Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 23:31-25:30

यहूदाचा राजा यहोआहाज

31 यहोआहाज तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल लिब्नाच्या यिर्मया याची ती मुलगी. 32 यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते.

33 फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजला यरुशलेममध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून साडेसात हजार पौंड चांदी आणि पंचाहत्तर पौंड सोने जबरदस्तीने वसूल केले.

34 फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला. 35 यहोयाकीमने फारोला सोने चांदी दिले तरी फारो-नखोला देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमने मग फारोनखोला पैसे दिले.

36 यहोयाकीम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा. ती रुमा येथील पदाया याची मुलगी. 37 यहोयाकीमचे वर्तन परमेश्वराला न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.

राजा नबुखदनेस्सर याची यहूदावर स्वारी

24 यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले. यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.

यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसे व्हावे म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती. मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.

यहोयाकीमने बाकी जे काही केले त्याची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. यहोयाकीमच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.

मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरसोडून आला नाही.

नबुखदनेस्सर यरुशलेम बळकावतो

यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी. यहोयाखीनने आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.

10 यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेमला वेढा दिला. 11 नंतर नबुखद्नेस्सर या नगरात आला. 12 यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार-भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.

13 यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.

14 नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही. 15 यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते. 16 सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना त्याने बाबेलला कैदी म्हणून नेले.

राजा सिद्कीया

17 बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले. 18 सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी. 19 सिद्कीया यहोयाखीनप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला. 20 तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली.

25 सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत हा वेढा चालू राहिला. दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसांची अन्नान्नदशा झाली.

नबुखदनेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले. बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.

बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.

यरुशलेमचा विध्वंस

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखदनेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता. या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.

10 मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. 11 नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. 12 अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.

13 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले. 14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. 15 अग्निपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. 16-17 अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू: दोन पितळी स्तंभ (प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.) एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.

यहूदी लोकांना कैदी बनवण्यात येते

18 नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

19 आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.

20-21 हमाथ प्रदेशातील रिब्ला येथे नबुजरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले. राजाने त्या सर्वांची तेथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदींना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.

यहूदाचा अधिकारी गदल्या

22 नबुखद्नेस्सरने काही लोकांना यहूदातच राहू दिले. त्यात एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.

23 नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्याला भेटायला मिस्पा येथे आले. 24 गदल्याने या सर्वाना अभय दिले आणि तो त्यांना म्हणाला, “बाबेलच्या अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलच्या राजाशी एकनिष्ठ राहा. म्हणजे तुमचे भले होईल.”

25 अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले. 26 मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. बाबेलच्या लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.

27 पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले. 28 यहोयाखीनच्या बाबतीत त्याचे धोरण मवाळपणाचे होते. त्याने यहोयाखीनला इतर राजांपेक्षा दरबारात उच्चासन दिले. 29 अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे. 30 अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 22:17-23:10

17 “मग असे झाले की, जेव्हा मी यरुशलेमला परत आलो, आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला दृष्टान्त झाला. 18 मी येशूला पाहिले, आणि येशू मला म्हणाला, ‘घाई कर! यरुशलेम ताबडतोब सोड! येथील लोक माझ्याविषयीचे सत्य स्वीकारणार नाहीत.’

19 “पण मी म्हणालो, ‘प्रभु जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवीत होते, त्यांना अटक करुन मारण्यासाठी मी जात असे, हे या लोकांना माहीत आहे. 20 आणि जेव्हा तुझा साक्षीदार स्तेफन याचे रक्त सांडले तेव्हा तेथे उभा राहून मी त्याला संमति दर्शवीत होतो. आणि ज्या लोकांनी स्तेफनाला मारले त्यांचे कपडे मी राखीत होतो.’

21 “तेव्हा प्रभु मला म्हणाला, ‘जा! मी तुला दूरवरच्या यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठवीन.’”

22 येथपर्यंत यहूदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अशा मनुष्याल पृथ्वीवरुन नाहीसे केले पाहिजे! तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही!” 23 ते मोठमोठ्याने ओरडत होते. आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते, आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली. 24 त्याने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. 25 परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”

26 जेव्हा शताधिपतीने हे ऐकले तेव्हा तो सरदाराकडे गेला आणि म्हणाला, “तुम्ही काय करीत आहात? तो मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

27 सरदार पौलाकडे आला व म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?”

पौल म्हणाला, “होय.”

28 शताधिपती म्हणाला, “रोमी नागरिकत्व मिळ विण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.”

पौल म्हणाला, “मी जन्मतःच रोमी नागरिक आहे.”

29 जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. व पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.

पौल यहूदी पुढाऱ्यांशी बोलतो

30 दुसऱ्या दिवशी यहूदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवीत होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली, मग त्याने पौलाला आणून त्यांच्यापुढे उभे केले.

23 पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.” तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. पौल हनन्याला म्हणाला, “सफेती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारील! त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबडीत मारण्याचा आदेश देतोस?”

जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाल, “देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?”

पौल म्हणाल, “बंधूनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की, ‘तू आपल्या शासन करणाऱ्याविरुद्ध बोलू नकोस’” [a]

जेव्हा पौलाच्या लक्षात आले की, धर्मसभेतील एक गट सदूकी आहे तर दुसरा परुशी. तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला, “बंधूनो, मी एक परुशी आहे, परुश्याचा मुलगा आहे! मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे, त्यामुळे माइयावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.”

पौलाने असे म्हणताच, परुशी व सदूकी या दोन गटांमध्ये कलह सुरु झाला. आणि धर्मसभेत फूट पडली. (सदूकी असे म्हणतात की, मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात, परुशी दोन्हीवर विश्वास ठेवतात.) सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!”

10 वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले.

स्तोत्रसंहिता 2

इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
    ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
    आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
    आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”

परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
    त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
    त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
    यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.

आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
    आणि तू माझा मुलगा झालास.
जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
    या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [a] नाश करते
    तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”

10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
    राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
    तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
    तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

नीतिसूत्रे 18:13

13 तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center