Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 11-13

11 यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वतःकडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली. पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “शमाया, यहूदाचा राजा, शलमोनपुत्र रहबाम याच्याशी तू बोल.तसेच यहूदा? आणि बन्यामिन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे. परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.’” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परतले. यराबामवर त्यांनी हल्ला केला नाही.

रहबाम यहूदाचे सामर्थ्य वाढवतो

रहबाम यरुशलेममध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात उभारली. बेथलेहेम, एटाम, तकोवा, बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम, गथ, मारेशा, सीफ, अदोरइम, लाखीश, अजेका, 10 सोरा, अयालोन व हेब्रोन या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामिन मधली ही गावे चांगली भक्कम करण्यात आली. 11 नगरे मजबूत झाल्यावर रहबामने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामुग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला. 12 प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करुन गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामिन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.

13 समस्त इस्राएलमधील याजक आणि लेवी रहबामशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले. 14 लेवींनी आपली शेती आणि शिवारे सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे मुलगे यांनी लेवींना प्रतिबंध केला म्हणून ते आले.

15 यराबामने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले. 16 इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले. 17 त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.

रहबामचे घराणे

18 रहबामने महलथशी विवाह केला. तिचे वडील यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा मुलगा. अबीहईल अलीयाबची मुलगी आणि अलीयाब हा इशायचा मुलगा. 19 महलथापासून रहबामला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे मुलगे झाले. 20 मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली. 21 रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.

22 अबीयाला रहबामने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्याला राजा करावे असा त्याचा मानस होता. 23 रहबामने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व मुलांना यहूदा आणि बन्यामिनमधील नगरांमध्ये विखरुन ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.

मिसरचा राजा शिशक याची यरुशलेमवर स्वारी

12 रहबामचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.

रहबामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले. शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की व कुशी हे लोक होते. यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुशलेमला आणले.

तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीधारी मंडळी यरुशलेमला जमली होती. शमाया रहबामला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे: ‘रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.’”

तेव्हा यहूदाची ती वडीलधारी मंडळी आणि रहबाम यांना पश्चात्ताप झाला आणि ते विनम्र झाले. “परमेश्वर म्हणतो ते खरे आहे.” असे त्यांनी उदगार काढले.

ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. त्यांना तारीन. शिशक मार्फत त्यांना मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही. पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”

शिशकने यरुशलेमवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या. 10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या. 11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.

12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील कोप शमला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.

13 रहबामने यरुशलेममध्ये आपले सामर्थ्य वाढवले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सतरा वर्षे राज्य केले. इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुशलेमची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा; नामा अमोनीण नगरातली होती. 14 रहबामने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.

15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची साद्यंत हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत. 16 रहबामने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा अबीया गादीवर आला.

यहूदाचा राजा अबीया

13 इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली. अबीयाच्या सैन्यात 400,000 शूर योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामकडे 800,000 सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.

एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका, दावीद आणि त्याची मुले यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलच्या परमेश्वर देवानेच त्यांना अधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या. देवाने दावीदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. [a] पण यराबामने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याकडे पाठ फिरवली. यराबाम नबाटाचा मुलगा. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक. शलमोन दावीदाचा मुलगा. मग कुचकामी आणि वाईट माणसांशी यराबामशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या विरुद्ध होती. रहबाम तरुण आणि अनुभवी होता. त्याला यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.

“आता तुम्ही लोकांना परमेश्वराचे राज्य म्हणजे दावीदाच्या मुलांची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही संख्येने वरचढ आहात आणि यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत. परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले आहे. हे याजक अहरोनचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले आहेत. अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वतःवर संस्कार केला की तो जे खरे परमेश्वरच नव्हेत त्यांचा याजक बनतो.

10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत. लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात. 11 परमेश्वराला ते होमार्पणे वाहतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील मुद्दाम करवून घेतलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात. रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वराला सोडले आहे. 12 खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देंवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यात तुम्हाला यश येणार नाही.”

13 पण यराबामने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले. 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी आरोळ्या ठोकल्या. त्याबरोबर देवाने यराबामच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला. 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला. देवाने यहूदांच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला. 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे 5,00,000 योध्दे मारले गेले. 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहुदा सैन्याने विजय मिळवला.

19 अबीयाच्या सैन्याने यराबामच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामकडून अबीयाच्या सैन्याने बळकावला.

20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामवर प्रहार केला आणि तो मेला. 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा बायका केल्या. त्याला बावीस मुलगे आणि सोळा मुली झाल्या. 22 इद्दो या भविष्यवाद्याच्या नोंदवह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.

रोमकरांस 8:26-39

26 जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वतः आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो. 27 परंतु जो देव आपली अंतःकरणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.

28 आणि आपणास माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. 29 ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते. यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा. 30 देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरवसुद्धा दिले.

देवाची ख्रिस्त येशूमधील प्रीति

31 यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? 33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. 34 दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे. 35 ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? 36 असे लिहिले आहे की,

“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत.
    आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” (A)

37 तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 18:37-50

37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो
    आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन.
    ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.
    माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
39 देवा, तू मला युध्दात शक्तिमान बनवलेस
    तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.
40 तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस
    आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.
41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या
    परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते.
त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले
    पण त्याने उत्तर दिले नाही.
42 मी माझ्या शत्रूंचे मारुन तुकडे केले.
    त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला
    त्या राष्ट्रांचा प्रमुख कर
    जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
44 ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील.
    ते परदेशी मला घाबरतील.
45 ते परदेशी गलितगात्र होतील.
    ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.

46 परमेश्वर जिवंत आहे,
    मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव
    मला वाचवतो तो महान आहे.
47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली,
    त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.
48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द् उभे राहिले

त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
    तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.
49 परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो
    म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.

50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द् जिंकायला मदत करतो
    तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो.
    तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.

नीतिसूत्रे 19:27-29

27 तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.

28 जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील.

29 जो माणूस स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center