Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 122

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दाविदाचेस्तोत्र.

122 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,”
    असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
आपण इथे आहोत.
    यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
हे नवीन यरुशलेम आहे.
    हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा.
    इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात.
    ही कुटुंबे देवाची आहेत.
राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली.
    दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.

यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा.
    “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
अशी मी आशा करतो.
    तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”

तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”.
    माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी
    या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.

एस्तेर 7

हामानला फाशी

तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले. मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी ते द्राक्षारस घेत असताना राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, “राणी एस्तेर, तुला काय हवे आहे? काहीही माग. ते तुला मिळेल. काय हवे तुला? तुला मी काहीही देईन. अगदी अर्धे राज्य देखील.”

तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे. कारण, पुरते नेस्तनाबूत होण्यासाठी, मारले जाण्यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. कारण राजाला तसदी देण्याइतकी ती समस्या गंभीर ठरली नसती.”

तेव्हा राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत कोणी केले? तुझ्या लोकांच्या बाबतीत असे करण्याचे धाडस करणारा कोण तो माणूस?”

एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दुष्ट हामान आमचा शत्रू.”

तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळच थांबला. राजाने आपला वध करायचे ठरवले आहे याची कल्पना असल्यामुळे तो आपल्या प्राणांची भीक मागू लागला. बागेतून राजा मेजवानीच्या दालनात येत असतानाच, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?”

राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानचे तोंड झाकले. हर्बोना नावाचा राजाचा खोजा म्हणाला, “हामानच्या घराजवळ पंचाहत्तर फूट उंचीचा वधस्तंभ उभारला आहे. मर्दखयला फाशी द्यायला त्याने तो उभारला होता. तुम्हाला ठार करायचा कट उघडकीला आणून ज्याने तुम्हाला मदत केली तोच हा मर्दखय.”

राजा म्हणाला, “हामानला त्या स्तंभावरच फाशी द्या.”

10 तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.

प्रकटीकरण 1:9-20

मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म [a] नावाच्या बेटावर होतो. 10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला. 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही, आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”

12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. 13 मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. 14 त्याचे डोके आणि केस बरफासारख्यापांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. 15 त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. 16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली. तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.

17 जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे, 18 मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. 19 म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही. आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही. 20 जे सात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center