M’Cheyne Bible Reading Plan
दान लोकांचा लईश नगरावर ताबा
18 त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वतःची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.
2 तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले.
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुक्काम केला. 3 मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले. त्यानी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे तू काय करतोस?”
4 मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना सांगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.”
5 तेव्हा ते त्याला म्हणाले, “परमेश्वराजवळ तू आमच्यासाठी काहीतरी माग वस्ती करण्यास योग्य अशी जागा शोधण्यात आम्हाला यश येईल का, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे.”
6 तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.”
7 तेव्हा ते पाचजण तेथून निघाले. लईश या नगराशी ते आले. येथील लोकांचे जीवन सिदोनी लोकांसारखे आहे. ते निश्चिंत आहेत. सुखा समाधानात आहेत हे त्यांनी पाहिले. सर्व गोष्टींची तिथे सुबत्ता होती. शत्रूचा उपद्रव नव्हता. सादोन पासून हा भाग लांब होता. तसेच अरामी लोकांशीही त्यांचा काही संबंध नव्हता.
8 हे पाहून हे पाचजण सरा आणि अष्टावोल या आपल्या शहरांमध्ये परतले. तेथील भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्हांला काय आढळले?”
9 ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ न दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू. 10 तेथे जागा भरपूर आहे, अन्नधान्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धास्त आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.”
11 तेव्हा सरा आणि अष्टावोल येथून हल्लयाच्या तयारीने दान वंशातील सहाशे जण निघाले. 12 लईशच्या वाटेवर असताना त्यांनी यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ ठोकला. म्हणूनच किर्याथ-यारीमच्या पश्चिमेकडील या भागाला अजूनही महाने दान म्हणजेच दान लोकांची छावणी म्हणून ओळखले जाते. 13 येथून पुढे ते प्रवास करत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले.
14 यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे” 15 आणि ते पाचजण मीखाच्या घराशी थांबले. तेथे तो तरुण लेवी होताच त्यांनी “तू कसा आहेस?” म्हणून विचारले 16 बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती. 17-18 हे पाच जण घरात घुसले. त्यांनी सर्व कोरीव मूर्ती, घरातील बाकीच्या मूर्ती आणि चांदीची मूर्ती, एफोद हे सर्व लुटले तेव्हा तो लेवी पुरोहित बाहेर त्या सहाशे जणांच्या जमावाबरोबर होता. तो म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”
19 ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर, फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहाणे बरे की, इस्राएलांच्या एका आख्ख्या वंशाचे याजक होणे बरे?”
20 याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.
21 मग ही सहाशे दान माणसे, या लेवी तरुणाबरोबर निघाली. मीखाचे घर मागे टाकून ते आपल्या वाटेने गेले. लहान मुले. गुरेढोरे. सामानसुमान असा सर्व लवाजमा त्यांनी आपल्या पुढे ठेवला होता.
22 तेबरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले. 23 मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?”
24 मीखा म्हणाला, “तुम्ही माझ्या मूर्ती पळवल्यात. मी त्या स्वतः घडवल्या आहेत. माझ्या पुरोहितालाही तुम्ही घेऊन चालला आहात. माझे आता काय राहिले? ‘काय गडबड आहे?’ असे वर आणखी मलाच विचारता?”
25 दान लोकांनी सांगितले, “तू वाद न घातलेला बरा. आमच्या पैकी काही फार रागीष्ट आहेत. तू ओरडलास तर ते तुझ्यावर हल्ला करतील. तू आणि तुझे कुटुंबीय उगीचच जिवाला मुकाल.”
26 एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षात घेऊन मीखाही घरी परतला.
27 अशाप्रकारे मीखाच्या मूर्ती, पुरोहित हे सर्व मिळवून ते लईश येथे पोहोंचले. त्यांनी लईश येथील रहिवाश्यांवर हल्ला चढवला. सर्वत्र शांतता नांदत असताना हल्ला होईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. लोकांना तरवारीने कापून काढून दान लोकांनी शहराला आग लावली. 28 लईश येथील लोकांच्या मदतीला धावून येणारे कोणी नव्हते. सिदोन शहरापासून ते फार लांब होते तेव्हा तेथील लोकांना मदतीसाठी तेथे येणे शक्य नव्हते आणि अरामी लोकांशी त्यांचा कुठला करार झालेला नसल्याने तेही आले नाहीत. बेथ-रहोबच्या ताब्यात असलेल्या खोऱ्यात लईश हे शहर होते. दान लोकांनी तेथे नवे शहर वसवले आणि तेथे ते राहू लागले. 29 पूर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इस्राएलाचा एक वंशज दान हा त्यांचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले.
30 दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षोमचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती. 31 मंदिर शिलोह येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची पूजाअर्चा करत होते.
पौल लोकांसमोर भाषण करतो
22 “बंधूनो व वडीलजनांनो, मी माझ्या बचावासाठी जे काही सांगतो ते ऐका.”
2 जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भोषत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले. पौल म्हणाला,
3 “मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो. 4 या मार्गाचा (ख्रिस्ती चळवळीचा) पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री व पुरुषांना अटक करुन तुंरुंगात टाकले.
5 “याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिष्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली. आणि तेथे ह्या मार्गांचे (ख्रिस्ती) जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यसाठी की त्यांना शिक्षा व्हावी.
पौल त्याचा पालट झाला हे सांगतो
6 “तेव्ह? असे झाले की, मी प्रवास करीत दिमिष्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माइयाभोवती आकाशातून लख्ख प्रकाश पडला. 7 मी जमिनीवर पडलो. आणि मी एक वाणी माइयाशी बोलताना ऐकली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस?’
8 “मी उत्तर दिले, ‘प्रभु, तू कोण आहेस?’ तो मला म्हणाला, ‘तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेथचा येशू मी आहे.’ 9 जे माझ्याबरोबर होते त्यांनी प्रकाश पाहिला, पण जो आवाज माझ्याशी बोतल होता तो त्यांना ऐकू आला नाही.
10 “मी म्हणालो, ‘प्रभु मी काय करु?’ आणि प्रभु मला म्हणाला, ‘ऊठ आणि दिमिष्कात जा. तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल.’ 11 त्या प्रकाशामुळे मला काही दिसेनासे झाले. तेव्हा माइया सोबत्यांनी मला हाताला धरुन नेले आणि मी दिमिष्कला पोहोंचलो.
12 “नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याबद्दल चांगले बोलत. 13 तो माइयाकडे आला, आणि माइयाजवळ उभा राहून तो म्हणाला, ‘बंधु शौल, तू पुन्हा पाहू लागशील!’ आणि त्याच घटकेला मला दिसू लागले.
14 “तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या (वाडवडिलांच्या) देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस. आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत. 15 कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस, याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील. 16 मग आता, कशाची वाट पाहतोस? ऊठ, आणि बाप्तिस्मा घे व तुझी पाप धुवून टाक. येशूवर विश्वास ठेवून हे कर.’
17 “मग असे झाले की, जेव्हा मी यरुशलेमला परत आलो, आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला दृष्टान्त झाला. 18 मी येशूला पाहिले, आणि येशू मला म्हणाला, ‘घाई कर! यरुशलेम ताबडतोब सोड! येथील लोक माझ्याविषयीचे सत्य स्वीकारणार नाहीत.’
19 “पण मी म्हणालो, ‘प्रभु जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवीत होते, त्यांना अटक करुन मारण्यासाठी मी जात असे, हे या लोकांना माहीत आहे. 20 आणि जेव्हा तुझा साक्षीदार स्तेफन याचे रक्त सांडले तेव्हा तेथे उभा राहून मी त्याला संमति दर्शवीत होतो. आणि ज्या लोकांनी स्तेफनाला मारले त्यांचे कपडे मी राखीत होतो.’
21 “तेव्हा प्रभु मला म्हणाला, ‘जा! मी तुला दूरवरच्या यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठवीन.’”
22 येथपर्यंत यहूदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अशा मनुष्याल पृथ्वीवरुन नाहीसे केले पाहिजे! तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही!” 23 ते मोठमोठ्याने ओरडत होते. आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते, आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली. 24 त्याने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. 25 परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”
26 जेव्हा शताधिपतीने हे ऐकले तेव्हा तो सरदाराकडे गेला आणि म्हणाला, “तुम्ही काय करीत आहात? तो मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”
27 सरदार पौलाकडे आला व म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?”
पौल म्हणाला, “होय.”
28 शताधिपती म्हणाला, “रोमी नागरिकत्व मिळ विण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.”
पौल म्हणाला, “मी जन्मतःच रोमी नागरिक आहे.”
29 जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. व पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.
पौल यहूदी पुढाऱ्यांशी बोलतो
30 दुसऱ्या दिवशी यहूदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवीत होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली, मग त्याने पौलाला आणून त्यांच्यापुढे उभे केले.
यिर्मया शेत विकत घेतो
32 सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षी [a] यिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय. 2 त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता. 3-4 (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल. 5 बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.’”)
6 यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 7 ‘यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल “अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.”’
8 “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’”
तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच. 9 म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणी [b] दिली. 10 मी खरेदीखतावर सही केली आणि त्याची एक मोहोरबंद प्रत माझ्याजवळ ठेवली काही लोकांना साक्षीला ठेवून मी सर्व गोष्टी केल्या, मी ताजव्यात चांदी मोजली. 11 मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व. 12 त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले.
13 “लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो, 14 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘खरेदीखताच्या, मोहोरबंद व उघड, अशा दोन्ही प्रती मातीच्या मडक्यात ठेव म्हणजे त्या दीर्घ काळ चांगल्या टिकून राहतील.’ 15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘भविष्यकाळात माझी माणसे इस्राएलमध्ये पुन्हा एकदा घरे, शेते आणि द्राक्षमळे विकत घेतील.’”
16 नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो,
17 “परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. 18 परमेश्वरा, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 19 परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस. 20 परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली. 21 परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वतःच्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.!
22 “परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 23 इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास.
24 “आणि आता, शत्रूने नगरीला वेढा घातला आहे. यरुशलेमची तटबंदी ओलांडून जाण्यासाठी व नगरी हस्तगत करण्यासाठी ते उतरंडी रचीत आहेत. युद्ध उपासमार व भयंकर रोगराई यांच्या जोरावर बाबेलचे सैन्य यरुशलेम नगरीचा पराभव करील. आता बाबेलचे सैन्य यरुशलेमवर हल्ला करीत आहे. परमेश्वरा, असे होईल असे तू म्हणाला होतास आणि पाहा आता तसेच घडत आहे.
25 “परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, ‘यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?”
26 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 27 “यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.” 28 परमेश्वर असेही म्हणाला, “मी लवकरच यरुशलेम नगरी बाबेलचे सैन्य आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्यांच्या ताब्यात देईन. ते सैन्य नगरी जिंकेल. 29 बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल. 30 मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 31 “यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजेत. 32 इस्राएल व यहूदा येथील लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी यरुशलेमचा नाश करीन. लोक, त्यांचे राजे, नेते, त्यांचे याजक आणि संदेष्टे, यहूदातील व यरुशलेममधील लोक यांनी मला फार संतापविले आहे.
33 “त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही. 34 त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यांनी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र’ झाले.
35 “बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांनी बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
36 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, 37 ‘मी इस्राएल व यहूदा यामधील लोकांना त्यांचा देश सोडण्यास बळजबरीने भाग पाडले आहे. मी त्यांच्यावर भयंकर रागावलो आहे. पण मी त्यांना या ठिकाणी परत आणीन. मी त्यांना जेथे जेथे जायला भाग पाडले, तेथून तेथून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना येथे परत आणीन. मी त्यांना शांततेत व सुखरुप राहू देईन. 38 इस्राएलमधील आणि यहूदातील लोक माझे होतील आणि मी त्यांचा देव होईन. 39 त्यांनी खरोखरच एक व्हावे म्हणून मी त्यांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न करीन. त्यांच्या आयुष्यभर माझ्या उपासनेची खरोखरीची इच्छा हेच त्यांचे एकमेव ध्येय असेल. माझी उपासना आणि आदर केल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खरोखरच भले होईल.
40 “‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. 41 ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंतःकरणापासून हे करीन.’”
42 परमेश्वर असे म्हणतो, “मी इस्राएलमधील आणि यहूदातील लोकांवर मोठे अरिष्ट आणले आहे तशाच चांगल्या गोष्टीही आणीन.मी त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे कबूल केले आहे. 43 तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील. 44 लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोंगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
भाग पहिला
(स्तोत्रसंहिता 1-41)
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
आणि वाईटाचे निर्दालन करतो.
2 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
7 आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
आणि तू माझा मुलगा झालास.
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [b] नाश करते
तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”
10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
2006 by World Bible Translation Center