Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 9-10

इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे.

यरुशलेममधील लोक

देवाशी एकनिष्ठ न राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले. त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.

यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:

ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.

यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे: ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.

यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.

यरुशलेममधील बन्यामीन घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा. इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा. बन्यामीनच्या वंशावळीवरुन असे दिसते की यरुशलेममध्ये हे एकंदर 256 होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.

10 यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन, 11 अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता. 12 यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.

13 असे एकंदर 1,760 याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

14 यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक याप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमाया. हश्शूब अज्रीकामचा मुलगा. अज्रीकाम हशब्याचा मुलगा. हशब्या हा मरारीच्या वंशातला. 15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा. 16 ओबद्या शमाया याचा मुलगा. शमाया गालालचा मुलगा. गालाल यदूथूनचा मुलगा. याखेरीज आसा याचा मुलगा बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एल्कानाचा मुलगा. एल्काना हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.

17 यरुशलेममधील द्वाररक्षक पुढीलप्रमाणे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. 18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते. 19 शल्लूम हा कोरे याचा मुलगा. कोरे हा एब्यासाफचा मुलगा. एब्यासाफ कोरहचा मुलगा. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहच्या वंशातले होते. पवित्र निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते हे काम पार पाडत होते. त्यांच्या पूर्वजांकडेही हीच जबाबदारी होती. 20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजारचा मुलगा. परमेश्वर फिनहासचा पाठीराखा होता. 21 जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.

22 पवित्र निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर 292 निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती 23 परमेश्वराच्या मंदिराच्या, पवित्र निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. 24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. 25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.

26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. 27 देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.

28 मंदिरात वापरायच्या पात्रांची देखभाल काही द्वारपाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत. 29 लाकडी सामान, विशेष उपकरणे यांच्यावर इतर काही द्वारपाल नेमलेले होते. पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य यांच्यावरही 30 त्यांचीच देखरेख होती. हे सुवासिक द्रव्य सिध्द करण्याचे काम याजकांचे होते.

31 अर्पणाच्या भाकरी भाजण्याच्या कामगिरीवर मत्तिथ्या नावाचा लेवी होता. मत्तिथ्या हा शल्लूमचा थोरला मुलगा. शल्लूम कोरा कुटुंबातील होता. 32 कोरा कुटुंबातील काही द्वार रक्षकांना शब्बाथच्या दिवशी मेजावर मांडायचा पाव तयार करण्याचे काम सोपवलेले होते.

33 लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत. मंदिरातील कामाची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते.

34 हे सर्व लेवी आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी वंशावळ्यांमध्ये नोंद आहे. ते यरुशलेममध्ये राहत असत.

शौल राजाच्या घराण्याचा इतिहास

35 ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका. 36 ईयेलच्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले. 37 शिवाय गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले. 38 मिकलोथने शिमामला जन्म दिला. ईयेलचे कुटुंब यरुशलेममध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.

39 नेर हे कीशाचे वडील. कीश शौलाचे वडील. योनातान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बाल ही शौलची मुले.

40 मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.

41 पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे मुलगे. 42 आहाजने यारा याला जन्म दिला. [a] आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला. 43 मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.

44 आसेलला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही झाली आसेलची मुले.

शौल राजाचा मृत्यू

10 पलिष्टी इस्राएल लोकांशी लढले. इस्राएल लोकांनी पळ काढला. गिलबोवा डोंगरात बरेच इस्राएल लोक मारले गेले. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले. शौलावर त्यांनी तीव्र मारा केला. धनुष्यबाणांनी वेध घेऊन त्याला सैन्याने जायबंदी केले.

तेव्हा आपल्या शस्त्रवाहकाला शौल म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि ती माझ्यावर चालव. नाहीतर हे उपरे येऊन माझी विटंबना करतील.”

पण शौलाच्या या शस्त्रवाहकाचा धीर झाला नाही. त्याने शौलाला मारण्यास नकार दिला. तेव्हा शौलाने स्वतःची तलवार स्वतःला मारण्यासाठी वापरली. तो स्वतःतलवारीच्या टोकावर पडला. शौल मरण पावलेला पाहून शस्त्रवाहकाने तलवार उपसून त्यावर पडला व स्वतःचा जीव घेतला. अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे यांना मरण आले. शौलाच्या कुटुंबाला एकदमच मृत्यू आला.

आपल्या सैन्याने पळ काढला आहे. तसेच शौल आणि त्याचे मुलगे मेले हे खोऱ्यात राहणाऱ्या इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनीही आपली घरेदारे सोडून पळ काढला. इस्राएल लोकांनी सोडलेल्या त्या नगरामध्ये पलिष्टी आले आणि तेथेच राहू लागले.

दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले. शौलाच्या देहावरील वस्तू त्यांनी घेतल्या. त्याचे मस्तक आणि चिलखत लांबवले. हे वर्तमान आपल्या दैवतांना आणि लोकांना कळवायला त्यांनी देशभर दूत रवाना केले. 10 पलिष्ट्यांनी शौलाचे चिलखता आपल्या देवळात आणि शिर दागोनच्या देवळात टांगले.

11 पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली. 12 तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.

13 परमेश्वराशी प्रामाणिक नसल्याने शौलाला मरण आले. शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले. 14 शिवाय परमेश्वराला विचारण्याऐवजी भूतविद्या जाणणाऱ्या बाईकडे जाऊन त्याने सल्ला विचारला. म्हणून परमेश्वराने शौलाला मृत्युदंड दिला आणि इशायाचा मुलगा दावीद याला राज्य दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 27:21-44

21 बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे. 22 कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’ 25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. 26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”

27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला. 28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली. 29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले. 30 खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या. 31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” 32 यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.

33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही. 34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” 35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. 36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. 37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो. 38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायलयांनंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.

जहाज नष्ट होते

39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले. 40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. 41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.

42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. 43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. 44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.

स्तोत्रसंहिता 8

प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [a] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
    तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.

मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
    येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.

परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
    आणि मला आश्चर्य वाटते.
लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
    तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [b] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
    तू त्यांची दखल तरी का घेतोस?

परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
    तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
तू लोकांना तू निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
ते आकाशातल्या पक्ष्यांवर
    आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

नीतिसूत्रे 18:23-24

23 गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.

24 काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center