Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी महलथ् [a] सुरांवर बसवलेले दावीदाचे मास्कील (शिक्षण).
53 केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो.
तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात
आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.
2 देव खरोखरच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो.
देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
3 परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे.
प्रत्येक जण वाईट आहे.
कोणीही काही सत्कृत्य करीत नाही,
अगदी एकही नाही.
4 देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे.
पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत.
दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच
ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”
5 परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल,
पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील.
ते दुष्ट लोक इस्राएलचे शत्रू आहेत.
देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे.
म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील.
आणि देव त्या दुष्टांची हाडे इतस्तत फेकेल.
6 सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल?
देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल,
देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल
याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.
एका संदेष्ट्याच्या विधवेची अलीशाकडे मदतीसाठी याचना
4 संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलीशाकडे रडत रडत आली, आणि म्हणाली, “माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता. परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करुन घ्यायला येतो आहे.”
2 अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.”
तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.”
3 यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. 4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.”
5 मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. 6 अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.”
पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
7 मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”
येशू पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(A)
10 शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला. 11 पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले. ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती, त्यांना त्याने बरे केले.
12 दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना जाऊ द्या. म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावयाला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील. कारण आपण दूर ठिकाणी आहोत.”
13 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.”
ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.” 14 तेथे ते सुमारे पाच हजार पुरुष होते.
परंतु तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा.”
15 त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले. 16 नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले. 17 लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.
2006 by World Bible Translation Center