Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 26:12-27:34

12 द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते. 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.

14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली. 15 ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले. 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली.

पहारेकरी एकमेकांलगत उभे असत. 17 पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत. 18 पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.

19 कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:

खजिणदार आणि दुसरे अधिकारी

20 अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.

21 लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक. 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.

24 अबुएल हा परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावरचा नायक म्हणून नेमला गेला. अबुएल गेर्षोनचा मुलगा. गेर्षोम मोशेचा मुलगा. 25 अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडूनः रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ. 26 दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.

सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या. 27 यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली. 28 शमुवेल हा द्रष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला दिलेल्या पवित्र वस्तूंची देखभालही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.

29 कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत. 30 हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते. 31 हेब्रोन घराण्याच्या इतिहासावरुन असे दिसते की यरीया हा त्यांचा प्रमुख होता. चाळीस वर्षे राज्य केल्यावर दावीदाने जेव्हा शूर आणि कसबी पुरुषांचा शोध घेतला तेव्हा गिलाद मधल्या याजेर नगरात त्याला हेब्रोन घराण्यांत अशी माणसे आढळली. 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे असे 2,700 नातलग यरीयाला होते. परमेश्वराचे कार्य आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धावंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2,700 जण दावीदाने नेमले.

सैन्याची व्यवस्था

27 राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.

पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते. तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.

अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.

तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती. तीस प्रसिध्द शूरांमधला पराक्रमी सैनिक तो हाच. त्यांचा नायकही हाच होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात प्रमुख होता.

चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलच्या तुकडीत 24,000 जण होते.

शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.

इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.

10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.

11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.

12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते.

13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.

14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.

15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.

वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख

16 इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे:

रऊबेनः

जिख्रिचा मुलगा अलीयेजर.

शिमोनः माकाचा मुलगा शफट्या.

17 लेवी: कमुवेलचा मुलगा हशब्या.

अहरोनः सादोक.

18 यहूदा: अलीहू. (हा दावीदाचा एक भाऊ),

इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.

19 जबुलूनः ओबद्याचा मुलगा इश्माया.

नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.

20 एफ्राईम: अजऱ्याचा मुलगा होशेथ.

पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.

21 पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा इद्दो.

बन्यामीनः अबनेरचा मुलगा यासिएल.

22 दानः यरोहामचा मुलगा अजरेल.

हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख

दावीदाने केलेली इस्राएल लोकांची जनगणना

23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षे वयाचे आणि त्या पुढच्या वयाचे पुरुष गणतीसाठी विचारात घ्यायचे ठरवले. 24 सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.

राजाने नेमलेले व्यवस्थापक

25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे अधिकारी पुढीलप्रमाणे:

अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता.

शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.

26 कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.

27 रामा येथील शीमी हा द्राक्षमळ्यांवरचा अधिकारी होता.

शिफम येथील जब्दी हा द्राक्षमळ्यातून निघणारा द्राक्षारस आणि त्याची साठवण यावरचा अधिकारी होता.

28 गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता.

योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.

29 शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता.

अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.

30 इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता.

येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.

31 याजीज हाग्री मेंढरांचा मुख्य होता.

राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.

32 योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती. 33 अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता. 34 अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.

रोमकरांस 4:13-5:5

विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन

13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.

16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [a] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.

18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [b] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.

देवाशी नीतिमान

ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.

स्तोत्रसंहिता 14

14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
    पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
    त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.

परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
    त्याला शहाणे लोक शोधायचे होते
    शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
    सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
    दुष्टांना देव माहीत नाही.
    त्यांच्याकडे खायला [a] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
    का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
    म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.

सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
    परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
    परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
    नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.

नीतिसूत्रे 19:17

17 गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center