वराने शौल येणार असल्याचे सांगितले
12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.
13 तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे सहाशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.
दावीदाचा शौलकडून पाठलाग
14 दावीद मग वाळवंटातील गढ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफच्या वाळवंटातील डोंगराळ भागातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदला त्याच्या हाती लागू दिले नाही.
15 झीफच्या वाळवंटात होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहून दावीद घाबरला. 16 शौलचा मुलगा योनाथान दावीदला होरेश येथे भेटायला गेला. त्याने दावीदची परमेश्वरावरची श्रद्धा आणखी दृढ केली. 17 योनाथान दावीदला म्हणाला, “घाबरु नको. माझ्या वडीलांकडून तुला दुखापत होणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील. मी तुझ्या खालोखाल असेन. माझ्या वडीलांनाही हे माहीत आहे.”
18 मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला
झीफचे लोक शौलाला दाविदा बद्दल सांगतात
19 झीफचे लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या भागात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे. 20 हे राजा तू आता केव्हाही तिकडे ये, दावीदला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.”
21 शौल त्यांना म्हणाला, “या मदतीबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. 22 आता त्याच्या बद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लावा. शौलने विचार केला, ‘दावीद फार धूर्त आहे, तो माझ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहे.’ 23 पुढे तो म्हणाला, त्याच्या दबा धरुन बसायच्या सर्व जागा हेरुन ठेवा आणि मग इथे येऊन मला सगळ्याची खबर द्या. मी मग तुमच्याबरोबर येईन. त्या भागात दावीद असेल तर त्याला शोधून काढीन. मग यहूदातील घराघरात शोधायची वेळ आली तरी बेहत्तर.”
24 झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला.
दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते. 25 शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळले म्हणून शौल तिकडे गेला.
26 शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.
27 तेवढ्यात एक निरोप्या शौलकडे आला. “पलिष्टी आपल्यावर हल्ला करायला आले आहेत. ताबडतोब चला” असा त्याने निरोप आणला.
28 तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग थांबवून पलिष्ट्यांकडे कूच केले. म्हणून त्या खडकाला “निसटून जाण्याचा खडक” (सेला हम्मालकोथ) असे नाव पडले. 29 दावीद मग मावोनचे वाळवंट सोडून एन गेदीच्या गडावर राहिला.
ख्रिस्ताचे प्रेषित
4 एखाद्या व्यक्तीने आम्हाविषयी अशा प्रकारे समजावे: ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी. 2 आणखी असे की, जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे. 3 पण तुम्हांकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा याबद्दल मला काही वाटत नाही, किंवा मी माझा स्वतःचादेखील न्याय करीत नाही. 4 कारण माझी विवेकबुद्धी शुद्ध आहे, पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभु हाच माझा न्यायनिवाडा करतो. 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतः करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
6 बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाकरीता लागू केल्या आहेत. यासाठी की “पवित्र शास्त्र सांगते त्यापलीकडे जाऊ नका,” हे आमच्या उदाहरणावरुन तुम्ही शिकावे व तुम्ही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करु नये. 7 कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
8 तुम्हांला असे वाटते की, तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हांला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरोखरच राजे होता, यासाठी की आम्ही तुमच्यासह राजे झालो असतो. 9 कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत. 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11 अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, फाटकेतुटके कपडे घातलेले, ठोसे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12 आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, 13 जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद दतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
14 मी तुम्हांला हे लाजविण्यासाठी लिहित नाही: तर उलट मी तुम्हांला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करुन देतो, 15 कारण जरी तुम्हांला खिस्तामध्ये दहा हजार पालक असले तरी पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगे मी तुम्हांला जन्म दिला आहे, 16 यास्तव मी तुम्हांला बोध करतो की, माझे अनुकरण करा. 17 यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करुन देईल.
18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणारच नव्हतो, म्हणून काही जण गर्वाने फुगले होते. 19 तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल. 20 कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. 21 तुम्हांला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हांला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
2 तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”
2 मग वाऱ्याचा झोत आला व त्याने मला उभे केले. माझ्याशी बोलणाऱ्याचे (देवाचे) बोलणे मी ऐकले. 3 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला इस्राएलच्या घराण्याशी बोलायला पाठवीत आहे. ते लोक अनेकदा माझ्याविरुद्व गेले. त्यांचे पूर्वजही माझ्या विरोधात गेले. पूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध वागून पाप केले आणि अजूनही ते पाप करीत आहेत. 4 मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवीत आहे. ते फार हटृ आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. ‘ह्या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस.’ 5 पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्याविरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्याविरुध्द वागतात. पण तू ह्या गोष्टी त्यांना सांगच म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेष्टा आहे.
6 “मानवपुत्रा, त्या लोकांना घाबरु नकोस. ते जे बोलतात, त्याला भिऊ नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल पण त्याच्या बोलण्याने घाबरुन जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत पण त्यांना भिऊ नकोस. 7 मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
8 “मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो, त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्याविरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्विकार कर. मग ते त्या लोकांना सांग. आता ते खाऊन टाक.”
9 नंतर मी (यहेज्केलने) एक हात माझ्यापर्यंत येताना पाहिला. त्या हातात शब्द लिहिलेला पट होता. 10 मी तो पट उलगडला. त्यावर पुढे व मागे, अनेक प्रकारची शोकगीते, शोककथा व इशारे लिहिलेले होते.
स्मरण दिवसाचे दावीदाचे स्तोत्र.
38 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस
तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस
तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे.
मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस.
त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे
आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
5 मी मूर्खपणा केला आता
मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे
आणि मी दिवसभर उदास असतो.
7 मला ताप आला आहे
आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
8 मी फार अशक्त झालो आहे
मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे
उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
10 माझे हृदय धडधडत आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे
आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र
आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत.
माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत.
ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे.
मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे.
मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर.
देवा, तूच माझ्यावतीने बोल.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील.
मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुका केल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे.
हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले.
मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत
आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात
आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या.
मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला
परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस.
देवा माझ्याजवळ राहा.
22 लवकर ये आणि मला मदत कर.
माझ्या देवा मला वाचव!
2006 by World Bible Translation Center