Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 24-25

योवाशकडून मंदिराची पुनर्बांधणी

24 योवाश राजा झाला तेंव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती. यहोयादा हयात असेपर्यंत योवाशची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. यहोयादाने योवाशला दोन बायका करुन दिल्या. त्याला मुले बाळे झाली.

पुढे योवाशने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले. तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून वार्षिक कर गोळा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. या कामाला विलंब लावू नका.” पण लेवीनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.

तेव्हा राजा योवाशने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवींना तू यहूदा आणि यरुशलेममधून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर पवित्र सभामंडपासाठी म्हणून वापरलेला आहे.”

पूर्वी अथल्याच्या मुलांनी देवाच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बाल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट बाई होती.

राजा योवाशच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करुन ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. लेवीनी मग यहूदा यरुशलेममध्ये दवंडी पिटली. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता. 10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले. 11 लेवी पेटी भरली की राजाच्या कारभाऱ्यांकडे जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. 12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णेध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड पितळ या धातूंमध्ये काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.

13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले. 14 कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरावयाची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याशिवाय सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयादाचे आयुष्य असे तोवर याजक दररोज होमबली अर्पण करत असत.

15 पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन वारला. मृत्युसमयी त्याचे वय 130 वर्षे इतके होते. 16 दावीदनगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच त्याचे लोकांनी दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे या ठिकाणी दफन केले.

17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशला येऊन मुजरा केला. राजाने त्यांचे ऐकून घेतले. 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांवर देवाचा कोप झाला. 19 लोकांना परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले. संदेष्ट्यांनी लोकांना परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.

20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा मुलगा. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.’”

21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांना जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्याला दगडफेक करुन मारले. हे त्यांनी मंदिराच्या आवारातच केले. 22 जखऱ्याचे वडील यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाच्या मुलाला जखऱ्याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”

23 वर्ष अखेरीला अरामच्या सैन्याने योवाशवर हल्ला केला. यहूदा आणि यरुशलेमवर हल्ला करुन त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले. 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशला हे शासन केले. 25 अरामी योवाशला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या मुलाला, जखऱ्याला योवाशने मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीदनगरात लोकांनी त्याला मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.

26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाब येथील होती. 27 योवाशचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत (राजाविषयी) लिहिले गेले आहे. योवाशचा मुलगा अमस्या हा त्याच्यानंतर राजा झाला.

यहूदाचा राजा अमस्या

25 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान. ती यरुशलेमची होती. त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मनःपूर्वकता नव्हती. अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली. पण त्याच्या मुलांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी आईवडिलांना आणि आईवडिलांच्या अपराधासाठी मुलांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”

अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी वय वर्षे किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढाली या आयुधांनी सज्ज असे सैनिक त्याने मोजले. ते एकंदर 3,00,000 निवडक सैनिक युध्दाला तयार होते. यांच्याखोरीज आणखी 1 लक्ष सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने 3 3/4 टन चांदी एवढी किंमत मोजली. पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही. तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”

यावर अमस्या त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी पैसे देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा माणूस म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”

10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहुदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागानेच घरी परतले.

11 यानंतर अमस्याने मोठेच धाडस करुन अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेइर मधील 10,000 लोकांना ठार केले. 12 आणखी 10,000 जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन खडकाच्या मध्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.

13 नेमक्या याचवेळी इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3,000 लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करुन न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.

14 अदोम्यांचा पाडाव करुन अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेइरमधील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरु केली. या दैवतांना वंदन करुन तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला. 15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वतःच्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”

16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”

17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजचा मुलगा आणि यहोआहाज येहूचा. येहू इस्राएलचा राजा होता.

18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनच्याच एका गंधसरुला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलींचे माझ्या मुलाशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले. 19 ‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वतःच्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”

20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. देवाच्याच मनात तसे होते. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजनपूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते. 21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे. 22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला. 23 योवाशने बेथ-शेमेश येथे अमस्याला पकडले आणि यरुशलेमला नेले. अमस्याच्या वडलांचे नाव योवाश. योवाशचे वडील यहोआहाज. योवाशने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमच्या तटबंदीची 600 हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली. 24 सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेदअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.

25 योवाशच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे वडील म्हणजे यहुदाचा राजा योवाश. 26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे. 27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला. 28 अमस्याचा मृत देह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदानगरात आणून त्याला पूर्वजांशेजारी पुरले.

रोमकरांस 12

आपले जीवन देवाला द्या

12 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.

मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.

देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.

तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. 10 बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. 11 आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. 12 आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटिने प्रार्थना करा. 13 पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.

14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. 15 जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा. 16 एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वतःस शहाणे समजू नका.

17 कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. 18 शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. 19 प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो. [a]

20 “तुमचा शत्रू भुकेला असल्यास
    त्यास खावयास द्या,
तहानेला असेल तर
    प्यावयास द्या.
कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.” [b]

21 वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका.

स्तोत्रसंहिता 22:19-31

19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस
    तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव
    माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
    बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [a]

22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन.
    सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
    इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
    इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
    परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
    परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
    जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.

25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
    त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
    जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
    तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
    सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
    तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
    देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
    व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
    लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
    त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.

नीतिसूत्रे 20:8-10

जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.

कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.

10 जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center